घरमनोरंजनकाटा किर्रर्र... मेघा घाडगे

काटा किर्रर्र… मेघा घाडगे

Subscribe

सुरेखा पुणेकर म्हणा किंवा मी म्हणा, आम्ही होतो तोपर्यंतच लोकांनी लोककला पाहिलेली आहे. पण आत्ताच्या मुलींनी त्याचा जो व्यवसाय केलेला आहे तो पाहता, त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. म्हणजे व्यावसायिक लावण्या आम्हीही केलेल्या आहेत. पण आत्ताच्या पिढीला ही लावणी इतकी सोपी वाटायला लागलेली आहे की, वाटेल तसे एक्सप्रेशन्स, घाणेरडे हावभाव, अंगविक्षेप म्हणजे विकृतीचा कळस !!!... म्हणजे हे बोलतानाही मला त्रास होतोय की, आपल्या महाराष्ट्रातीलच लोकं याला इतकं प्रोत्साहन देत आहेत. - मेघा घाडगे

मराठी नाटक आणि चित्रपटांतून आपण तिला पहिले आहे. परंतु ‘उत्तम नृत्यांगना’ ही तिची खास ओळख आहे. लावणी या लोकनृत्याशी तीचे जवळचे नाते आहे. अपघाताने तिची लावणीसोबत ओळख झाली. पिढीजात लोककलावंत नसूनही लोककलेशी आणि कलावंतांशी ती आपसूकच जोडली गेली. या कलावंतांच्या प्रश्नांबद्दल ती बोलते, शासन दरबारी दादही मागते आहे. ‘बिग बॉस-४’च्या घरातून काही दिवसांपूर्वी परत आलेली मेघा घाडगे ‘आपलं महानगरसोबत’ बरंच काही बोलली.

‘बिग बॉस’च्या अनुभवाबद्दल मेघा सांगते की, “ खरंतर ‘बिग बॉस’ची मी फॅन आहे. बिग बॉसचा एकही एपिसोड पाहायचा मी सोडला नव्हता. दोन वर्षांपासून माझ्याबद्दल विचारणा चालू होती, परंतू याबद्दल मीच डायसी होते. अखेर यावर्षी जाण्याचा निर्णय घेतला. नेहमी मला वेगवेगळे एक्सपिरिमेंट करायला आवडतात. त्यामुळे बिग बॉस हा माझ्यासाठी एक्सपिरिमेंट होता. एक पॉझिटिव गोष्ट अशी घडली की, आपली स्ट्रेंथ किती आहे आणि आऊट ऑफ द वे जाऊन आपण कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो हे मला कळलं. आणि त्यातूनच हे कळलं की, आपल्याकडे तेवढीही बुद्धी नाहीय.” आणि हे सांगून मेघा स्वतः वरच खळखळून हसते !… बिग बॉसच्या घरात जाऊन मेघाला स्वतःला ओळखण्याचा अनुभव मिळाला. एक नवीन मेघा तिची तिला कळली असे तिचे मत आहे.

- Advertisement -

नृत्याचे अंग मेघामध्ये उपजतच होते. तिने सातवी-आठवीमध्ये असतानाच नृत्याची सुरुवात केली होती. लावणी नृत्य मेघाच्या जीवनात अपघातानेच आले. मेघाचे मावस भाऊ दिनेश गोरेगांवकर यांचा ‘सह्याद्रीची लेकुरे’ हा कार्यक्रम चालायचा मेघा त्या ग्रुपमध्ये होती. त्यात प्रिया कुलकर्णी लावणी सादर करायच्या. त्यावेळी प्रिया कुलकर्णी हे लावणी जगतातील मोठे नाव होते. एकदा शिर्डीच्या गाभाऱ्यात महाराष्ट्र दर्शनाचा कार्यक्रम चालू असताना प्रिया कुलकर्णींची अचानक तब्येत बिघडली. दिनेश दादा घाबरले आणि महाराष्ट्र दर्शन म्हणजे लावणीनृत्य व्हायलाच हवे. त्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी मेघाला घुंगरू बांधायला सांगितले आणि तिची तयारी करून, तिला चक्क स्टेज वर ढकललेच !… आणि तिथून लोकनृत्याच्या कार्यक्रमांचा सिलसिला सुरू झाला.

कॉलेजला गेल्यावर मेघाने इंटर-कॉलेजीएट स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. मेघा पन्नास कॉलेजमधून पहिली आली. कॉलेजमध्ये मेघाच्या नावाचा बोर्ड लागला आणि कौतुकांचा वर्षाव झाला. त्या स्पर्धेला माया जाधव आणि त्यांचे पती शहाजी काळे प्रशिक्षक म्हणून होते. माया जाधवांनी मेघाला त्यांच्या ‘डौल मराठीचा या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. या कार्यक्रमातून मेघाने लोकनृत्याचे विविध अविष्कार सादर केले. या कार्यक्रमानिमित्त मेघा भारतभर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत फिरली. हे सांगताना मेघा मायाताईंचे आभार मानते कारण त्यामुळे फार कमी वयामध्ये तिला खूप सारे प्रदेश, तिकडच्या कला- संस्कृती पहायला मिळाल्या.

- Advertisement -

मेघाचे बालपण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथील बीएमसी क्वार्टर्समध्ये गेले. मेघा त्याबद्दल अभिमानाने सांगते की, “ मुंबईतल्या या बीएमसी क्वार्टर्स आणि बीडीडी चाळी म्हणजे कलाकार निर्माण करणाऱ्या खाणी आहेत. आजही अनेक नामवंत कलाकार या चाळींशी संबंधित आहेत. तिथे दरवर्षी नाटकांच्या एकांकिका स्पर्धा तसेच लोककलांच्या स्पर्धा व्हायच्या. त्या प्रत्येक स्पर्धेत मी असायचे. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच मी पंच्याहत्तर वर्षांच्या म्हातारीचा रोल केला होता आणि त्यासाठी मला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पारितोषिकही मिळाले होते. नटरंग हे माझं पहिलं नाटक एक ज्यात मी सेकंड लीड ची भूमिका केली होती आणि अरुण कदम त्यात माझे हिरो होते.”

मेघा तिच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी सांगताना म्हणते, “ अशाच कोणत्या तरी एका कार्यक्रमात माझी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख झाली. आठ-दहा दिवसांनी लक्ष्यामामांचा मला फोन आला की, महेश कोठारेना त्यांच्या ‘पछाडलेला’ या चित्रपटासाठी भरत जाधव यांच्यासोबत हीरोइन हवी आहे. पहिल्यांदा तर मला विश्वासच बसेना पण नंतर महेश सरांना फोन केल्यानंतर कळलं की, ‘सौंदर्या जवळकर’ ही भूमिका मला मिळाली आहे. “ मेघाची ही भूमिका फार गाजली.

अभिनेत्री सोबतच एक लोककलावंत अशा दुहेरी प्रवासाबद्दल सांगताना मेघा जास्त भावूक झाली. ती म्हणते की, “ लोकांना खूप छान छान आणि चकाचौंद गोष्टींची सवय लागली आहे, ते रियालिटी एक्सेप्ट करायला तयार नसतात. जेव्हा चित्रपटांची मला काम मिळत होती तेव्हा बर्‍याचदा मला हा अनुभव आला की, अगदी कॉन्ट्रॅक्ट साइन झाल्यावरही, मला रिजेक्ट करण्यात आलं आहे. बऱ्याचदा मी याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला पण मला कुणीच उत्तर दिलं नाही.” मेघा अप्रत्यक्षपणे लोककलावंतांना दुय्यम वागणूक मिळते याकडे तर बोट दाखवत नसावी?…

मेघा कुठल्याही पारंपारिक लावणी घराण्याशी संबंधित नव्हती. तिच्या घरात ती पहिलीच अशी मुलगी आहे, जी लावणी या कलेशी जोडली गेली. तिचे बाबा नाटकात काम करायचे, आजोबा कव्वाली गायचे. त्यामुळे कलेचा वारसा तिच्या रक्तातच होता. पण ती ज्या प्रकारे लावणीशी जोडली गेली त्यामुळे तिच्या बाबांना खूप हिणवले गेले. “बाप मंत्रालयात ऑफिसर आहे आणि पोरीला तमाशात नाचवतो…” अशा हीन शब्दांमध्ये त्यांची बीभत्सना झाली. मेघावर याचा विपरीत परिणाम असा झाला की, ज्या गोष्टीसाठी मला बदनाम करण्यात आले, त्याच गोष्टीतून मी नाव कमावणार असा दृढनिश्चय तिने केला.

मेघा अनेक लोककलावंतांची संबंधित आहे त्यामध्ये माया जाधव, मधू कांबीकर, सुरेखा पुणेकर अशा नामवंत कलाकारांचा आदराने उल्लेख करते. आज लावणी या कलेचे विकृतीकरण चाललेलं आहे त्याबद्दल मेघा आवाज उठवत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, “ आता मला असं वाटत नाही की, मी महाराष्ट्रात राहते. कारण लावणीमधील दिग्गज कलावंतांना प्रेक्षकांनी दाद दिलेली मी पाहिलेली आहे. मी त्या कलावंतांना मोठ-मोठे पुरस्कार घेताना, त्यांना मानसन्मान घेताना पाहिलेलं आहे. पण आता तो सगळा मानसन्मान धुळीला मिळालेला आहे.

इतक्या वर्षांची लोककलेची जी काही कमाई होती ती सगळी मातीमोल झालेली आहे. सुरेखा पुणेकर म्हणा किंवा मी म्हणा, आम्ही होतो तोपर्यंतच लोकांनी लोककला पाहिलेली आहे. पण आत्ताच्या मुलींनी त्याचा जो व्यवसाय केलेला आहे, तो पाहता त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. म्हणजे व्यावसायिक लावण्या आम्हीही केलेल्या आहेत. पण आत्ताच्या पिढीला लावणी इतकी सोपी वाटायला लागलेली आहे की, वाटेल तसे एक्सप्रेशन्स, घाणेरडे हावभाव, अंगविक्षेप म्हणजे विकृतीचा कळस !!!… म्हणजे हे बोलतानाही मला त्रास होतोय की,आपल्या महाराष्ट्रातीलच लोक याला इतकं प्रोत्साहन देत आहेत की, गणेशोत्सव असो दहीहंडी असो किंवा एखादी जयंती असो, या कार्यक्रमातून अशा मुलींना नाचवलं जातं, अंगप्रदर्शन केले जातात. लावणीमध्ये आता पदर घेणंच सोडून दिलेल आहे.

कमरेखाली साडी केवढी तरी खाली गेलेली असते. म्हणजे लाजेने-शरमेने डोकं फोडून घ्यावं अशी अवस्था झालेली आहे. दुसरीकडे खरे लावणी कलाकार आज घरी बसलेले आहेत. त्यांच्या सुपार्‍या बंद झालेल्या आहेत. आज ते कलाकार उपाशी मरत आहेत. त्यांची मुलं-बाळं रस्त्यावर आली आहेत. ते स्वतःच्या कलेशी इतके प्रामाणिक आहेत की, कोणतंही व्हल्गर काम करत नाहीत. त्यांची परिस्थिती बेकार आहे म्हणून त्यांनी कुठेही जाऊन, काहीही केलेलं नाही. इतकी वर्षानुवर्षे ही कला जपत असताना त्यांनी कधी साडीचा पदरही ढळू दिला नाही. आजच्या या मुलींनी त्या कलेला एवढे घाण करून ठेवले आहे की, आता पुन्हा नव्याने त्याकडे कुणी पाहणार नाही.” मेघा हे सर्व पोटतिडकीने बोलत होती. तो त्रास तिच्या डोळ्यात दिसत होता, त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते !

लोककलावंतांच्या या प्रश्नांबद्दल शासन दरबारी दाद मागितली असता आजपर्यंत फक्त निराशाच पदरी पडल्याचे मेघा सांगते. या लोककलावंतांना दरवर्षी काही मानधन मिळावे, एखादी विमा पॉलिसी मिळावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी एखादी कमिटी नेमावी ज्याद्वारे या कलावंतांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. यासाठी बऱ्याचदा शासनाकडे पत्रव्यवहार झाला आहे. फाइली पडून आहेत. दुर्दैव हे की, लाखोच्या संख्येने असलेल्या या कलावंतांचा सरकारकडे डेटाच नाही. या लोककलावंतांबद्दल शासन उदासीन आहे.


काटा किर्रर्र मेघा घाडगेची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -