येत्या 31 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘देवा’ सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे चाहते या सिनेमाबाबत आणि नव्या जोडीच्या केमिस्ट्रीबाबत उत्सुक आहेत. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील काही दृश्यांवर कात्री चालवली आहे. रोशन एंड्रयूज दिग्दर्शित या सिनेमातील रोमँटिक सीन्ससह, शिवीगाळ तसेच अभद्र हावभाव असणाऱ्या दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Deva film some scenes trim by Censor Board due to foul gestures)
‘देवा’ सिनेमावर चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री
अभिनेता शाहिद कपूरचा ऍक्शन थ्रिलर सिनेमा ‘देवा’ येत्या शुक्रवारी (31जानेवारी) सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील काही दृश्यांमध्ये विशेष बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने (CBFC) ‘देवा’ सिनेमाला U/A सर्टिफिकेट दिले असून यात 3 महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिलेल्या सूचनेनुसार ‘देवा’तील रोमँटिक, विभत्स हावभाव आणि शिवीगाळ असलेल्या सीन्समध्ये बदल होतील.
महत्वाचे 3 बदल होणार
मीडिया रिपोर्टनुसार, ‘देवा’ या सिनेमात शाहिद कपूर आणि पूजा हेगडेने लिप-लॉक सीन दिला आहे. ज्यातील 6 सेकंद सेन्सॉरच्या कात्रीत आली आहेत. शिवाय अश्लील तसेच अभद्र हावभाव असणारी दृश्ये सिनेमातून काढून टाकली जातील आणि शिवीगाळ केलेल्या सीन्समधील डायलॉग्सदेखील बदलले जाणार आहेत. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिलेल्या सूचनेनुसार हे 3 महत्वाचे बदल केले जाणार आहेत.
शाहिद साकारणार निडर पोलिसाची भूमिका
एक्शन- थ्रिलर ‘देवा’ सिनेमात अभिनेता शाहिद कपूर एका निडर पोलिसाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो न्यायासाठी झगडताना कधीही मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ‘कबीर सिंग’ आणि ‘कमीने’ सिनेमांची आठवण येऊ लागली आहे. एका मोठ्या काळानंतर शाहिद पुन्हा एकदा डॅशिंग भूमिकेत दिसणार असल्याने चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा हेगडे जर्नालिस्टच्या भूमिकेतून झळकणार आहे. तसेच अभिनेता पावेल गुलाटी, अभिनेत्री कुब्रा सैतशिवाय मराठी अभिनेता गिरीश कुलकर्णीदेखील या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारताना दिसतील.
‘देवा’चा गुढमय क्लायमॅक्स
सेन्सॉरच्या सूचनेनंतर या सिनेमात महत्वाच्या तीन बदलांसह सबटायटलमध्येही अर्वाच्य भाषा हटवली जाईल. यानंतर आता सिनेमाचा रनटाईम 2 तास 36 मिनिटे आणि 59 सेकंद इतका झाला आहे. या सिनेमाची खास बाब अशी की, आतापर्यंत मेकर्सने क्लायमॅक्सवरून पडदा हटवलेला नाही. कलाकारांनादेखील या क्लायमॅक्सबाबत माहिती न देऊन मेकर्सने क्लायमॅक्सचे गूढ कायम ठेवले आहे.
हेही पहा –
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर, नेटिझन्सने पुन्हा केली टिंगल