घरमनोरंजनत्याच्या स्वप्नांकडे जाणारी फ्रंटियर मेल!

त्याच्या स्वप्नांकडे जाणारी फ्रंटियर मेल!

Subscribe

ज्या कलाकारांशिवाय भारतीय चित्रपटसृष्टी पूर्ण होत नाही, त्या मोजक्या कलाकारांमध्ये जे महत्त्वाचे नाव येते ते आहे ‘धरम सिंह देओल’ म्हणजे धर्मेंद्र !… आज धर्मेंद्र त्याच्या वयाची ८7 वर्षे पूर्ण करत आहे. तब्बल 6 दशकांहून अधिक काळ धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला त्याच्या चाहत्यांनी स्वीकारले आहे. फक्त त्याच्या चित्रपटांसाठीच नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक जीवनातील अनेक बाबींसाठी तो नेहमीच चर्चेत राहिला. सुरुवातीचा रोमँटिक हिरो आणि १९७४ नंतरचा अ‍ॅक्शन हिरो असे धर्मेंद्रच्या करिअरचे दोन भाग पडतात. अर्थात ‘चुपके चुपके’सारख्या काही हलक्या-फुलक्या चित्रपटांमधून विनोद साकारतानाही आपण त्याला पाहिले आहे. कमावलेल्या यशामागे संघर्षाची जी कहाणी असते ती मौल्यवान तर असतेच, पण त्याला एक वेगळीच चकाकी असते. धर्मेंद्रची कारकीर्दही त्याला अपवाद नाही.

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील, एका गावातील शिक्षकाच्या घरी धरम सिंह देओल याचा 8 डिसेंबर 1935 ला जन्म झाला. लहानपणापासून वडिलांच्याच शाळेत शिकत असल्यामुळे वडिलांची त्याच्यावर सक्त नजर असायची, पण धर्मेंद्रचे मन अभ्यासात कधीच लागले नाही. धर्मेंद्र सिनेमासाठी वेडा होताच, शिवाय चित्रपटांमध्ये हिरो म्हणून काम करण्याची त्याची इच्छा तो बर्‍याचदा आपल्या आईला बोलून दाखवायचा, पण आई, त्याचे वडील नाराज होतील अशी वडिलांची भीती दाखवून त्याला गप्प करायची.

- Advertisement -

त्याचे शालेय शिक्षण पार पडल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी आत्याच्या गावी म्हणजे ‘फगवाडा’ या ठिकाणी राहत होता. सिनेमाच्या वेडापायी तो तिथून लांब जालंदर या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी नेहमी जायचा. असे म्हटले जाते की, १९४९ ला प्रदर्शित झालेला ‘सुरय्या’ आणि श्याम अभिनीत ‘दिल्लगी’ हा चित्रपट त्याने चाळीस वेळा पाहिला होता. पुढे धर्मेंद्रचे महाविद्यालयीन शिक्षण पार पडल्यानंतर त्याला रेल्वेमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली आणि धर्मेंद्रचे आई-वडिलांच्या इच्छेनुसार प्रकाश कौर या तरुणीसोबत लग्नही झाले.

मनामध्ये सिनेमामध्ये जाण्याची खूप इच्छा असूनही संसार, नोकरी आणि गावातली शेती हेच धर्मेंद्रचे विश्व होते. असे म्हटले जाते की, यादरम्यान धर्मेंद्र दिलीप कुमारचा चाहता झाला. त्याचे बरेचसे चित्रपट त्याने पाहिले. घरी आरशासमोर उभा राहून तो दिलीप कुमारची नक्कलही करायचा. त्याच्या गावाकडून मुंबईकडे जाणारी फ्रंटियर मेल त्याला सतत खुणावत होती. अशातच एक दिवस धाडस करून त्याने मुंबईला सिनेमात काम करण्यासाठी जाण्याची इच्छा पुन्हा एकदा आईला बोलून दाखवली. बिचारी भोळी आई मुलाची तगमग बघून म्हणाली,‘तूच सिनेमावाल्यांना अर्ज का नाही करत?… मग ते स्वतः तुला बोलावून घेतील आणि तुझे वडीलही त्यासाठी नकार देऊ शकणार नाहीत.’ यावेळी आईने अगदीच नकारघंटेपेक्षा थोडासादिलासा दिला, हेच धर्मेंद्रसाठी खूप होतं, पण त्याच्यापुढे प्रश्न होता की, अर्ज करू तरी कुणाला?… या विचारांत असतानाच योगायोग म्हणा किंवा मग आईचा आशीर्वादच फळला असावा कदाचित, एक दिवस त्यावेळच्या फिल्मफेअर मासिकात टॅलेंट हंटची एक जाहिरात आली. जाहिरातीमध्ये गुरुदत्त आणि बिमल रॉय या दिग्गजांची नावे होती. धर्मेंद्रचा तर मार्ग खुला झाला. स्वतःचे काही फोटो काढून त्यासोबत आपली सर्व माहिती जोडून त्याने संबंधित ठिकाणी अर्ज पाठवला आणि आश्चर्य म्हणजे धर्मेंद्रची मुंबईला बोळवण झाली. वडिलांची परवानगीही मिळाली. पूर्वी नुसतेच खुणावणारी फ्रंटियर मेल प्रत्यक्षात त्याला मुंबईला घेऊन आली.

- Advertisement -

वरकरणी धर्मेंद्रचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने जरी पहिले पाऊल पडले असले तरीही नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ‘बंदिनी’ या चित्रपटासाठी धर्मेंद्रची निवड तर झाली, पण हा चित्रपट उशिरा सुरू होणार असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याला इतर काम शोधणे गरजेचे झाले. इथूनच धर्मेंद्रचे संघर्षाचे दिवस सुरू झाले. धर्मेंद्रने जुहू जवळच एक घर भाड्याने घेतले होते आणि कामाच्या शोधात तो फिरू लागला. इंडस्ट्रीमधील अनेक लोकांना भेटू लागला. या संघर्षामध्ये त्याला हरीकिशन गिरी गोस्वामी हा पहिला साथीदार मिळाला. म्हणजेच नंतरचा प्रसिद्ध अभिनेता मनोज कुमार. अर्थातच संघर्षाचे हे दिवस फारच कठीण होते. वेळप्रसंगी धर्मेंद्रला अगदी उपाशीही राहावे लागे. उपासमार एवढी की, धर्मेंद्रचे वजनही घटू लागले. एकदा तर या उपासमारीमुळे त्याची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी धर्मेंद्रला औषध नव्हे, तर भरपेट खाण्याची गरज आहे असे म्हटले होते. अशातच धर्मेंद्रचा आत्मविश्वास ढासळला आणि त्याच्या मनात परतीचा विचार येऊ लागला. काही मित्रांनी धर्मेंद्रला शेवटचा पर्याय सुचवला तो म्हणजे, अर्जुन हिंगोरानी यांचा नवा सिनेमा येतोय त्यासाठी तू प्रयत्न कर. धर्मेंद्रनेही यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यात तो यशस्वी झाला. हिंगोरानी यांनी धर्मेंद्रला त्यांचा आगामी चित्रपट ‘दिल भी तेरा हम भी तेरे’साठी नायकाच्या भूमिकेमध्ये घेतले. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम हिच्यासोबत प्रदर्शित झालेला धर्मेंद्रचा हा पहिला चित्रपट 1960 साली प्रदर्शित झाला.

या पहिल्या चित्रपटामुळे धर्मेंद्रला काही फार खास फायदा झाला नाही. कारण हा चित्रपट फार चालला नाही, मात्र नायकाच्या भूमिकेत चित्रपटात काम करण्याचा अनुभव त्याच्या पदरी पडला, त्यावेळी धर्मेंद्रसाठी हेही नसे थोडके!… धर्मेंद्रचा संघर्ष चालू होता. ते एक वर्ष धर्मेंद्रसाठी परीक्षेचा काळ ठरले. यादरम्यान त्याला आणखी काही चित्रपट मिळाले. ‘शोला और शबनम’, ‘बॉयफ्रेंड’, ‘सुरत और सिरत’, ‘अनपढ’, ‘शादी’ असे ते काही चित्रपट होते, जे खूप काही चालले नाहीत. पुढे आधी ठरल्याप्रमाणे बिमल रॉय यांच्या बंदिनीसाठी त्याची निवड झाली होती. त्यानुसार बंदिनी पूर्ण झाला. १९६३ ला प्रदर्शित झालेला ‘बंदिनी’ हिट ठरला, मात्र यात धर्मेंद्रला खूप छोटा रोल मिळाला होता, पण तरीही धर्मेंद्र म्हणतो की, माझ्या कारकिर्दीतला खर्‍या अर्थाने दखल घेणारा तो क्षण होता, जेव्हा दिग्गज चित्रपट निर्माते बिमल रॉय यांना वाटले की,‘बंदिनी’मधील ‘देवेंद्र ची भूमिका साकारण्यासाठी मी पात्र आहे.

मात्र एक वस्तुस्थिती आपल्याला विसरून चालणार नाही, ती म्हणजे या संघर्षाच्या काळात धर्मेंद्रच्या वाट्याला आलेले चित्रपट खूप सुंदर आणि क्लासिक होते. त्यातील भूमिका साकारताना त्याच्या अभिनयातील विविध पैलू समोर आले. ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘पूजा के फूल’, ‘अनुपमा’ हे चित्रपट त्याची काही उदाहरणे आहेत. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आई मिलन की बेला’ या चित्रपटात त्याने ग्रे शेड भूमिका बखूबी निभावली होती.‘फूल और पत्थर’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला होता. या चित्रपटाने धर्मेंद्रला नाव तर मिळवून दिलेच. शिवाय रोमँटिक हिरो या त्याच्या इमेजमधून त्याला काढून, अ‍ॅक्शन हिरो अशी नवीन ओळखही दिली. अर्थात धर्मेंद्रला दर्शकांनी आत्तापर्यंत सगळ्याच भूमिकांमध्ये स्वीकारलेले आहे, पण अ‍ॅक्शन हिरो म्हणून त्याला जी नवी ओळख मिळाली त्याचा फायदाही झाला व नुकसानही झाले. १९६९ मध्ये आलेल्या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘सत्यकाम’ या चित्रपटातील भूमिकेने हे दाखवून दिले.‘सत्यकाम’मधील त्याची भूमिका आजपर्यंत साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा उजवी ठरते, हे नाकारता येणार नाही. ज्या ताकदीने ‘सत्यकाम’मधील भूमिका धर्मेंद्रने वठवली आहे ते पाहता त्याच्यातील अभिनय क्षमतेवर चित्रपट निर्माण करणार्‍यांनी अन्याय केला. रोमांस ,कॉमेडी, ड्रामा असे विविध पैलू ताकदीने साकारण्याची कुवत असणार्‍या एका महान अभिनेत्याला आपण मुकलो. धर्मेंद्रला मात्र व्यावहारीक स्तरावर झालेला फायदा हा की, मारधाड चित्रपट त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात चालून आले. धर्मेंद्रच्या स्वरूपात नवा ‘हिमॅन’ चित्रपटसृष्टीला मिळाला.

धर्मेंद्र म्हटल्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा उल्लेख होऊ नये, हे शक्यच नाही, परंतु त्यावेळचा एक गमतीदार किस्सा असा की, खरेतर धर्मेंद्र ‘शोले’ तील ठाकूरचे पात्र करण्यासाठी उत्सुक होता, पण हेमा मालिनीसारख्या सुंदर अभिनेत्रीवर भाळलेल्या धर्मेंद्रने केवळ तिच्यासाठी म्हणून ‘वीरू’चा रोल स्वीकारला. कारण ठाकूर करण्यासाठी वीरूची भूमिका नाकारली असती तर हेमा मालिनीचा सहवास मिळाला नसता. आपल्या एकूण अभिनय कारकिर्दीमध्ये धर्मेंद्रने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. नायक म्हणून त्याचा आलेख मोठा आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या नायिकाही तेवढ्याच मोठ्या संख्येने आहेत. त्याने सुरुवातीला नूतन, साधना, माला सिन्हा, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, शर्मिला टागोर, मीना कुमारी, सायरा बानो, तनुजा, आशा पारेख, लीना चंदावरकर, मुमताज, राखी, हेमा मालिनी या नायिकांसोबत काम केले होते. पुढे ८० च्या दशकामध्ये रेखा, श्रीदेवी, मंदाकिनी, जयाप्रदा, अनिता राज, अमृता सिंग, डिंपल कापडिया अशा काही नायिकांसोबत तो पडद्यावर चमकला. नायिकांच्या या नावाची खूप मोठी यादी निघेल परंतु सगळ्यांची नावे घेणे कठीण आहे.

धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या प्रेमाचे किस्से, प्रकाश कौरनंतर हेमा मालिनीसोबत त्याने केलेले दुसरे लग्न, पहिली पत्नी प्रकाशसोबत त्याचा कधीही न झालेला घटस्फोट या सर्वश्रुत गोष्टी आहेत. अगदी मीनाकुमारीसोबतही त्याचे नाव जोडले गेले होते, मात्र या गोष्टींमुळे धर्मेंद्र नेहमीच चर्चेत राहिला. त्याच्यावरील चर्चांना कितीही उधाण आले तरीही त्याचा चाहता वर्ग कधीही त्याच्यापासून दूर गेला नाही. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही छोटी-मोठी वादळे झालीही असतील, पण त्यामुळे त्याच्यावर काही फारसा फरक पडलेला दिसत नाही. उलट दोन बायकांसोबत असलेले त्याचे दोन संसार, त्याची सर्व मुले-मुली आणि आता सर्व मोठी झालेली नातवंडे असे त्याचे सारे विश्व बहरलेले आहे. त्याने कधी काली पकडलेली फ्रंटियर मेल स्वप्नपूर्ती करणारी ठरली आहे आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी तो त्याच्या स्वप्नांच्याही पलीकडे जाऊन पोहचला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -