‘यदा कदाचित’सारखी दर्जेदार कलाकृती नाट्यरसिकांना दिल्यानंतर आता लवकरच ‘श्री दत्त विजय प्रॉडक्शन’ एक नवंकोरं धमाल नाटक घेऊन नाट्यरसिकांच्या भेटीस येत आहे. ‘मि. 420’ असं या नव्या नाटकाचं नाव आहे. दत्त विजय प्रोडक्शनचे हे 16 वे नाटक असून यामध्ये बरेच नवे चेहरे आपल्याला दिसणार आहेत. मालिका विश्वातून प्रकाश झोतात आलेली ही कलाकार मंडळी एक धमाल कथानकासह महत्वाचा संदेश देणारं नाटक घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. (Dakshata Joil playing lead role in upcoming marathi drama)
‘मि. 420’ या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. तर दिग्दर्शनाची धुरा प्रदीप वेलोंडे यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता भूषण घाडी, डॉ. संदीप वंजारी, प्रदीप वेलोंडे, अक्षय पाटील, निकिता सावंत, आणि दक्षता जोईल हे नवोदित कलाकार रंगभूमीवर अवतरणार आहेत. यांपैकी अभिनेता अक्षय पाटील याने ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत विठूरायाची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री दक्षता जोईलने झी मराठीच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशी हे पात्र साकारले होते.
‘श्री दत्त विजय प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकासाठी महेश देशमाने यांनी संगीत दिलंय. तर राम सगरे यांनी नेपथ्य, साई शिर्सेकर यांनी प्रकाशयोजना आणि दत्ता भाटकर यांनी रंगभूषेची जबाबदारी पेलली आहे. डॉ. संदीप वंजारी आणि संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. माहितीनुसार, या नाटकाचा शुभारंभ प्रयोग येत्या सोमवारी 17 फेब्रुवारी 2025 रोजी, दुपारी 4 वाजता, दादरच्या श्री शिवाजी मंदिरात सादर केला जाईल. या नाटकाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना आपले नाटक पहायला या, अशी विनंती केली आहे.
काय म्हणाले कलाकार?
आपल्या ‘मि. 420’ या नाटकाविषयी बोलताना टीमने सांगितले, ‘हे नाटक म्हणजे पूर्ण धमाल आहे. हसत खेळत एका महत्वाच्या विषयावर भाष्य करणारं असं हे नाटक आहे. त्याच्या नावात 420 असलं तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठेही 420 गिरी होणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री देतो. लोक म्हणतात नावात काय आहे? पण आमच्या नाटकाच्या नावात आणि नाटकात बरंच काही आहे’. यावेळी दिग्दर्शकाने प्रेक्षकांना नाटक पाहण्याचे आवाहन करताना म्हटले, ‘आम्ही सर्व नव्या दमाचे कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते आहोत. तर प्रेक्षकांनो आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रतिसादाची गरज आहे. आम्ही शुभारंभाचा तुमची वाट पाहू’.
हेही पहा –
Asha Parekh : म्हणून आशा पारेख अविवाहित, यशस्वी नायिकेची अधुरी प्रेमकहाणी