युवा पिढीचा लोकप्रिय युट्युबर एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. येत्या काळात एल्विशच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता दिसते आहे. कारण, गाझियाबाद कोर्टाकडून युट्युबर एल्विश यादववर FIR दाखल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. माहितीनुसार, साप तस्करी प्रकरणात एल्विशचे नाव समोर आल्याने तो आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. अशातच आता जुन्या खटल्यातील एका साक्षीदाराने गाझियाबाद कोर्टात त्याला धमकावल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोर्टाने तपासाची जबाबदारी नांदग्राम पोलिस स्थानकावर सोपावली आहे. (Elvish Yadav in trouble Court issues order to file FIR against him)
नेमके प्रकरण काय?
नोएडातील सेक्टर 49 पोलीस स्थानकात दाखल केलेल्या एफआयआरनुसार फिर्यादी आणि साक्षीदार सौरभ गुप्ताने आरोप केला होता की, त्याच्या कारचा कुणीतरी पाठलाग करत आहे. इतकेच नव्हे तर, त्याला जीवे मारण्याची धमकीसुद्धा आली आहे. या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यामुळे सौरभ गुप्ताने कोर्टात धाव घेतली. ज्यावर अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या कोर्टाने बीएनएसएस कलम 173 (4) अन्वये नांदग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता एल्विश यादववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी अटकेत असलेल्या सदस्यांपैकी काहींनी चौकशीदरम्यान एल्विश यादवचा या तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले. यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाई करत एल्विश यादवला अटक केली होती. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असून याच प्रकरणाचा साक्षीदार सौरभ गुप्ता आहे. ज्याने गाझियाबाद कोर्टात अर्ज दाखल करताना म्हटलंय, ‘मला धमकावलं जातंय. माझ्या जीवाला धोका आहे. मी राहत असलेल्या परिसराची काही लोकांकडून रेकी केली जातेय’.
याबाबत सौरभ गुप्ताला कोर्टाने विचारले की, ‘तुम्ही न्यायालयात का येत आहात? आणि तुम्हाला धमक्या दिल्या जात असतील तर तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी’. यावर सौरभ गुप्ताने काही कागदपत्रे सादर केली आणि नांदग्राम पोलीस स्थानकात तक्रार दाखल करूनही कोणतीचं सुनावणी न झाल्याचे सांगितले. शिवाय सोशल मीडियावरून आपल्याला धमकावले जात आहे आणि आपल्या जीवाला धोका असल्याचे तो वारंवार कोर्टाला सांगत होता. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याने आपले फेसबूक अकाउंटदेखील बंद केल्याचे म्हटले आहे. गुप्ताच्या तक्रारीची अखेर कोर्टाने दखल घेतली आणि नांदग्राम पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवून संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही पहा –
Republic Day 2025: 26 जानेवारीला आवर्जून पहा बॉलिवूडचे हे देशभक्तीपर सिनेमे