सावरकरांवरील ‘हे मृत्यूंजय’ नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नाटकाचे सर्वच प्रयोग प्रेक्षकांसाठी खुले असून नाटक अनुभवल्यानंतर प्रेक्षक स्वेच्छामूल्य देऊ शकतात.

He Mrutyunjay drama on Swatantravir Sawarkar first show at 26 october
सावरकरांवरील 'हे मृत्यूंजय' नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिक यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘हे मृत्युंजय’ हे नाटक साईसाक्षी प्रकाशित करत असून त्याचा पहिला प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे २६ ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता होणार आहे. या नाटकाचे सर्वच प्रयोग प्रेक्षकांसाठी खुले असून नाटक अनुभवल्यानंतर प्रेक्षक स्वेच्छामूल्य देऊ शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून पहिल्यांदाच अशाप्रकारचा हा अनोखा उपक्रम मराठी नाट्यसृष्टीत होत आहे.

सावरकरांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचावे – रणजित सावरकर

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे कुणा एका व्यक्ति अथवा संस्थेचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. राष्ट्राच्या बळकटीसाठी त्यांनी आपल्या हयातीत अतोनात प्रयत्न केले, छळ सहन केले. तरीही दृढनिश्चयापासून ते ढळले नाहीत. त्यामुळेच त्यांचे विचार हे राष्ट्राचे विचार असून ते नागरिकांपर्यंत प्रकर्षाने पोहचावेत, ही त्यामागची तळमळ आहे. म्हणूनच मूल्याचा विचार न करता सर्वांनी प्रयोगाला यावे, इच्छा असेल तरच नाटकाच्या पुढील प्रयोगांसाठी स्वेच्छामूल्य द्यावे पण नाटक अनुभवावे, स्वातंत्र्यवीरांचे विचार घेऊन देशासाठी कार्य करावे,’ ही त्यामागची भावना असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी याबाबत बोलताना सांगितले.

हे आहेत नाटकातील कलाकार

नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. देवदत्त बाजी यांचे पार्श्वसंगीत असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. अजिंक्य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दुल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे हे यातील कलाकार आहेत. या नाटकाचा जोरदार सराव सुरू असून स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, पदाधिकारी दिनू पेडणेकर आदी मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत.