जवानांसाठी पहिल्यांदाच ‘भारत माझा देश आहे’ चित्रपटाच्या प्रिमिअर शोचं आयोजन

पांडूरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित भारत माझा देश आहे हा बहुचर्चित चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला असून याचं निमित्ताने या चित्रपटाचा प्रिमिअर शो बेळगाव येथे सैन्य अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आला होता.

या प्रिमिअर शोबद्दल पांडूरंग जाधव म्हणतात की, “सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांवर अनेक चित्रपट आले आहेत. मात्र हा चित्रपट सैनिकांच्या कुटुंबियांवर भाष्य करणार आहे. ज्यांची इथे एक वेगळीच लढाई सुरू असते. सीमेवर जेव्हा युद्धा सुरू असते तेव्हा प्रत्येक क्षण कुटुंबियांसाठी आव्हानात्मक असतो. जेवढा आदर, सन्मान आपण या जवानांचा करतो तितकाच अभिमान आपल्याला या कुटुंबीयांचाही असायला हवा आणि म्हणूनच आमचा हा चित्रपट या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला आहे. आज चित्रपट पाहून अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी, जवानांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी मला भेटून आमच्या घराचे हुबेहूब चित्रण यात पाहायला मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या भावना यावेळी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या. मनाला स्पर्शून जाणारा हा सिनेमा असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. त्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून मी भारावलो असून आमच्या कामाची पावती मिळाली.”

चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तसेच या चित्रपटातून राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन लहान कलाकार प्रेक्षकांसमोर आले आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी व्यक्तिरेखा या लहानग्यांनी साकारली आहे.

एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनी लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे. तर अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी ‘भारत माझा देश आहे’चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे.भारत माझा देश आहे हा बहुचर्चित चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित झाला.

 


हेही वाचा :मुनव्वर फारुकीने पटकावली लॉक अपच्या पहिल्या सीझनची ट्रॉफी