अभिनेता सुबोध भावेचा 20 डिसेंबर रोजी हॅशटॅग तदेव लग्नम चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आनंद गोखले दिग्दर्शित हॅशटॅग तदेव लग्नम चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकत आहेत. हा सिनेमा आधुनिक विचारसरणीवर आहे. चित्रपटाचा मूळ विषय हा लग्नाशी संबधित आहे. त्यामुळे अभिनेता सुबोध भावे याने लग्न या विषयावर एक भाष्य केलं आहे. लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुबोध भावेने एक कानमंत्र दिला आहे. सल्ला दिला आहे.
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात अथश्री च्या भूमिकेत सुबोध भावे तर गायत्रीच्या भूमिकेत तेजश्री प्रधान आहे. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्परविरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात. त्याच्या पहिल्या भेटीत काही मजेदार आणि भावनिक किस्से घडतात. त्यांच्या भेटीत विचारांच्या देवाण – घेवाणीत काही रहस्ये उघड होतात.
दरम्यान, ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ च्या निमित्ताने सुबोधने लग्नाच्या अवास्तव खर्चाबाबत मत मांडले आणि लग्न करणाऱ्यांना एक सल्लाही दिला आहे. तो एका मुलाखतीत म्हटला आहे की, ‘लग्नात तुम्ही 20 ते 25 लाख खर्च करता. तिथे आलेल्या मोजक्या 10 ते 15 लोकांच्या पलीकडे कुणालाही तुमच्यात इंटरेस्ट नसतो. ते फक्त जेवायला आलेले असतात, तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी आलेले असतात. त्या 1 ताटाचे 1000- 1500 रूपये आपण देतो. त्यामुळे आरामात खर्च 20 ते 25 लाखांवर जातो, ज्यात कोणालाही इंटरेस्ट नाही.’
पुढे तो असंही म्हणाला आहे की, अशा लोकांवर खर्च करण्यापेक्षा 5 ते 10 लाख तुम्ही सेंव्हिग करा , 5 ते 10 लाखात फिरायला जा, जग फिरा… ते तुम्ही कधी बघणार?’ इतकं करूनही पैसे उरले तर या पैशाचं काय करू असा प्रश्न असेल तर एखाद्या गरजू मुलासाठी स्कॉलरशिप म्हणून द्या शिक्षणाचा खर्च उचला, असंही सुबोध भावे म्हणालेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde