घरमनोरंजन'प्रेमवारी'च्या सेटवर घडला मजेशीर कट

‘प्रेमवारी’च्या सेटवर घडला मजेशीर कट

Subscribe

कलाकर हे सेटवर नेहमीच मजा मस्ती करत असतात. असाच एक मजेशीर किस्सा 'प्रेमवारी' या चित्रपटाच्या सेटवर घडला आहे.

चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे शेड्यूल हे नेहमीच व्यस्त असते. सेटवर कलाकार धमाल मस्ती करत असतात आणि त्यातून नवनवीन किस्सेही घडत असतात. असाच एक धम्माल किस्सा ‘प्रेमवारी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडला आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मयुरी कापडणे मुख्य भुमिकेत आहेत. दरवेळी चिन्मय सगळ्यांची फिरकी घेत असतो. पण यावेळी मात्र मयुरीने याचा बदला घ्यायचा ठरवला होता. पण नेमके उलटेच झाले.

चिन्मयला घाबरवण्यासाठी अभिनेत्री मयुरी हिने एक कट रचला होता आणि हे खुळ तिच्या डोक्यात अभिजीत चव्हाण यांनी भरवले होते. लाल साडी नेसून, केस मोकळे सोडून, अंगभर सॉस लावून मयुरी चिन्मयच्या खोलीतील बाथरूममध्ये लपली आणि कटातील इतर सहकारी खोलीत आजूबाजूला लपून बसले होते. घाबरलेल्या चिन्मयचा व्हिडीओ काढण्यासाठी हा संपूर्ण कट तिने रचला होता. रात्री साडेअकराला चिन्मय आला आणि तो थेट कार्यकारी निर्माता अभिजीत यांच्या खोलीत गेला. खूप वेळ झाला चिन्मय येत नसल्याने कंटाळून अखेर एक एक जण खोलीतून बाहेर येऊ लागले. शेवटी वैतागून मयुरीसुद्धा खोलीतून बाहेर आली आणि थेट चिन्मयसमोर जाऊन उभी राहिली. मयुरीला अशा अवस्थेत बघून चिन्मयला खूपच हसू आले. मुळात हा सर्व कट चिन्मयला आधीच कळला होता. त्याच्या एका हितचिंतकाने हा कट त्याला सांगितला होता. मयुरीचा हा कट फिस्कटून, तो मस्त घोरत झोपला होता. आणि हा हितचिंतक दुसरा, तिसरा कोणीही नसून अभिजीत चव्हाण होता. हा कट स्वतःवरच उलटल्याचे लक्षात येताच, तीसुद्धा हसू लागली.

- Advertisement -

सेटवर मस्त गमतीजमती या अशाच होत असतात. अशीच धमाल, मस्ती करत साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक राजेंद्र कचरू गायकवाड असून प्रस्तुती ही त्यांनीच सांभाळली आहे. चित्रपटात चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजीत चव्हाण तसेच यांच्यासोबत भारत गणेशपुरे यांचीही प्रमुख भूमिका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -