एचबीओची जगप्रसिद्ध वेबसिरीज गेम ऑफ थ्रोन्सचा कलाकार ४१ वर्षीय क्रिस्तोफर हिवजूला देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खिवजूने आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट अपलोड करुन करोनाबद्दल माहिती दिली आहे. हॉलिवूडमधील इद्रिस इल्बा, टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांना देखील करोनाची लागण झाली होती. क्रिस्तोफर खिवजू सध्या त्याच्या नॉर्वेमधील घरात स्थानबद्ध आहे.
ख्रिस्तोफर गेम ऑफ थ्रोन्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसला होता. टॉरमंड नावाची व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. जॉन स्नोचा सहकारी म्हणून तो शेवटच्या आठव्या सीझनपर्यंत गेम ऑफ थ्रोन्सचा भाग होता. जीओटीच्या तब्बल ३३ भागांमध्ये तो दिसला होता. सध्या तो नेटफ्लिक्सच्या विचर या सीरीजमध्ये काम करतोय. मात्र या शोचे शुटिंग बंद करण्यात आले आहे. सेटवर डिप क्लिन करण्यासाठी शुटिंग बंद करण्यात आलं आहे.
खिवजूने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये भावनिक मेसेज लिहिला आहे. “मला कोवीड १९ ची लागण झाली आहे. मला आणि माझ्या परिवाराला घरीच थांबण्यासाठी सांगितले आहे. आमची तब्येत ठणठणीत आहे. मला फक्त थोडीशी सर्दी झालेली आहे.” मी बरा असलो तरी इतर लोक धोक्यात आहेत. चाहत्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असेही खिवजूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एकमेकांना काळजी घ्या, असे सांगण्यापेक्षा आपण या व्हायरसशी लढले पाहीजे आणि आपल्या रुग्णालयातून या व्हायरसला हाकलून दिले पाहीजे. आपण एकत्र मिळून हे करु शकतो. एकमेकांची काळजी घ्या, सुरक्षित अंतर राखा आणि स्वस्थ रहा, असा संदेशही त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.