घरमनोरंजनगोंधळलेल्या अवस्थेलाच स्ट्रॅटेजी बनवली - स्मिता गोंदकर

गोंधळलेल्या अवस्थेलाच स्ट्रॅटेजी बनवली – स्मिता गोंदकर

Subscribe

खेळात हुशार, बोलण्यात मृदू आणि बिग बॉसच्या घरात शेवटच्या दिवसापर्यंत राहणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिला इतर सदस्यांनी सतत गोंधळलेली म्हटलं. मात्र हिच कमेंट तिने पुढे खेळामध्ये स्ट्रॅटेजी म्हणून वापरली. बिग बॉसच्या घरातील स्मिताचा प्रवास ‘आपलं महानगर’ने जाणून घेतला.

तुझा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास कसा होता?

Bigg-Boss-Marathi
प्रातिनिधिक फोटो

‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास अविस्मरणीय होता. या घराने मला खूप काही दिलं. छान छान आठवणी दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील सगळ्या सदस्यामुळे माझी भाषा सुधारली. सुरुवातीला मराठी चांगलं येत नसल्यामुळे अनेक गैरसमज झाले. कोणी काही बोललं तर मला लगेच अर्थ कळायचा नाही. मग गैरसमज वाढायचे. पण आता मला नीट मराठी समजतंही आणि बोलताही येतं. या सगळ्याचं क्रेडिट मी उषा नाडकर्णी यांना देते. ‘बिग बॉस’च्या घरात शंभर दिवस राहणं हा माझा करियरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता.

तू नेहमी गोंधळलेली असतेस, असा आरोप कायम तुझ्यावर केला गेला?

खरं तर मला कोणाला दुखवायला आवडत नाही. त्यामुळे नॉमिनेशनला किंवा एखाद्या टास्कमध्ये एका सदस्याचं नाव घेतलं, तर त्याला वाईट वाटेल. हा विचार केल्यामुळे उत्तर द्यायला मला उशीर व्हायचा. माझ्या या स्वभावामुळे मी सगळ्यांना confused (गोंधळलेली) वाटले. मला confused म्हणण्यामध्ये सगळ्यात मोठा हात सईचा आहे. प्रत्येक नॉमिनेशनला मला नॉमिनेट करताना तिच्याकडे दुसरं काही कारण नव्हतं. म्हणून ती मला मी confused आहे, असं म्हणून नॉमिनेट करत होती. खरं तर मी कधीच confused नव्हते. मी कायम दुसर्‍यांचा विचार केला.

- Advertisement -

‘बिग बॉस’च्या घरात तुझी स्ट्रॅटेजी काय होती?

बिग बॉसच्या घरात जायचं हे जेव्हा ठरलं त्या दरम्यान मी माझ्या वेगळ्या कामात व्यस्त होते. त्यामुळे घरात जाताना अशी काही स्ट्रॅटेजी ठरली नव्हती. पण घरात गेल्यावर एकंदर वातावरण बघून आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असायला हवी, असं वाटू लागलं. त्याच दरम्यान माझ्यावर मी confused असल्याचा आरोप सुरू झाला आणि हाच आरोप मी माझी स्ट्रॅटेजी म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा मी गोंधळलेली असण्याचं नाटक केलं. तसंच विकेंडच्या डावाला महेश सरही माझी यावरून फिरकी घ्यायचे. पण मी हे सगळं खूप एन्जॉय केलं आणि ही माझी स्ट्रॅटेजी कामी आली.

घरात असताना नेमकं काय चुकलं असं तुला वाटतं?

घरातून बाहेर आल्यावर या सगळ्याचा विचार केल्यावर वाटतं, घरात जाताना मी अभ्यास करून जायला हवं होतं. ‘बिग बॉस’चे नियम, टास्क याचा अभ्यास न केल्यामुळे घरात राहताना थोडा त्रास झाला. पण मी जरी अभ्यास केला नसला तरी मी स्ट्राँग आहे. मी खेळाडू असल्यामुळे टास्क करताना त्रास झाला नाही. आणखी एक चूक म्हणजे मी सगळ्यांचा विचार करण्यात स्वतःचं खूप नुकसान केलं. ‘बिग बॉस’च्या घरातील खरा खेळ मला शेवटी शेवटी समजू लागला. आणखी काही दिवस राहिले असते. तर कदाचित मीच जिंकले असते.

- Advertisement -

स्मिता आता पुन्हा प्रेक्षकांना कधी भेटणार?

घरातून बाहेर आल्यावर अनेक नवीन ऑफर्स माझ्याकडे आल्या आहेत. नवीन चित्रपटाचं शूट आता सुरू होईल. ‘बिग बॉस’च्या घरात असल्यामुळे माझ्या एका चित्रपटाचं डबिंग थांबलं होतं, ते आता पूर्ण करायचं आहे. माझी प्रेक्षकांना एक विनंती आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना माझ्यावर जेवढं प्रेम केलं, असंच प्रेम पुढेही माझ्यावर करा. लवकरच मी अनेक चित्रपट घेऊन तुमच्यासमोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -