घरमनोरंजननव्या दमाच्या तरुणाईचा 'फतवा'! आपलं महानगर- माय महानगर लाइव्हच्या स्टुडिओमधून

नव्या दमाच्या तरुणाईचा ‘फतवा’! आपलं महानगर- माय महानगर लाइव्हच्या स्टुडिओमधून

Subscribe

ठरल्याप्रमाणे ‘फतवा’ चित्रपटातील निवडक कलाकारांची टीम ‘माय महानगर लाईव्ह’च्या स्टुडिओमध्ये हजर झाली आणि गप्पांना सुरुवात झाली. येत्या ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फतवा’ नव्या दमाच्या तरुणाईचा आहे. प्रतीक गौतम या तरुणाच्या गेल्या पाच वर्षांच्या मेहनतीतून या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. मुळातच इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेला प्रतीक ग्रामीण भागातून आलेला आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये स्वतः प्रतीक गौतम नायकाच्या भूमिकेत, श्रद्धा भगत नायिकेच्या भूमिकेत तर निखिल संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच छाया कदम हे अभिनय निपुण व्यक्तिमत्व एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. ‘फतवा’ कथा प्रतीक गौतमचीच असून, या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. पहिल्याच प्रयत्नात लेखक, दिग्दर्शक आणि नायक अशा तीनही जबाबदाऱ्या त्याने एकट्याने पेलल्या आहेत.

- Advertisement -

प्रतीक चित्रपटाच्या कथेतील गुपित सफाईने लपवून सांगत होता की, मी दाखवलेली गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कुठे ना कुठे घडते. यातील प्रत्येक कॅरेक्टर आपल्यातच आहे किंवा आपल्या जवळ कुठेतरी आहे. हा प्रेमाचा फतवा आहे. मला त्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकावासा वाटला. आणि मुख्य म्हणजे बोध देण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करावासा वाटला.

दिग्दर्शनाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतीकपुढे मोठ्ठ आव्हान होतं, ते म्हणजे… एक्टर्स असतील किंवा टेक्निशियन सगळेच त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी होते. प्रतीक सांगतो की, “ या सर्वांनी मला दिग्दर्शक म्हणून स्वीकारावं हे माझ्यासमोरच पहिलं चॅलेंज होतं. आणि दुसरं चॅलेंज म्हणजे, माझ्या नजरेला ही कथा जशी दिसतेय, तशी ती पडद्यावर उतरवण्यासाठी त्यांच्याकडून तसं काम करून घेणं. खरंतर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे, त्यात मी तालुक्याच्या ठिकाणी राहणारा. घरामध्ये चित्रपटाची पार्श्वभूमी नसल्यामुळे मला खूप सारी चॅलेंजेस आली. जी आपल्या एका संवादात मला सांगणं कठीण आहे.”

- Advertisement -

प्रतीक नवखा असूनही त्याच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट करावा असं तुला का वाटलं?… असा प्रश्न छाया कदमला विचारला असता, ती म्हणाली, “ काय आहे ना, मी जेव्हा नवीन होते तेव्हा मी खूप काही कुठून तरी शिकून आले होते असं नव्हतं. मी नवीन असताना माझ्यावरही कोणीतरी विश्वास ठेवला आणि मला काम दिलं. जसं की, मी ‘बाईमाणूस’ नावाचा सिनेमा केला होता. अरुण नलावडे यांनी तो दिग्दर्शित केला होता. त्यातला उत्तम रोल माझ्या वाट्याला आला होता. आजही मला प्रश्न पडतो की, अरुण दादाला का माझ्यावर विश्वास ठेवावासा वाटला की, मी तो रोल उत्तम करेन?… म्हणूनच मला असं वाटतं की, जर माझ्यावर कुणी तरी विश्वास ठेवलाय, तर मी का या नवीन मुलांवर विश्वास ठेवू नये…? आणि ती आपल्यासाठी नवीन असतात. पण त्या मुलांनी मात्र कथेवर खूप काम केलेलं असतं. चांगलं दोन-तीन वर्षे त्या प्रोजेक्टवर काम केलेलं असतं. त्यामुळे ते पूर्ण ताकदीने उतरलेले असतात. उलट बऱ्याचदा असं होतं ना की या नवीन मुलाकडूनच खूप काही शिकायला मिळतं.”

यापुढेही जाऊन छाया तिच्या अनुभवातून सांगते की, बऱ्याचदा तर दिग्गज दिग्दर्शकांकडूनही अनुभव असूनही काही गोष्टी राहून जातात. मात्र नवीन मुलं असं काही काम करून जातात की, यांना हे सुचलंच कसं, याचं आश्चर्य वाटतं !

या चित्रपटाला नायकासोबतच खलनायकही नव्या दमाचाच मिळालेला आहे. खलनायकाची भूमिका साकारणा निखिल संजय प्रतीकला ‘काहूर’ या शॉर्टफिल्म दरम्यान सापडला. टाईमपास म्हणून सहज ऑडिशन द्यायला गेलेल्या निखिलची ‘फतवा’मधील ‘रमेश या खलनायकी भूमिकेसाठी निवड झाली.

शूटिंग दरम्यान आठवणीत राहिलेला छाया कदम बद्दलचा एक किस्सा निखिल सांगत होता, “छाया मॅम खूप मोठ्या आर्टिस्ट आहेत. त्या मला कॉलर पकडून, मारत आहेत असा सीन होता. त्या एवढ्या रोलमध्ये घुसल्या होत्या की, त्यांनी माझ्या कानाखाली बऱ्याचदा मारलं. अर्थात त्या देत असलेल्या प्रत्येक झापडीला कारणीभूत मीच होतो. कारण मी जेवढे रिटेक द्यायचो तेवढ्या वेळा मला पुन्हा पुन्हा झापड खावी लागायची. त्या जेव्हाही कॉलर पकडत होत्या, तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांचं नख माझ्या छातीला लागायचं. टेक वर टेक होत गेले आणि जेव्हा शेवटचा शॉट ओके झाला, तेव्हा माझ्या छाती मधून रक्त येत होतं. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी मला सॉरी म्हणत सगळ्यांसमोर मिठी मारली. एवढ्या मोठ्या आर्टिस्ट आणि सॉरी म्हणतात मलाच खूप वाईट वाटलं !” निखिलने ही घटना त्याच्या गावरान शैलीत अगदी प्रांजळपणे मांडली. पण त्यातील मर्म हे की, व्यक्तिरेखा करणं आणि ती जगणं यात खूप अंतर असतं. व्यक्तिरेखा जिवंत करण्याची किमया छाया कदम या अभिनेत्रीला बखुबी जमली आहे. छाया याबाबत ओशाळून म्हणते की, “ अरे, खरं तर असं व्हायला नको पण माझ्याकडून हे झालं खरं !… अर्थात तो सीन करत असताना माझ्या ते लक्षातही आलं होतं. पण मी थांबले तर पुन्हा रिटेक होईल, म्हणून मी ते कंटिन्यू केलं. पण जसा टेक संपला, मी त्याला मिठी मारून सॉरी म्हटलं. आणि मग मीही विचार केला, हा नवीन मुलगा होता म्हणून ठीक, जर एखादा सीनियर ऍक्टर असता तर त्याने नसतं सहन केलं…!”

या चित्रपटाला नायिकेच्या भूमिकेमध्ये एक नवा चेहरा मिळाला आहे. निया हे नाइकेचे पात्र श्रद्धा भगत साकारते आहे. श्रद्धाला यापूर्वी चित्रपट अथवा अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मात्र तिच्यातील नजाकत आणि तिचा रेखीव चेहरा पाहता प्रतीकला त्याच्या कथानकातील ”निया तिच्यामध्ये दिसली. श्रद्धाच्या कुटुंबीयांनाही तिने चित्रपटात जावे अशी इच्छा होती. शूटिंग आधी घेतल्या गेलेल्या वर्कशॉपमुळे श्रद्धामध्ये अभिनयाबद्दल विश्वास निर्माण झाला. अशी माहिती श्रद्धाने चर्चेदरम्यान सांगितली. फतवामध्ये या सर्व प्रमुख भूमिकांमधील कलाकारांसोबतच नागेश भोसले, मिलिंद शिंदे, संजय खापरे, अमोल चौधरी, निलेश वैरागर हे कलाकारही आहेत. वेगवेगळ्या जॉनरच्या सहा सुमधुर गाण्यांचा नजराणा यात असून विशेष म्हणजे अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेली ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे खास आकर्षण आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा डॉ. के. यशवंत, प्रेमा निकाळजे अनुराधा पवार यांनी सांभाळली आहे.

ग्रामीण भागातून येऊन स्ट्रगल करून, चित्रपट क्षेत्राशी काही संबंध नसलेला सामान्य कुटुंबातील पूर्णपणे ‘नॉन फिल्मी बॅकग्राऊंड’ असलेला प्रतीक एक बिगबजेट मुव्ही करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन, इथे उभा राहतो ही विशेष गोष्ट आहे. त्याला रसिक प्रेक्षकांची साथ मिळणार का?…या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या प्रतीक- श्रद्धा या जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवणार का?… रवि आणि निया यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार?… अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या ९ डिसेंबर रोजी मिळतीलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -