घरमनोरंजनइफ्फीच्या टेबल टॉक्समध्ये 'धर्मवीर'ची चर्चा, मंगेश देसाई म्हणाले प्रसाद नसता तर...

इफ्फीच्या टेबल टॉक्समध्ये ‘धर्मवीर’ची चर्चा, मंगेश देसाई म्हणाले प्रसाद नसता तर…

Subscribe

मुंबई – “अनेकदा आपल्या कुटुंबात, आई-मुलांचे नाते ठळकपणे दिसते, त्यावर खूप बोलले जाते, मात्र, मुलांचे वडिलांशी असलेले नाते खूपदा दुर्लक्षितच राहते. खरं तर, वडीलही आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी अपार कष्ट करत असतात, पण केवळ ते आपल्या घराला वेळ देत नाहीत, अशीच तक्रार केली जाते.” असं धर्मवीर चित्रपटाचे निर्माते, मंगेश देसाई यांनी सांगितलं. गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या इफ्फीमध्ये आयोजित ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक सत्रात ते बोलत होते.

‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे” या चित्रपटाविषयी बोलताना देसाई म्हणाले की, “महाराष्ट्रात, आम्ही दोन व्यक्तींना आमच्या पितृस्थानी मानतो. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आनंद दिघे.” दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याची आपली 2013 पासूनच इच्छा होती, आपले हे स्वप्न 2022 साली पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले. निर्माता म्हणून हा आपला पहिलाच चित्रपट आहे, असे सांगत, ज्या व्यक्तीला अनेक लोक आपले दैवत मानतात, अशा व्यक्तीवर चित्रपट काढणे, हे एक मोठे आव्हान आणि जबाबदारी होती, असेही मंगेश देसाई म्हणाले.

- Advertisement -


या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल देसाई म्हणाले, “मला असे वाटते की, जी व्यक्ती खूप लोकांना जोडून ठेवू शकते, त्यांना आपल्यासोबत घेऊन पुढे जाते, अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते,’ असेही ते पुढे म्हणाले. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कामाचेही त्यांनी खूप कौतूक केले. प्रवीण तरडे झपाटून काम करतात, असं मंगेश देसाई म्हणाले. तसेच, चित्रपटात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रसाद ओक यांच्या अभिनयाचेही त्यांनी कौतुक केले.“ प्रसाद नसता तर आम्हाला जे आनंद दिघे साकारायचे होते, ते साकारता आले नसते,” असं ते म्हणाले. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा, असे आपल्याला अनेक जण विचारत असतात, असे सांगत या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे पुढच्या भागाची लवकरच घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

“हा चारित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे, त्या आनंद दिघे यांचे फोटो, मी लोकांच्या घरोघरी बघितले आहेत” असे या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेता प्रसाद ओक यांनी सांगितलं. अशी व्यक्तिरेखा साकारणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी आव्हानात्मक असते, असं सांगत, या व्यक्तिरेखेचे अंतरंग कसे गवसत गेले याची माहिती प्रसाद ओक यांनी दिली.” आम्ही त्यांचे फोटो पहिले, त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि आनंद दिघे यांना भेटणाऱ्या, बघितलेल्या सुमारे 100 लोकांशी आम्ही त्यांच्याविषयी बोललो.” तसेच, या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला तयार करण्यासाठी अनेकवेळा तालमी करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

“तब्बल 94 चित्रपट केल्यानंतर, मला पहिल्यांदा प्रमुख व्यक्तिरेखा, तीही धर्मवीर आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली, आणि पुढे जे काही झाले, तो इतिहास आहे” अशा शब्दांत, प्रसाद ओक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महोत्सवात दाखवण्याची संधी 53 व्या इफ्फीने दिल्याबद्दल, मंगेश देसाई आणि प्रसाद ओक यांनी आयोजकांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -