लेडी सुपरस्टार या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नयनतारानं एका खुल्या पत्रामध्ये साऊथचा सुपरस्टार धनुषला फटकारलं आहे. नयनतारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खुल्या पत्रात धनुषला खडे बोल सुनावले आहेत. नयनतारा सध्या तिच्या ‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे नयनताराच्या अडचणी वाढल्या आहेत. नयनतारा आता चांगलीच भडकली असून, तिने याबाबत सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत धनुषला उत्तर दिले आहे.
धनुषने 10 कोटींची कॉपीराईटबाबत दावा केल्याने नयनताराने पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. तिने लिहिले कि, “ही तुमची आतापर्यंतची सर्वांत वाईट वागणूक आहे. ऑडिओ लाँचवेळी तुम्ही साध्याभोळ्या चाहत्यांसमोर जसे वागता, त्यातील खरे आणि चांगले गुण तुमच्यात खरोखर असते, तर आज चित्र काही वेगळे दिसले असते. फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी 10 कोटींचा कॉपीराईट दावा करणे यातून तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे दिसून येते.”
नयनताराने आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरता यावा यासाठी आम्ही तुम्हाला विनंती केली होती. आम्ही तुम्हाला वारंवार विचारले होते. तुमच्या उत्तराचीही आम्ही वाट पाहिली. मात्र, तुम्ही मुद्दाम आम्हाला एनओसी दिली नाही. या चित्रपटातील गाण्याचा काही भाग आम्हाला हवा होता; मात्र तुम्ही यातील गाणं आणि फोटो घेण्याचीही परवानगी दिली नाही.
View this post on Instagram
नयनताराने पुढे लिहिलं आहे, “शेवटी आम्ही डॉक्युमेंट्रीमधील तो भाग कट करून, पुन्हा एडिट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्युमेंट्रीमध्ये असलेला भाग ‘नानुम राउडी धान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यावरदेखील तुम्ही आक्षेप घेतला आणि केवळ तीन सेकंदांसाठी कायदेशीर कारवाई केली.”
“तुम्ही पाठवलेली कायदेशीर नोटीस आम्हाला मिळाली आहे. आता आम्हीदेखील यावर कायदेशीर उत्तरे देऊ. नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीसाठी ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरण्यावर तुम्ही आम्हाला नकार दिला होता. त्याने तुम्ही न्यायालयात निकाल तुमच्या बाजूने फिरवू शकाल. मात्र, मला तुम्हाला सांगायचे आहे की, या प्रकरणाची आणखी एक नैतिक बाजू आहे”, पत्रात असे सर्व नमूद करून, शेवटी अभिनेत्रीने ओम नमः शिवाय अशी कॅप्शन लिहिली आहे.
‘नयनतारा : बियॉण्ड द फेयरी टेल’ डॉक्युमेंट्री 18 नोव्हेंबर 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री नयनताराचा सिनेविश्वातील आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळेल. त्यात अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या आव्हानांचीदेखील झलक पाहायला मिळणार आहे.