घरमनोरंजनरॉयल्टी घेणारा पहिला गीतकार... साहिर लुधियानवी

रॉयल्टी घेणारा पहिला गीतकार… साहिर लुधियानवी

Subscribe

साहिर असे पहिले गीतकार होते ज्यांना, त्यांच्या गीतांसाठी रॉयल्टी मिळत होती.

संतोष खामगांवकर

आज दिवंगत गीतकार साहिर लुधियानवी यांची 42वा स्मृतिदिनआहे. 25 ऑक्टोबर 1980 रोजी साहिरने या जगाचा निरोप घेतला. आजही मनात रेंगाळणारी त्यांची गाणी आवर्जून ऐकली जातात. साहिरच्या शायरीमध्ये अधुऱ्या प्रेमकहाणीची विराणी तर आहेच शिवाय जगण्याची प्रेरणाही आहे. साहिरने त्याच्या गीतांमधून आणि शेरो- शायरी मधून अन्याय आणि असमानतेबद्दल आवाज उठवला आहे. त्या काळी त्याने प्रेमावर भरभरून लिहिले आहे,जे त्यांच्या गीतांमधून दिसून येते. त्यामुळे साहिर लुधियानवी निर्विवाद शब्दांचा जादूगार होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

- Advertisement -

प्रसिद्ध पार्शवगायिका सुद्धा मल्होत्रा आणि साहिरच्या प्रेमाचे किस्से खूप गाजले आहेत. असे मानले जाते की साहिर लुधियानवी यांनी “चलो एक बार फिर से अजनबी बन जाए” हे सुधा मल्होत्रासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर आधारित लिहिले होते. तर दुसरीकडे प्रसिद्ध साहित्यिक अमृता प्रीतम यांचे साहिरवर असलेले प्रेमही जगजाहीर होते. सहा फूट उंच आणि डोक्यावरील केसावरून मागे कंगवा फिरविणारा, विशाल कपाळ असणाऱ्या साहीर यांनी त्या काळी अनेक महिलांना मोहीनी घातली होती. साहिर यांच्या गीतलेखनावर त्यांच्या वैयक्तिक जीवनाची छाप होती.

- Advertisement -

साहिर लुधियानवींचा जन्म एका श्रीमंत जहागीरदार घराण्यात झाला होता. परंतु आई -वडिलांच्या विभक्ती नंतर साहिर आईसोबत गरिबीत वाढले. लुधियानातील शिक्षण आटोपल्यावर साहिर उपजीविकेसाठी छोटी-मोठ्या नोकऱ्या करत असतानाच १९४३ला लाहोरला आले. त्याच वर्षी त्यांचा ‘तल्खियां’ हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांना हळूहळू साहित्यिक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 1945 साली साहिर ‘अदब-ए-लतीफ’ आणि ‘शाहकार’ (लाहोर) चे संपादक झाले. पुढे ‘सवेरा’ नावाच्या दैनिकाचेही संपादक झाले. त्याच पत्रिकेत सरकार विरोधी लेखनासाठी पाकिस्तान सरकारने त्याच्या नावे वॉरंट काढले. त्यानंतर साहिरचे मुंबईला येणे झाले. त्यादरम्यान साहिरने त्यांचे पहिले गीत ‘आजादी की राह’ या हिंदी चित्रपटासाठी लिहिले. ‘नौजवान’ या हिंदी चित्रपटातील “ठंडी हवायें लहरा के आयें ….” खूपच लोकप्रिय झाले. त्यानंतर साहिर लुधियानवींनी ‘बाजी’, ‘प्यासा’, ‘फिर सुबह होगी’, ‘कभी कभी’ अश्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी लिहिली. सचिनदेव बर्मन, एन. दत्ता, शंकर-जयकिशन, खय्याम अश्या मान्यवर संगीतकारांनी साहिरच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे.

साहिर असे पहिले गीतकार होते ज्यांना, त्यांच्या गीतांसाठी रॉयल्टी मिळत होती. साहिरच्या प्रयत्नांमुळे आकाशवाणीवरील गीत प्रसारणाच्या वेळी संगीतकारांसोबतच गीकरांच्याही नावाचा उल्लेख करण्याची प्रथा सुरु झाली. त्यापूर्वी मात्र फक्त गायक-संगीतकारांच्याच नावाचा उल्लेख व्हायचा. संगीत क्षेत्रातील साहिर लुधियानवींचे हे वेगळे योगदान आहे. ज्याचा फायदा आजच्या पिढीला मिळत आहे, हे विसरून चालणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -