लॉफी पॉलची तमिळ चित्रपटात एन्ट्री!

लॉफी हा वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्य शिकत आहे. भरतनाट्यम, हिप-हॉप, रोबोटिक्स, फोक, वेस्टर्न स्टाईल अशा अनेक प्रकारच्या नृत्यप्रकारात तो पारंगत आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नाही तर चेन्नईत झालेल्या 'भरतम ५०००' या कार्यक्रमात त्याने सेलिब्रिटी परफॉर्मन्स दिला होता.

lofy poll
लॉफी पॉल

एखादा मुलगा आपल्या जिद्दीच्या जोरावर किती उंच भरारी घेऊ शकतो याचा प्रत्यय आपल्याला लॉफी पॉलकडे बघितल्यावर येतो. लॉफी पॉल या मुंबईकर तरुणाने नृत्यक्षेत्रात अप्रतिम कामगिरी केली आहे. केवळ भारतातच नाही तर त्याने आपली कला परदेशातही पोहोचवली आहे. लवकरच लॉफी तमिळ चित्रपटात झळकणार आहे.

अनेक नृत्य प्रकारांत पारंगत

लॉफी हा वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्य शिकत आहे. भरतनाट्यम, हिप-हॉप, रोबोटिक्स, फोक, वेस्टर्न स्टाईल अशा अनेक प्रकारच्या नृत्यप्रकारात तो पारंगत आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नाही तर चेन्नईत झालेल्या ‘भरतम ५०००’ या कार्यक्रमात त्याने सेलिब्रिटी परफॉर्मन्स दिला होता. या कार्यक्रमाची पुढे गिनीज बुकात नोंदही झाली. मुंबईत राहणाऱ्या एका सामान्य तरुणाने केलेल्या या कामाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड चिल्ड्रन फेस्टिव्हल २०१५ या कार्यक्रमासाठी लॉफी व त्याच्या ग्रुपची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारताचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. तर या स्पर्धेत एकूण ७८ देशांमधील डान्सर्स सहभागी झाले होते. थायलंड, मलेशिया, मॉरिशस, रशिया अशा अनेक ठिकाणी त्याने त्याचे नृत्यकौशल्य दाखवले आहे. नृत्यक्षेत्रातील प्रसिद्ध महागुरूंकडून अनेकदा त्याची स्तुती केली गेली आहे. तसेच त्याला नृत्यक्षेत्रातील अप्रतिम कामगिरीसाठी ‘द डान्स लिजंड ऑफ इंडिया’ या पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २०१५ मध्ये मॉरिशस येथे झालेल्या मराठी दिनाच्यावेळी देखील लॉफी आणि त्याच्या ग्रुपने नृत्य सादर केले होते.

lofy poll
नृत्यसादर करतना लॉफी पॉल

आता तमिळ चित्रपट सृष्टीत लॉफीचा जलवा!

लॉफी केवळ नृत्यक्षेत्रात नाही तर अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहे. लवकरच लॉफी तमिळ चित्रपटसृष्टीत एन्ट्री करत आहे. नृत्यासह अभिनयात हुशार असलेला मुंबईचा हा हरहुन्नरी कलाकार आता तामिळ सिनेसृष्टीतही धमाका करणार आहे. या सिनेमाचे नाव ‘नाडा’ असे असून राघवन थंबी हे याचे दिग्दर्शन करणार आहेत. लॉफी यात प्रमुख भूमिकेत असून लवकरच याचं शूटिंग सुरू होईल.

माझ्या कामाचं वेळोवेळी सगळ्यांनी कौतुक केलं. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी दखल घेतली आहे. आता तामिळ सिनेसृष्टीत मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवणार  आहे. आजपर्यंत माझ्यावर जसा विश्वास दाखवला तसाच कायम ठेवा.

लॉफी पॉल, डान्सर