हसू म्हणजेच फक्त मनोरंजन या समीकरणाला छेद देत तिची नाटकं वास्तवाचं भान ठेवत, आसू आणि हसूचा मेळ घालू लागली. आजही छोटा पडदा असो, मोठा पडदा असो वा वेबसिरिज ती चवीपुरती त्यात दिसते. तिच्यासाठी मेन डिश तर तिचं नाटकच आहे. कारण थिएटर आता लेखिका दिग्दर्शिका आणि अभिनेत्री रसिका आगाशेच्या श्वासात आहे. आपलं महानगर – My Mahanagar च्या स्टुडिओमध्ये भेटलेली रसिका तिच्यासोबत झालेल्या गप्पांमधून उलगडत गेली.
रसिका मूळची पुण्याची. रसिकाला कळू लागल्यानंतर इतर मुलींप्रमाणेच माधुरी व्हायचंय हेच तिचं स्वप्न होतं. परंतू मुंबईत नाटक करत असताना तिला कळलं की, तिला ज्या पद्धतीचं नाटक करायचं आहे, ते तिला करायला मिळत नाही. मग तिच्यातली लेखिका आणि दिग्दर्शिका जागी झाली. रसिका गंमतीत म्हणते, आता दिग्दर्शन मला आवडू लागलंय. कारण पाॅवर पोझिशन आहे !
महाराष्ट्रात १८० हून अधिक वर्षांची नाट्य परंपरा आहे. पण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर रसिकाची पावलं दिल्लीकडे एन एस डी मध्ये वळली. असं का?… असाच काहीसा प्रश्न तिला एन. एस. डी. च्या परीक्षेतच वामन केंद्र यांनी देखील विचारला होता. यावर रसिका म्हणते की, मी महाराष्ट्रातलं नाटक बघितलं होतं आणि करतही होते. पण मला भारतभरातलं नाटक बघायचं होतं आणि त्यानंतर इंटरनॅशनल लेवलला नाटक कसं होतं?… हे बघायचं होतं, त्यात भाग घ्यायचा होता. जे मला एन.एस.डी. मुळे शक्य झालं.
अशाप्रकारे अभिनयाच्या वेगवेगळ्या पद्धती बघाव्यात वेगवेगळे फॉर्म्स बघावेत, हे तिच्या मनात फार पूर्वीपासून होतं. रसिका गंमतीत सांगते की एन. एस. डी. ला गेल्यावर मला कळलं की, मला काहीही येत नाही. एकाच पद्धतीचं नाटक आपल्याला करता येतं. एन.एस.डी.च्या तीन वर्षांनी रसिकाला नाटक शिकवलंच नाही, तर आंगिक, वाचिक अभिनयाशिवाय सात्विकही किती महत्त्वाचा आहे आणि त्याचा वापर करून आपण आपलं नाटक करू शकतो, हा आत्मविश्वास दिला. या सोबतच विविध राज्यातल्या लोकांशी माझी मैत्री झाली. माझा बालिश संकल्पनांना घेऊन, माझंच कसं खरं हा जो एक ‘पुणेकरपणा” होता तो तुटायला तिथून मदत झाली. माणूस म्हणून ग्रो व्हायला जास्त मदत झाली.
रसिका पडद्यावर अभिनय करताना दिसते. अगदी छोट्या पडद्यावरही दिसते. काही वेब सिरीज मधूनही आपण तिला पाहीलं आहे. तरीही नाटक तिच्यासाठी मेन डिश आहे. त्याबद्दल रसिका मिश्किल पणे सांगते की, नाटक हा माझा फॉर्म आहे. मला याच माध्यमातून जास्त एक्सप्रेस होता येतं. पैसे संपले की मी वेब सिरीज करते सिनेमा करते आणि मग तो पैसा पुन्हा नाटकात उडवते. असं एक माझं सिम्पल गणित आहे !
हसवून मनोरंजन करणारं नाटक आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना मांडणार नाटक असे दोन सर्वसाधारण प्रघात आहेत. दोन्हीकडे पाहण्याचा रसिकाचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ती म्हणते की, मी माझ्यापुरतं त्या दोघांचं एक मिश्रण केलेलं आहे. मुळातच मनोरंजन म्हणजे फक्त हसणं नाही, तुम्ही रडलात-रागवलात तरी तुमच्या मनाचं रंजनच होतं. तेंव्हा शक्य तितक्या वास्तवाच्या जवळ जाणारं नाटक करावं आणि त्यातून प्रेक्षकांना हसता येईल, रडता आणि विचार करता येईल असा मेळ घालावा. हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे माझं काम अगदीच कमर्शियल या स्पेसमध्ये येत नाही किंवा एक्सपिरिमेंटल या स्पेसमध्येही येत नाही. नाटक सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे तरंच खरी गंमत आहे आपल्या एक्सपिरिमेंटची !
दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर रसिका अंतर्बाह्य हादरली होती. परिणामी एक संवेदनशील कलाकार म्हणून तिच्या कलाकृतींवरही तो परिणाम जाणवतो. त्या दुर्दैवी घटनेनंतर रसिकाने ‘म्युझियम ऑफ स्पिशीज इन डेंजर’ हे नाटक दिग्दर्शित केलं. या नाटकावर काही लोकांनी तर प्रबंध केले आहेत. रसिका म्हणते, हे नाटक भारतातील विविध बायकांवर बोलत राहतं आणि हे नाटक हसवतंही आणि रडवतंही !… याच्या प्रत्येक प्रयोगांनंतर अनेक बायका पुढे यायच्या. जात धर्म क्लास या भिंती तोडून प्रत्येक बाईकडे एक अनुभव असतो तो त्या मांडायच्या.
रसिकाचं असंच एक दुसरं नाटक म्हणजे ‘अंधेरे के रोमियो जुलियट’ हे नाटक रसिकाने खर्ड्याच्या घटनेनंतर बनवलं. प्रेमात असलेल्या कोवळ्या मुलांना आपण मारून टाकतो आणि दुसरीकडे आपली संपूर्ण सिनेमा इंडस्ट्री प्रेम या एकाच विषयावर अनेक वर्षांपासून चालते आहे. या विरोधाभासाकडे अंगुली निर्देश करत रसिका पुढे म्हणते की, आपल्याकडे रस्त्यामध्ये दोन माणसं मारामारी करत असतील तर चालतात मात्र कुणी रस्त्यात किस केलं तर आपल्याला भयानक अनकम्फर्टेबल होतं !!! असे आपण एक समाज मन म्हणून खूप हिपोक्रेटीक आहोत. ज्याचा मीही एक हिस्सा आहे. तेंव्हा मला असं वाटतं की, आपण या विषयांवर बोललो नाही तर मला झोप येणार नाही आणि तिथूनच ही नाटकं बनतात.
रसिका नाटक बनवत असताना घाई करत नाही. सहा-सहा महिने तालमी चालतात. त्यात विविध विचारधारांची माणसं असतात. या तालमींमध्ये नाटकात मांडलेल्या विचारांवर संवाद होता, चर्चा होतात. त्यातून माणसं घडत जातात. रसिका अभिमानाने सांगते की, मी माझ्या नाटकातले पुरुष चांगल्या अर्थाने बदलताना पाहिले आहेत. मला नाही वाटत की, इतर कुठल्या थिएटर ग्रुपमध्ये तिथले पुरुष स्वतःच्या बॅगमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स ठेवतात, म्हणजे कुठल्या मुलीला गरज लागली तर असावं म्हणून… हे माझ्या ग्रुपमध्ये घडतं. मी इतक्या मूलभूत बदलावर काम करते ! रसिकाच्या मते पैसा वगैरे सगळं कमावता येतं पण चांगली माणसं घडवता आली पाहिजेत.
सोशल मीडिया हे रसिकाला खूप वेळ खाऊ माध्यम वाटतं. तिच्या मते सोशल मीडिया तुमच्या वाचनाचा सगळा वेळ खाऊन टाकतो. रसिका सांगते की सोशल मीडियाचा वापर मी इन्फॉर्मेशन देण्यापुरता करते म्हणजे एखादं नाटक जर येणार असेल तर त्याची माहिती मी त्यावर देते. अर्थात कधी कधी न राहवून ,काही राजकीय मतं मांडताना मी ट्रोल होतेच ती वेगळी गोष्ट आहे !
मनोरंजनाच्या माध्यमातून मांडलेल्या ‘सेक्स’ या विषयावर सडेतोड विचार मांडताना रसिका सांगते की, आपल्याकडे इन जनरलच या विषयावर थोडं लाजत बोलण्याची पद्धत आहे. सेक्स म्हणजे फक्त शारीरिक क्रिया असं न धरता, त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत… म्हणजे तुमचं जेंडर येतं. लहानपणापासून एक मुलगा आणि मुलगी म्हणून वेगवेगळे वाढवले जातात त्याची चर्चा येते. मुलींना फक्त गुलाबी रंगच आवडतो हे कोणी ठरवलंय?… आता मला मुलगी आहे तर तिला गिफ्ट सगळे गुलाबी रंगाचे येतात. मग अशा या मुलींनाही वाटू लागतं की, मला गुलाबी रंग आवडतो. हा सगळाच जेंडरच्या अभ्यासाचा भाग आहे. अर्थात नाटक सिनेमांनी या विषयावर बोललंच पाहिजे, ही काय त्यांची जबाबदारी असू शकत नाही. परंतू या विषयावर अधिक मोकळेपणाने बोलण्याची स्पेस निर्माण झाली पाहिजे. एक अशी सेफ स्पेस जिथे छान बोलता येईल. मुलांना पाहून बरं वाटेल की, यात लपवण्यासारखं काहीही नाही. असा कॉन्फिडन्स मात्र ही माध्यम जरूर देऊ शकतात, जे आता ती देत नाहीत.