PVR, INOX Leisure यांनी केली विलीनीकरणाची घोषणा

India's largest multiplex chains PVR, INOX Leisure announce merger
PVR, INOX Leisure यांनी केली विलीनीकरणाची घोषणा

भारतातील आघाडीची मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आणि आयनॉक्स लीझर कंपनीने रविवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी सूचित केले की, ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या वाढत्या संख्येमुळे त्यांनी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीच्या बोर्डची 27 मार्च रोजी विलीनीकरण प्रस्तावाला मंजुरी देण्यासंदर्भात अनेक तास बैठक झाली. या विलीनीकरणानंतर पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली हे कंपनीचे नवे एमडी असतील.

पीव्हीआर लिमिटेडने रविवारी सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने आयनॉक्स लीजर लिमिटेडच्या विलीनीकरणाच्या योजनेला मान्यता दिली आहे. तर आयनॉक्सच्या बोर्डाने देखील या विलीनीकरण योजनेस मान्यता दिली आहे. या करारानंतर आता थिएटर उद्योगाचे नवे रुप पाहायला मिळणार आहे. तर PVR आणि Inox Leisure यांच्याकडे संयुक्तपणे भारतभर 1,500 पेक्षा जास्त फिल्म स्क्रीन्सची मालकी असेल.

दरम्यान पीव्हीआर हे देशात सर्वाधिक मालकीचे थिएटर असलेली कंपनी आहे. देशभरातील 73 शहरांमध्ये पीव्हीआरच्या मालकीच्या 871 स्क्रीन आहेत. तर सध्या 72 शहरांमध्ये 675 स्क्रीन्सची मालकी आयनॉक्सकडे आहे. परंतु या विलीकरणामुळे 109 शहरांमधील 341 प्रॉपर्टीजवर आता 1,546 स्क्रीन चालवणारी ही भारतातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शन कंपनी बनली आहे.

तर आता या कंपनीला PVR INOX लिमिटेड नावाने ओळखे जाईल. अजय बिजली यांची या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संजीव कुमार यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल. पवन कुमार जैन यांची बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या चित्रपट उद्योगातील मंदीचा सामना करण्यासाठी ही विलीनीकरणाची योजना आखण्यात आली आहे. PVR आणि INOX दोन्ही थिएटर व्यवसायातील मोठे खेळाडू आहेत. मात्र कोरोना महामारीदरम्यान या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले, याची भरपाई करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि थिएटर उद्योग अशी स्पर्धा सुरु झाली आहे. यामुळे थिएटर उद्योगाला धोका निर्माण झाला आहे. परंतु आता PVR आणि INOX च्या एकत्रिकरणामुळे PVR ची सिनेपोलिस इंडियासोबतची विलीनीकरणाची चर्चा लटकण्याची शक्यता आहे.

PVR आणि INOX एकत्र आल्याने देशात 16 हजार कोटींची मार्केट कॅप असलेली कंपनी अस्तित्वात येईल, ज्यासाठी कोणत्याही व्यवसायाशी संबंधित आव्हानांना तोंड देणे खूप सोपे होईल. गेल्या शुक्रवारी आयनॉक्स लीझरचा शेअर 6 टक्क्यांच्या वाढीसह 470 रुपयांवर बंद झाला, तर पीव्हीआरचे शेअर्स 1.55 टक्क्यांनी वाढून 1,804 रुपयांवर होते. शेअर बाजाराच्या या बातमीवर सकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात.