HomeमनोरंजनHemant Dhome : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेने सुनावले

Hemant Dhome : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेने सुनावले

Subscribe

उभ्या महाराष्ट्राचे आद्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. मात्र, नुकतेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानामुळे हा आदर मावळालाय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेसाठी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता. तर औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला महाराजांनी लाच देऊन सुटका करून घेतली होती’… असं वक्तव्य सोलापूरकरांनी केले आहे. या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. महाराजांबद्दल केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय तसेच सिने क्षेत्रातून अभिनेत्यावर टीका केल्या जात आहेत. दरम्यान, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेनेसुद्धा राहुल सोलापूरकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. (Hemant Dhome slams Rahul Solapurkar for controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj)

हेमंत ढोमेची खरमरीत पोस्ट

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. या माध्यमातून त्याने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेत्याने महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत हेमंत ढोमेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये हेमंतने लिहिलंय, ‘इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! #जयशिवराय’. सोशल मीडियावर हेमंतचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

छत्रपतींच्या धाडसावर शंका घेणे पापच

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यात नवा वाद उफाळला आहे. दरम्यान, हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलंय, ‘अभिनेत्याने आपले शब्द मागे घेवून माफी मागावी. छत्रपतींच्या बुद्धीचातुर्यावर आणि धाडसावर शंका घेणे हे पापच… आग्रा येथून सूटताना महाराज लाच देऊन सुटले हे राहुल सोलापूरकर यांचे विधान धक्कादायक आहे…’.

या वक्तव्यामुळे पेटला वाद

अभिनेते राहुल सोलापूरकरने अलीकडेच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी म्हटले, ‘पेटारे- बिटारे असं काही नव्हतंचं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडा वटवला याचे पुरावेसुद्धा आहेत आणि ते आपल्याकडेच आहेत. त्यांनी औरंगजेबाचा वजीर आणि अगदी त्याच्या बायकोलासुद्धा लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नामक एका सरदाराकडून सही- शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलेलं आणि त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवत ते आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. याची खूण आणि पुरावेदेखील आपल्याकडे आहेत. मुख्य म्हणजे परमानंदांकडेसुद्धा परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावे लागतात. पण या नादात इतिहासाला छेद दिला जातो’.

हेही पहा –

Sonakshi Sinha : दबंग गर्लने विकलं मुंबईतलं घर, कमावला इतक्या कोटींचा नफा