घरमनोरंजनमन में है विश्वास! - विश्वास जोशी, निर्माता-दिग्दर्शक-लेखक

मन में है विश्वास! – विश्वास जोशी, निर्माता-दिग्दर्शक-लेखक

Subscribe

‘फुलराणी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक-लेखक विश्वास जोशी यांनी ‘नटसम्राट’, ‘Whats Up लग्न’ अशा दर्जेदार कलाकृती आपल्याला दिलेल्या आहेत. सोबतच ‘घे डबल’ हा मराठी सिनेमाही निर्मिती प्रक्रियेत आहे. गेली दीड-दोन वर्ष चर्चेत असलेल्या फुलराणीच्या निर्मितीसोबतच लेखन-दिग्दर्शनातही विश्वास जोशी यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘फुलराणी’निमित्त ‘आपलं महानगर- माय महानगर’ला त्यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांच्यासोबत काही गप्पा झाल्या. त्या संवादातून उलगडत गेलेले विश्वास जोशी आपल्यासमोर ठेवत आहोत.

मुळातच उच्चविद्याविभूषित असलेले विश्वास जोशी सी. ए. असून ग्लॅक्सो, प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोटक महिंद्रा, रिलायन्स अशा नामांकित कंपन्यांमध्ये फायनान्स क्षेत्रात त्यांनी तब्बल पंचवीस वर्षे योगदान दिले आहे. फायनान्स क्षेत्रात साचलेपणा आल्यावर त्यांची पावलं मराठी चित्रपटनिर्मितीकडे वळली. कारण कलेची आवड असल्यामुळे नाटक-सिनेमा पाहण्याचा छंद होताच. कोणतीही ओळख नसताना ते थेट जाऊन महेश मांजरेकरांनाच भेटले. महेश मांजरेकरांनी त्यांच्यासमोर हिंदीत लिहिलेला ‘नटसम्राट’ उलगडून दाखवला तेव्हा विश्वासजींनी तो मराठीमध्ये निर्मित करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांची अट फक्त एकच होती ते म्हणजे मुख्य भूमिकेमध्ये नाना पाटेकर काम करणार असतील तर… आणि पुढे ‘नटसम्राट’ने जो इतिहास रचला, तो आपल्या सर्वांना माहीतच आहे.

- Advertisement -

तसा कॉर्पोरेट क्षेत्रातील फायनान्स ते चित्रपट हा विश्वास जोशींचा प्रवास धाडसाचाच म्हणायला हवा. ‘नटसम्राट’च्या निमित्ताने मराठी चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या विश्वास जोशींनी कालांतराने लेखन आणि दिग्दर्शनाचीही कास धरली. याबद्दल ते म्हणतात की, “लेखन वगैरे माझ्यामध्ये उपजत होतं, असं मला वाटत नाही. पण कुठेतरी सबकॉन्शिअसमध्ये असावं. कारण कॉलेजला असताना स्किट्स वगैरे लिहायचो किंवा गणपतीमध्ये नाटक करायचो. अर्थात, हे सारे हौशी प्रकार होते. पण नटसम्राट करत असताना मी, ती सारी प्रोसेस महेशसोबत बघितली; कारण मला शिकायचं होतं. त्याच्याच पोस्ट-प्रोडक्शनच्या वेळेला मी ‘Whats Up लग्न’ या माझ्या दुसऱ्या चित्रपटाची गोष्ट लिहून काढली होती. त्याबद्दल मी एक-दोन डायरेक्टर्सबरोबर पण बोललो. परंतु त्या गोष्टीबद्दलचा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होता. मग लक्षात आलं की नाही… मला जे सांगायचंय ते, माझ्या पद्धतीनं सांगितलं गेलं तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. मग माझ्या एका मित्राने, तूच डिरेक्ट कर असा सल्ला मला दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्यानेच मला एक मातब्बर डीओपी दिला. ज्याने सगळी तांत्रिक बाजू मी सांभाळेन, तुम्ही फक्त कथा आणि कलाकारांचं पाहा, असा मला विश्वास दिला. अशा प्रकारे विश्वास जोशींचा लेखन आणि दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला.

आता विश्वास जोशीनिर्मित आणि दिग्दर्शित ‘फुलराणी’ हा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहे. ‘नटसम्राट’ आणि ‘फुलराणी’मधील साम्य म्हणजे हे दोन्ही चित्रपट जुन्या नाटकांवर आधारित आहेत. यावर ते म्हणतात की, “बेसिकली महेशकडे नटसम्राटची स्क्रिप्ट तयार होती आणि नाटकापेक्षा सिनेमा कसा वेगळा होऊ शकतो,याची त्याने मला कल्पनाही दिली होती. तेव्हा मला जाणवलं की, दिग्दर्शकाला असं व्हिजन हवं की, लिखाणाआधी तो त्याला स्वतःला पाहता आला पाहिजे. नटसम्राटच्या बाबतीत ते घडलं. ‘फुलराणी’विषयी म्हणाल तर, सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे इनामदार यांचं फुलराणी हे नाटक मी स्वतः पाहिलं होतं. ती गोष्टच मला त्यावेळी खूप भावली होती. माझ्या कुठेतरी सबकॉन्शिअसमध्ये होती. ती कथा खूप छान आणि एव्हरग्रीन आहे. म्हणूनच मी विचार केला की, आजच्या पिढीला साजेसं असं काही नवीन सुचलं तर ‘फुलराणी’ का बनवू नये?… “

- Advertisement -

फुलराणीचे पहिल्या फेरीतील लेखन विश्वास जोशी यांनी २०१९मध्ये पार पाडले. त्यानंतर गुरुनाथ ठाकूर यांना घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने लेखनाला पुन्हा एकदा सुरुवात केली. त्याला जवळजवळ सात आठ महिने लागले. हा सारा कोरोनाचा काळ होता. संपूर्ण कास्टिंग पार पडलं. कोरोनाची पहिली लाट ओसरताना चित्रीकरणाची सुरुवात झाली. त्यासाठी खास लोणावळ्याला मोठा सेटही लावण्यात आला. सारे कलावंत येणार असं ठरलं आणि पुढल्या दिवशी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला. या घटनेबद्दल विश्वासजी सांगतात की, “तो सेट निकामी ठरला कारण तो त्या पर्टिक्युलर लोकेशनसाठी त्या डायमेन्शन्स प्रमाणे केला होता. पुढे त्यातला फक्त दहा टक्केच आम्हाला वापरता आला. बाकी काही वापरू शकलो नाही.” त्यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला, कारण यात तब्बल आठ ते दहा लाख रुपयाचं नुकसान तर झालंच; परंतु त्याहीपेक्षा त्याची क्रिएटिव्ह प्रोसेस थांबली. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे सर्व कलाकार, जे पुढील २५ ते ३० दिवसांमध्ये नव्वद टक्के चित्रपट पूर्ण होईल अशी आस लावून बसले होते, त्यांचे सर्व रस्ते बंद झाले. खुद्द विश्वास जोशी यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी दीड-दोन महिन्याचा कालावधी लागला. विश्वास जोशी सांगतात, “त्या दीड-दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मी पुन्हा एकदा फुलराणीचं स्क्रिप्ट वाचलं आणि मला स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण झाला की, ही स्क्रिप्ट नक्कीच चालेल. आपण पुढे जायला हवं.”

‘फुलराणी’ कोण साकारणार?… हा विषय बराच काळ गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. दोन आठवड्यांपूर्वी कळलं की, ‘फुलराणी’ म्हणजेच कथेतील ‘शेवंता तांडेल’ ही व्यक्तिरेखा ‘हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर साकारणार आहे. या निवडीबद्दल विश्वासजी सांगतात की, “आपल्याकडे मराठीमध्ये जवळजवळ दहा ते बारा मातब्बर गुणी अभिनेत्री आहेत, ज्या कोणतीही भूमिका अगदी सहज साकारू शकतात. पण या मातब्बरांपैकी कोणीही जेव्हा पडद्यावर दिसेल, तेव्हा ती अभिनेत्री आधी दिसेल आणि मग ‘शेवंता तांडेल’ ही व्यक्तिरेखा दिसेल. त्याऐवजी मला असा चेहरा हवा होता की, आधी ‘शेवंता तांडेल’ दिसेल आणि मग ती अभिनेत्री कोण आहे, हे लोकांना कळेल. कुणीतरी नावाजलेली अभिनेत्री ‘फुलराणी’ करतेय, यापेक्षा आता असं झालंय की, ‘फुलराणी’ची भूमिका प्रियदर्शनी करते आहे, असं लोकांना वाटणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.” अर्थात, अनेक जणींच्या स्पर्धेतून ‘फुलराणी’ म्हणून वर्णी लागण्यासाठी प्रियदर्शनी इंदलकरला ऑडिशनमधून जावंच लागलेलं आहे.

प्रेक्षकांनी फुलराणी का पहावा? काय वेगळेपण आहे त्याचं? असं विचारलं असता ते म्हणाले, “ही फुलराणी, ती पिरीओडिक फुलराणी नाही. ती आजची तरुण मुलगी आहे, जी मोबाईल वापरते, अतिशय ट्रेंडी मुलगी आहे. अग्रेसिव्ह आहे, पण तेवढीच सिंसियर आणि इनोसंट आहे. तिला मॉडलिंगकडे जाण्याची संधी मिळते. त्यामुळे मॉडेलिंग आणि ग्रुमिंग, असे विषय त्यात असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे वेगळे व्हिजुअल्स याच्यामध्ये पाहायला मिळतील. नाटकातील एकही वाक्य आम्ही यात वापरलेलं नाही, कारण पिरियड वेगळा आहे. आमची गोष्टही वेगळी आहे. सेकंड हाफ तर पूर्णपणे वेगळा आहे; त्यामुळे नाटकाच्याही पुढची गोष्ट यात आपल्याला पाहायला मिळेल.”

विश्वास जोशींनी चित्रपट क्षेत्रात ‘नटसम्राट’च्या माध्यमातून ज्या विश्वासाने पाऊल टाकलं आणि चांगली कलाकृती निर्माण केली जाऊ शकते, हा विश्वास प्रेक्षकांना दिला. तसंच फुलराणीच्या निर्मिती प्रक्रियेतील आव्हानांना कच न खाता स्वतःचा विश्वास ढळू दिला नाही. आशा आहे की, ती ‘फुलराणी’ प्रेक्षकांच्या विश्वासास पात्र ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -