घर मनोरंजन अंदाज बांधता येतो... तरी प्रेरणादायी

अंदाज बांधता येतो… तरी प्रेरणादायी

Subscribe

हर्षदा वेदपाठक

आपल्याकडे दोन प्रकारे देशप्रेमाची महती सांगणारे चित्रपट तयार होतात. ऐक म्हणजे, विरोधी विचारांची राजकीय पार्टी, विरोधी राज्य/देश किंवा विचारसरणी तर दुसरीकडे धाडसी, झपाटलेले, त्याग यावर मतप्रचार करून, घडवून आणलेली कथानकं. त्यात खेळाच्या अवती भोवती गुंतलेले, झपाटलेले कथानक हा देखील देशभक्तीचाच एक प्रकार मानायला पाहिजे. घुमर हा असाच एक चित्रपट आहे, त्याचे दिग्दर्शन आर. बालकी यांनी केले आहे.

क्रिकेट वेडी असलेली ऐक तरुणी, बॅटस् वुमन म्हणून खेळाच्या मैदानात प्रसिद्ध असते. वैयक्तीक आयुष्य बाजूला ठेवून फक्त क्रिकेट यावर लक्ष देणारी हि तरुणी, नॅशनल टीममध्ये भारतासाठी खेळायचे स्वप्न पाहते. त्यानुसार तिला लंडन मध्ये खेळायची संधी देखील मिळते. मात्र लंडन येथे निघण्यापूर्वी तिचा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये ती आपला उजवा हात गमावून बसते. त्यानंतर, नैराश्ये मध्ये गेलेली हि तरुणी कश्याप्रकारे उत्तम ब्लॉलर होते हि कथा येथे आहे.

- Advertisement -

घुमर मध्ये नवीन असे सांगण्यासाठी काही नाही. झपाटलेपण, प्रतिभा, तोटा, त्याग आणि अंतिम विजय यावर आधारित अंदाज बांधता येण्याजोगी कहाणी आहे हि. आणि या सगळ्यांवर क्रिकेटचा तडका. सोबत कलाकारांचा वास्तवदर्शी अभिनय म्हणजे मग सोनेपर सुहागा. हल्लीच प्रदर्शित झालेला 83, चक दे इंडिया, मैरी कॉम, धोनी, या चित्रपटांना तुफान यश मिळाले. तर दुसरीकडे शाबाश मिट्ठू या चित्रपटाला यश नाही लाभले तरी, या सगळ्या चित्रपटामध्ये जे देशभक्तीचे वारे होते तेच इकडे देखील वाहताना दिसते.

अगदी सोप्या पद्धतीने अंदाज बांधता येण्याजोगी घुमरची पटकथा आहे. पहिल्या दृश्यापासून ते चित्रपटाच्या शेवटच्या दृष्यापर्यंत चित्रपट बाधून ठेवतो. आणि हि कोठेही काही कमी पडताना दिसत नाही हे विशेष.

- Advertisement -

तुम्ही खेळावर आधारीत इतर चित्रपट पाहिले असतील तर, तेथे सखोलरीत्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची पार्श्वभूमी स्थापित केली जाते. परंतु येथे मात्र, एखादया संवादद्वारे स्थापित करण्याचा प्रयत्न बालकी करतात.ज्या द्वारे प्रत्येक पात्र आपली भूमिका छाप पाडण्याजोगी निभावतात.

Abhishek Bachchan And R Balki's Latest Collaboration 'Ghoomar' Set To  Release On This Date

अभिषेक बच्चन यांनी निभावलेला पॅडी सर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. चोवीस तास दारूच्या नशेत असलेला पॅडी अभिनय आणि आवाजाद्वारे दारुड्याची भूमिका चपखल बजावतो. ते पाहत असताना तुम्हाला जर का अमर अकबर अँथनी मधील अमिताभ बच्चन यांचा दारू पिऊन आरशासमोर चाललेलं दृश्य आठवलं, तर ते निवड योगायोग समजावा. हुशार आणि टॅलेंटेड असूनही समाज आणि क्रिकेट बोर्डाकडून नाकारले गेल्यामुळे दुःखात नैराश्यात गेलेला, पॅडी त्याच्या वागणुकीतून आणि संवादामधून त्याची दुखरी बाजू दाखवून देतो आणि त्याचे श्रेय अभिषेक बच्चन यांच्या मनभावन अभिनयाला जाते.

काही तुरळक चित्रपट करून गायब झालेली संयमी खेर हिने सामान्य आणि अपंग क्रिकेटपटू म्हणून निभावलेली भूमिका संयमीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोच्च भूमिका आहे. संयमीने महत्त्वकांक्षी आणि क्रिकेटसाठी वेडी असलेल्या अनाया या तरुणीची भूमिका अतिशय उत्तमरीत्या वठवली आहे. चित्रपटांमधून गायब झाल्यावर काही तुरळक वेब सिरीज मध्ये नगण्य भूमिका करून पुन्हा गायब झालेली संयमी, इतके वर्ष होती कुठे हा प्रश्न तिचा पॉवर पॅक अभिनय पाहून सगळ्यांना न पडल्यास नवल.

शबाना आजमी यांनी संयमीच्या आजीची भूमिका केली आहे. क्रिकेटचा चालता बोलता विकीपिडिया असलेली ही आजी आपल्या नातीला सर्व स्तरांमध्ये उत्तम प्रकारे पाठिंबा देताना दिसते. अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक पटकावलेल्या शबाना यांच्यासाठी, आजीची भूमिका वेगळी आहे खरी. त्यात त्या रॉकी ओर राणी की प्रेम कहानी या भूमिके प्रमाणे बहार आणतात.

आर. बालकीचा चित्रपट म्हटले की, अमिताभ बच्चन यांची छोटेखानी भूमिका असायलाच पाहिजे हा एक अलिखित नियम झाला आहे, असं वाटतं. त्यानुसार अमिताभ बच्चन हे क्रिकेट समलोचकाच्या भूमिकेत दिसतात. अमिताभ बच्चन स्वतः क्रिकेटचे फॅन आहेत, त्यामुळे त्यांना समजणारे क्रिकेट आणि त्यांचा जादुई आवाज एकत्र आल्याने त्यांची क्रिकेट कॉमेंट्री आणि त्याला असलेला विनोदाचा तडका हि चित्रपटाची जमा बाजू आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असलेला अंगद बेदी, हा स्वतः देखील क्रिकेटर आहे. परंतु त्याचा ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा दिग्दर्शकाने येथे घेतला नाही. अनायाचा मित्र म्हणून तो तिला उत्तम साथ देतो. परंतु तो कधीच तिच्या बरोबर क्रिकेट बद्दल बोलताना किंवा, तिला क्रिकेट खेळताना मदत करत नाही. त्याला दिलेली भूमिका तो बऱ्यापैकी सादर करतो.

घुमर मधील पार्श्वसंगीत हे चित्रपटाचा मूड व्यवस्थित जपताना दिसते. घुमरचे कथानक इतके सशक्त आहे की, त्यात ठासून भरलेली नाच गाणी नाहीत, आणि भारदस्त दृष्याला हलके करायला गाण्यांची गरजच भासत नाही, हिच या चित्रपटाची खासियत आहे. या चित्रपटामध्ये एकच शीर्षक गीत असून ते चित्रपटाच्या उत्तरार्धात सतत वेगवेगळ्या प्रकारे वाजत राहते. ते देखील चित्रपटाचा मूड व्यवस्थित जगते. अमित त्रिवेदी यांचे संगीत हे घुमर मधील कथानला व्यवस्थित जोडून वाजताना ऐकू येते.

विशाल सिंह यांची सिनेमॅटोग्राफी चित्रपटाच्या सगळ्या छटा व्यवस्थित टिपताना दिसते. विशेष म्हणजे अनेक क्लोज अप शॉटस्, पॉईंट ऑफ व्ह्यू शॉर्टस्, डॉली शॉर्टस्, लो एंगल शॉटस् यामुळे घुमर मधील कलाकारांचे विविधअंगी अभिनय जिवंत वाटतात.

घूमरचा पूर्वार्ध हा सगळ्या पात्रांचा प्रवास दाखवतो. तर उत्तरार्धामध्ये फक्त क्रिकेट मॅच या विषयावर लक्ष केंद्रित करतो. वैयक्तिक जिवनाला बाजूला ठेवून, आपली स्वप्न कशाप्रकारे पूर्ण होतात हे प्रत्येक कलाकाराच्या नजरेतून दाखवताना, कॅमेराचा सर्वांग सुंदर वापर केलेला पाहायला मिळतो. ज्याचा फायदा कथानकाची गती आणि कलाकारांचा प्रवास उत्तमरीत्या दाखवतो. चित्रपटाच्या सुरुवातीला स्टेडियममध्ये जोशात असलेल्या क्रिकेट प्रेमींसमोर फडकत असलेल्या भारतीय ध्वजाला संयमीने डाव्या हाताने केलेला स्पर्श, याद्वारे प्रमुख कलाकारांचा प्रवास आहे ते लक्षात येते.

क्रिकेटर म्हणून पॅडी सर प्रत्येक वेळेला भारतीय समाज व्यवस्था, क्रिकेटमधील राजकारण, खाऊगिरी याबद्दल भाष्य करताना दिसतो. मात्र त्यापैकी एकही प्रश्न संयमीला भेडसावत नाही ती गोष्ट मात्र खटकते. महिला क्रिकेट बोर्ड आणि महिला खेळाडूंची निवड यावर मोजकीच दृश्ये आहेत.

वर नमूद केल्याप्रमाणे घुमर हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेडिक्टेबल आहे. चित्रपटाची कथा काही प्रमाणत वास्तवदर्शी असून, पटकथेची बांधणी, आखणी उत्तम केली आहे. मात्र प्रमुख कलाकाराला हिंसक आणि आक्रमक का दाखवले आहे, त्याचे स्पष्टीकरण कोठेच नाही.

आपल्याकडे खेळावर खूपच कमी चित्रपट तयार होतात आणि असे चित्रपट तयार झाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे घुमर हा चित्रपट वन टाइम वॉच नक्कीच आहे. त्यात अनेक प्रेरणादायी दृश्य आणि संवाद आहेत, ज्याद्वारे बरच काही शिकता आणि समजता येणे शक्य आहे.

 

- Advertisment -