Deepika Padukone Reply to SN Subrahmanyan : एल अँड टी कंपनीचे चेयरमेन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी नुकतंच कर्मचाऱ्यांनी एका आठवड्याला किती तास काम करावे याबाबत एक व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मुद्द्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. पण आता त्यांच्याही दोन पावले पुढे जात लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षांनी लोकांना 90 तास काम करण्यास सांगितले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकच वाद उभा राहिला आहे.
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबतीत एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये तिने फये डिसूझा यांच्या या वक्तव्यासंबंधीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपीकाने आपल्या स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर (#MentalHealthMatters) असा हॅशटॅग वापरून म्हटले आहे की, ‘एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसला.’
एसएन सुब्रमण्यन नक्की काय म्हणाले?
लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो अजूनही कर्मचार्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे. यावर सुब्रह्मण्यन म्हणाले की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो”
पुढे म्हणाले, ‘घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.’ सुब्रह्मण्यन यांच्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडीटवर तुफान व्हायरल होत आहे.