Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ड्रीम गर्ल टू : एक फसलेले स्वप्न

ड्रीम गर्ल टू : एक फसलेले स्वप्न

Subscribe

हर्षदा वेदपाठक

दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ड्रीम गर्लचा आणलेला भाग दोन हा कोणत्याही स्वप्नामध्ये बसत नसून, ते एक विस्कटलेले स्वप्नच राहतं. त्यातही आयुष्मान खुरानाने बऱ्यापैकी ते स्वप्न सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही कथा आणि पटकथेमध्ये पडलेला खड्डा कोणीच भरू शकत नाही.

- Advertisement -

अभिनय आणि सादरीकरणामध्ये विविधता देणे, यामध्ये आयुष्मान खुराणाचा हात कुणीच धरू शकत नाही. अगदी भारावून टाकणारा त्याचा तो अवतार असतो. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल मध्ये लालची आणि लफडेबाज असलेल्या पुरुषांना, आपल्या लपेट्यात घेणाऱ्या पूजाच्या भूमिकेत आयुष्यमान दिसला होता.. तो अजून देखील अनेकांच्या लक्षात असेल परंतु त्यानंतर त्याचे आलेले चित्रपट काही फारसे चालले नाहीत. त्यात डॉक्टर जी (2022), ॲक्शन हिरो (2022,) चंदिगड करे आशिकी (2021) या आयुष्मान खुराना याने स्वीकारलेल्या कोणत्याही चित्रपटावर नजर टाकता, त्याने निवडलेले विषय आणि सादर केलेला सवंग अभिनय लक्षात राहतो. परंतु गडबड होती ती, चित्रपटाची पटकथा यामध्ये. असंच काहीसं ड्रीम गर्ल टू मध्ये झाले आहे. आयुष्यमान चित्रपटाच्या शेवट पर्यंत लक्षात राहतो, परंतु बाकी गडबड मात्र विसरता येत नाही.

ड्रीम गर्ल टू मध्ये करम आपली प्रेमीका, परी हिच्या बरोबर लग्न करण्यास उत्सुक असतो. मात्र परीचे वडिल लग्नासाठी होकार भरण्यासाठी म्हणून, तीन अटी ठेवतात. चांगली नोकरी, स्वतःचे घर आणि बँकेमध्ये पंचवीस तीस लाख असेल तरच मुलीचे लग्न लावून देतो. यापैकी ऐकही गोष्ट करमकडे नसते. मग पैसे कसे जमवावेत या खटपटीत तो लागतो. त्यात तो, बार मध्ये नाचणे, कोणाबरोबर पूजा म्हणुन खोटं लग्न करणे हे उद्योग करून बसतो. या सगळ्या कामात, ऐकात – एक त्रांगडे निघत जातं आणि शेवटी पैशावर जोर न देता, प्रेमाद्वारे तो परिला जिंकतो हे कथानक आहे.

- Advertisement -

स्वतःच्या भल्यासाठी ज्या काही लोकांना करम भेटतो त्या सगळ्या लोकांना तो फसवतो. आणि या फसवणुकीच्या कथानकाला इतके फाटे फुटले आहेत की, शेवटी कशाचं कोण आणि कोणाचं काय हे अजिबात लक्षात राहत नाही. प्रत्येक सहकलाकाराच्या भूमिकेला वाहवत जाताना पाहायला मिळतं. एक अन्नू कपूर आणि आयुष्यमान खुराना सोडल्यास ड्रीम गर्ल टू मध्ये फाफट पसारा इतका आहे की विचारता सोय नाही. द्वीअर्थी संवाद काहीसे टोचक-बोचक आहेत. तर काही निरर्थक वन लाइनर यांचा उबक येईपर्यंत केलेला वापर फुकट जातो.

भाग एक मध्ये जिथे देवधर्माची, पारंपारिकता दाखवली गेली होती. तिकडे भाग दोन मध्ये सगळ्या नातेसंबंधांचे केलेलं वाह्यातिकरण नजरेत खटकते. बाकी ड्रीम गर्ल एक मधील संस्कारी स्क्रिप्ट पटकथा, भाग दोन मध्ये येऊन करमच्या लालचीपणावरन घसरून पडते.

निर्माता, एकता कपूरच्या अनेक मालिकेचं दिग्दर्शन करणारे राज शांडिल्य यांनी यापूर्वी जनहित मे जारी (2022) हा एकमेव चित्रपट केला आहे. इकडे अशक्त कथा आणि फाफट पसारा असलेली पटकथा यामुळे ड्रीम वर्ल्ड टू हा चित्रपट विस्कटलेले स्वप्नच वाटते.

चित्रपटाची कथा जिथे विस्कटलेली आहे तेथे सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. आसरानी यांची छोटेखानी भूमिका देखील उत्तम वाठली आहे. अनु कपूर,अभिषेक बॅनर्जी, परेश रावल, राजपाल यादव, सीमा पहावा, यांनी सहाय्यक कलाकार म्हणून उत्तम साथ दिली आहे.

अनन्या पांडे हिची परी हि व्यक्तिरेखा अधून मधून येत असते. परंतु त्यात ती परकीच वाटते. आयुष्यमान खुराना हा उत्तम अभिनेता आहे. ड्रीम गर्ल एक मध्ये त्याने सगळ्यांनाच खिळवून ठेवले होते. परंतु ड्रीम गर्ल टू मध्ये, पूजा म्हणून त्याच्या दिसण्या वागण्यातला चार्मच निघून गेलेला पाहायला मिळतो. संवाद आणि पटकथेतल्या कमीने त्याच्यातला अभिनय झाकोळला जातो. आयुष्मानने आपल्या परीने जीव तोडून मेहनत करत अभिनय केलाय. परंतु हि एकमेव गोष्ट चित्रपटाला वाचवू शकत नाही.

ड्रीम गर्ल एक मधील निर्मिती मूल्य, सेटस्, रंगीबेरंगी वातावरण येथे हरवलेलं दिसते. त्यामुळे चित्रपट अधिकच नीरस जाणवू लागतो. पार्ट एक मधील टेलिफोन हेच गाणे इथे पुन्हा घेण्यात आले आहे. ते एक गीत वगळता, पार्श्वसंगीत आणि इतर संगीत एकदमच कमकुवत आहेत.

आगळे वेगळे विषय आणि सादरीकरण ही आयुष्यमान खुराणाची अभिनेता म्हणून खासियत राहिली आहे. परंतु ड्रीम गर्ल टू या चित्रपटाबाबत त्याचा हा आराखडा चुकलेला दिसून येतो. ॲक्शन हिरो नंतर आयुष्यमानला चित्रपट निवडीबाबत खूपच सावध राहण्याची गरज आहे असे दिसून येते. दिग्दर्शक राज यांनी या चित्रपटामध्ये जे वन लाईन पंचेस दिलेले आहेत, ते एका मालिकेसाठी म्हणून बरे वाटतात. परंतु चित्रपटांमध्ये ते उपरे ठरतात. एकंदरीत निर्माता एकता कपूर आणि दिग्दर्शक राज शाडील्या या जोडगोळीने अनेक हिट मालिका दिल्या आहेत.परंतु ड्रीम गर्ल टू साठी हि जोडवळी फिट ठरत नाही. गदर 2, ओह माय गॉड तसेच रॉकी और रानी की प्रेम कहानी हे तीन चित्रपट जोरात सुरू आहेत. ते कंटेंटच्या जोरावर. परंतु तोच कंटेंट ड्रीम गर्ल टू मध्ये गायब असल्याने, प्रेक्षक त्याला कितपत साथ देतात ते या आठवड्यात स्पष्ट होईल.

 

- Advertisment -