– हर्षदा वेदपाठक
गदर एक प्रेम कथा हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून त्याला बिरूद ही लाभले होते. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड देखील केले होते. 22 वर्षानंतर त्याच चित्रपटाचा भाग दोन, गदर टू प्रदर्शित झाला. आणि या बावीस वर्षात सनी देओल नामक स्टारचा प्रकाशझोत काहीसा मंदावला, तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहिलेल्या अनिल शर्मा यांचे फिल्म मेकिंग तंत्र हे कालबाह्य झाल्याचं दिसून येते. परंतु गदर या ब्रँडची ताकद इतकी आहे की, 66 वर्षाच्या सनी देओलच्या या चित्रपटाला कोणत्याही तरुण आणि प्रसिद्ध कलाकाराच्या तोडीच बॉक्स ऑफिस ओपनिंग लावले आहे.
गदर मध्ये भारत पाकिस्तान फाळणीचे कथानक होते. ॲक्शनने सजलेल्या त्या चित्रपटांमध्ये जोरदार ड्रामा, दिलखेच संवाद आणि एक सुंदरशी प्रेमकथा होती. जी सगळ्यांनाच मनाला भावली होती. इतकेच नव्हे तर, गदरची गाणी देखील खूपच श्रवणीय होतीत. गदर 2 साठी लेखक शक्तिमान तलवार आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी तारा सिंगजी, तिच कहाणी पुढे सुरू ठेवली आहे.
वर्ष आहे 1971चे, तारा सिंगचा मुलगा जिते (उत्कर्ष शर्मा) आता तरुण झालाय. गदर दोन ची कथा गदर प्रमाणेच आहे गदर एक मध्ये तारासिंग आपली बायको सकिनाहिला आणण्यासाठी पाकिस्तानमध्ये जातो. तर गदर 2 मध्ये तारा सिंग मुलगा जिते याला आणायला पुन्हा एकदा पाकिस्तान मध्ये जातो.
शक्तिमान यांनी लिहिलेल्या कथानकामध्ये नवीन असं काहीच नाहीये. कारण आपण गदर एक पाहिलेला आहे. गदर मध्ये जे जोरदार पंच होते, पटकथेमध्ये जे चढ-उतार होते, लव स्टोरी होती, धमाकेदार संवाद होते ते सगळं गदर 2 मध्ये हरवून गेले आहे. गदर टीव्हीवर अनेकदा प्रक्षेपित झालाय, त्यामध्ये अनेकांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे. त्यामुळे गदर 2 बद्दल अनेकांच्या अनेक अपेक्षा नसल्यास नवल. त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यास गदर 2 असमर्थ ठरतो.
तारा सिंग,जीते आणि सकीना यांच्या हलक्याफुलक्या संवाद आणि दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. त्यात काही कॉमेडी दृश्य पण आहेत. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्यानंतर अचानक सनी देओल पडद्यावरून गायब होतो. आणि संपूर्ण चित्रपट हा उत्कर्ष शर्माच्या खांद्यावर ढकलला जातो.
लेखक आणि दिग्दर्शक हे फार विसरूनच गेले की, प्रेषक हे सनी देओलला बघायला आलाय, उत्कर्षला नाही. उत्कर्ष जोपर्यंत पडद्यावर असतो तोपर्यंत सनी देओलची आठवण येत राहतात. दरम्यान अगदी निरस अशी दृश्य पडद्यावर येत राहतात. काही कालावधीनंतर सैन्याला रसद पुरवताना गायब झालेला, सनी देओल पडल्यावर अवतरतो, तेव्हा परत एकदा चित्रपटांमध्ये जान येते. त्यानंतर सनी देओल हा पाकिस्तान मध्ये जातो तेव्हा पुन्हा एकदा पटकथेमध्ये जीव येतो. ठेवणीतली ॲक्शन दृश्य पाहण्यासाठी जो प्रेक्षक वाट बघत असतो, त्याला ती दृश्य, सनी देओलची डरकाळीसह पाहायला मिळतात. तेव्हा कोठे हायसे वाटते.
लेखक शक्तिमान हे वजनदार संवाद लिहिण्यास असमर्थ ठरल्याचे दिसून येते. सनी देओल ज्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या हिरोगिरीची दृश्य लिहायला ते कमी पडताना दिसतात. बोथट संवाद, कमी हाणामारी आणि सनीचे तडफदार संवाद नसतील तर त्यातील सगळी गंमतच निघून गेलेली पाहायला मिळते.
शक्तिमान यांनी काही ठराविक दृश्य बरी लीहली आहेत. परंतु ते अपेक्षा पूर्ण करताना दिसत नाही. सनी देवल यांच्या चित्रपटांमध्ये शिट्टी आणि टाळ्या हमखास वाजल्या जातात. परंतु येथे मात्र असे काही घडताना दिसत नाही. गदर ब्रँडची कमाल जादू चालली असती जेव्हा संवाद आणि दृश्यामध्ये तिच जुनी जादू असती.
अनिल शर्मा यांची फिल्म मेकिंग पद्धती ही खूप जुनी झाल्याचे येथे दिसून येते. मागील काही वर्षांमध्ये चित्रपट हा अनेक नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त झालाय. तसेच संवाद आणि संकलन हे देखील फास्ट झाल्याचे आपण पहिले आहे. परंतु गदर 2 मध्ये सगळं काही धिमे चाललंय, ते चित्रपटाला घातक ठरते. अनिल शर्मा हे कथा शोधून त्यावर वेगळी पटकथा लिहिणे तसेच भावनिकता निर्माण करणे यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु गदर 2 ची मेकिंग ही जुन्या चित्रपटाप्रमाणे झाली आहे. त्यामुळे क्लायमॅक्स मध्ये प्रेक्षकांच्या मनात भावनिकता तयारच होत नाही. अशा प्रभावहीन पटकथेमध्ये अनिल शर्मा यांनी गदर एक मधील अनेक दृश्य आणि गाणी यांना गुंतल्याने, एक नास्टेलजीया इम्पॅक्ट तयार झाला आहे. त्याने पटकथा आणि प्रेक्षकांना तग धरता येतो.
मोजक्याच लक्षात राहणाऱ्या दृश्यांमध्ये सनी देओलचे हॅन्ड पंपकडे पाहणे आणि त्यानंतर पाकिस्तानी लोकांची रिएक्शन, हाणामारीसाठी अवघड खांब खेचून काढणे, त्याची दहाड ही काही निवडक दृश्य आहेत. सदय काळामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या नात्यांमध्ये जे काही संबंध आहेत, त्यावर भाष्य करणारी काही मोजकीच दृश्य आणि संवाद गदर 2 मध्ये आहेत. देशभक्ती जागृत करणारी काही दृश्य आणि संवाद 15 ऑगस्ट निमित्ताने
मनात राहून जातात.
सनी देओलचे फॅन आणि सिंगल स्क्रीनचे प्रेक्षक यांना लक्षात ठेवून गदर दोन तयार केल्याचे वाटते. आणि या दोन्ही प्रकारच्या मंडळींना चित्रपटांमध्ये लॉजिक असो किंवा नसो त्याचा फारसा फरक पडत नाही. मात्र तारा सिंगचे संवाद आणि दृश्ये आणखीन दमदार असती तर याच प्रेक्षकांनी सिनेमागृहाला डोक्यावर घेतलं असतं.
सनी देओलला पुन्हा एकदा तारा सिंग म्हणून पाहताना छान वाटते. त्यांचे वय वाढले परंतू तारा सिंगचा जोम आणि आवेश त्यांनी इथे व्यवस्थित पकडून ठेवल्याचे दिसून येते. ऐक हि-मॅन म्हणून जे त्यांचे रूप लोकांच्या मनात आहे. त्याची ते आठवण आपल्याला येथे करून देतात. विशेषता हाणामारी आणि राग असलेली जी काही दृश्य आहेत, ती प्रभावशाली वाटतात. फक्त संवाद तेवढे मिळमिळीत आहेत.
सकीना म्हणून अमिषा पटेल विशेष प्रभाव टाकत नाही. मात्र सनी आणि अमिषाची केमिस्ट्री छान वाटते. निर्मात्याचा मुलगा असल्याने उत्कर्ष शर्मा याला बऱ्यापैकी वाव मिळाला आहे. त्यात तो नाच गाणं आणि ॲक्शनमध्ये आपली छाप सोडतो. नव अभिनेत्री, सिमरत कौर अभिनय बऱ्यापैकी करते. पडद्यावर सुंदर दिसते.परंतु त्या दोघांची लव स्टोरी मात्र रटाळ वाटते.
मनीष वाधवा यांनी प्रमुख खलनायकाची भूमिका उत्तम केली आहे. परंतु अमरीश पुरी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गदर या चित्रपटाच्या यशामध्ये बराचसा वाटा हा अमरीश पुरी यांचा देखील आहे. जेव्हा एखाद्या चित्रपटांमध्ये विलन हा दमदार असतो, तेव्हा हिरोची भूमिका देखील छाप पाडणारी होऊन जाते, असेच काहीच गदर बद्दल घडलं होते. इतर सहकलाकार आपापली भूमिकारित्या करतात.
गदर दोन मध्ये काही नवीन गाणी आहेत, मात्र ती लक्षात राहत नाहीत. गदर मधील हिट गाण्याचा प्रयोगच गदर 2 मध्ये केला आहे. गदर 2 मधील सेट, कॅमेरा, एडिटिंग आणि पार्श्वसंगीत हे साधारण दर्जाचे आहेत.
गदर 2 मध्ये, 22 वर्षांपूर्वीची प्रतिकृती दिसते. त्यामध्ये नवीन असे काहीच नाही. इतकच नव्हे तर त्यात गदर एकची जादू देखील अजिबात दिसत नाही. तारा सिंगची भूमिका आणि सुपरहिट गदर या चित्रपटाचा पुढचा भाग, म्हणून प्रेक्षक चित्रपट पाहायला जातील.
सोबतच 15 ऑगस्ट असल्याने आलेल्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करण्यासाठी म्हणून प्रेक्षकांना ओह माय गॉड 2 आणि गदर 2 हे दोन्ही चित्रपट आहेत. सेक्स एज्युकेशन वर आधारित असलेल्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाला सेन्सॉरने “अ” प्रमाणपत्र दिल्याने,18 वर्षाखालील मुले त्या चित्रपटाला पाहू शकत नाहीत. तिकडे गदर 2 या चित्रपटाला “सर्वांसाठी” हे प्रमाणपत्र असल्याने, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार. जोडून आलेल्या सुट्या आणि फॅमिली विकेंड टाईमचा फायदा गदर 2 या चित्रपटाला मिळेल असे दिसते.
——————————————————————————————————
हेही वाचा- O My God 2 : देवाचा सहारा घेत बात होते ‘सेक्स एज्युकेशन’ची