घरमनोरंजनजान्हवीची सैराट धडक

जान्हवीची सैराट धडक

Subscribe

हिंदी चित्रपट धडक लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. त्याची नायिका आहे जान्हवी. सध्याच्या फॅशनप्रमाणं सांगायचं तर जान्हवी श्रीदेवी बोनी (कपूर)! बरोबर नं? आईची पुण्याई तर खरीच पण त्यामुळं जान्हवीबाबतच्या अपेक्षा मात्र खूपच वाढल्या आहेत, हेही तितकंच खरं.असंच होतं. मोठ्यांच्या वारशाचे फायदे असतात तसे तोटेही. हा त्यापैकी एक. त्यामुळं कोणी स्टार-बालके यशस्वी होतात तर काही अयशस्वी.

बॉलीवूडला नव्यांचं आकर्षण कायमच असतं. प्रेक्षकांना कायम नवंनवं काहीतरी हवंच असतं ना! त्यांना तेच ते पाहून कंटाळा येतो असं काहीजण सांगतात. पण असं सांगितल्यानंतर लगेचच ते अरे तो अमुक तमुक सिनेमा कितव्यांदा तरी म्हणजे पंचवीस पन्नासवेळा पाहणारे प्रेक्षक आहेत असंही सांगतात. त्यामुळं तर हे जास्तच फिल्मी वाटतं. प्रेक्षकांचं नक्की कशाशी जुळतं का जुळत नाही, हे शंभर टक्के बरोबर सांगणारं कुणी भेटलं, तर निर्माते त्याला त्यांच्या स्टार्सपेक्षाही जास्त पैसे देतील.

आपला सिनेमा चांगला चालावा असं प्रत्येक निर्मात्याला त्याच्या नव्या सिनेमाच्यावेळी वाटत असतं, एवढं खरं. अन का वाटू नये, सारं काही त्यासाठीच करायचं ना? मग तो कधी इतर भाषेतील त्याला चांगला वाटलेल्या का खूप गल्ला जमवणार्‍या चित्रपटावरून, आपला सिनेमा बनवतो. यात पाश्चात्त्य सिनेमांची संख्या खूपच असते हे खरं, पण प्रादेशिक चित्रपटही त्यांच्या तावडीत सापडतात. नंतर त्यांचं काय होतं ते विचारू नका. अगदीच काही नाही, तर पूर्वी गाजलेल्या हिंदी चित्रपटांवरून ते नवा चित्रपट तयार करतात. तो देवदाससारखा पूर्ण वेगळाच बनतो किंवा औरतचा नवा अवतार म्हणून अवतरलेली मदर इंडिया अधिक प्रभावी बनते. ज्याचं त्याचं नशीब. कालामानाप्रमाणं बदल करून मराठीतील ऊन-पाऊस वरून बनलेला बागबान सुरेख बनतो आणि खुद्द अमिताभ राजा परांजपे यांच्या तुलनेत मी दहा टक्केही काम केलेलं नाही, हे प्रांजळपणं सांगतो. थोडी अतिशयोक्ती वाटते पण त्याची भावना सच्ची आहे आणि राजाभाऊंचा अभिनय अविस्मरणीयच होता हे मान्यच करायला हवं.

- Advertisement -

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे सैराट या शतकोटीचा इतिहास घडवणार्‍या मराठी सिनेमावरून तयार करण्यात आलेला धडक लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. त्याची नायिका आहे जान्हवी. सध्याच्या फॅशनप्रमाणं सांगायचं तर जान्हवी श्रीदेवी बोनी (कपूर)! बरोबर नं? आईची पुण्याई तर खरीच पण त्यामुळं जान्हवीबाबतच्या अपेक्षा मात्र खूपच वाढल्या आहेत, हेही तितकंच खरं.असंच होतं. मोठ्यांच्या वारशाचे फायदे असतात तसे तोटेही. हा त्यापैकी एक. त्यामुळं कोणी स्टार-बालके यशस्वी होतात तर काही अयशस्वी. राज कपूरचे रणधीर, ऋषी यशस्वी होतात. पण राजीव लोकांच्या आठवणीतही नसेल. देव आनंदचा मुलगा एका चित्रपटात येऊन गेला हेे खुद्द त्याला, पक्षी सुनैल (का सुनील म्हणायचं) आनंदलाही आठवत नसेल. ज्युबली स्टार राजेंद्र कुमारचा गौरव तरी कुठं फार टिकला? बघा, असंच होतं. विषयातून विषय निघत जातो, अरेबियन नाईट्स मध्यल्या गोष्टींप्रमाणं.

तर जान्हवी येतीय. धडक मधून. मायलेकींमध्ये या बाबतीत साम्य आहे. श्रीदेवीचा पहिला हिंदी सिनेमा सोलवां सावन हा होता आणि तोही तिचंच काम असलेल्या एका दाक्षिणात्य सिनेमावरून बेतला होता. हिंदी अवतारातील त्या सिनेमात तिचा नायक होता अमोल पालेकर. (पंचाहत्तरीपार गेलेल्या पालेकरांना ए जा करायचं म्हणजे जरा अतीच होतंय असं वाटेल, पण त्यांनाही सीनियर असणार्‍या दिलीप कुमार, लता मंगेशकर यांनाही आपण असंच ए जा करतो ना! प्रेक्षकांचं श्रोत्यांचं प्रेम असतं ते!) तर त्या सोलवा सावननंतर श्रीदेवी यशाच्या पायर्‍या चढत गेली. पहिली महिला सुपरस्टार बनली. पालेकरांच्या संवाद म्हणण्याच्या धाटणीप्रमाणेच त्यांची गाडी मात्र अतिसंथ गतीनंच जात राहिली. त्या चित्रपटात श्रीदेवी दिसली होती त्यापेक्षा नंतर अधिकाधिक चांगली दिसत गेली. अगदी चांदनी हे बिरुद सार्थ ठरवत.

- Advertisement -

जान्हवी आतापर्यंत आलेल्या छायाचित्रांतही अगदी निकषांप्रमाणे सुंदर नसेल पण चांगलीच आकर्षक दिसते आहे. (त्यामुळं धडकची धडकी भरायला नको) आईप्रमाणेच. साधं भोळं पण खिळवून ठेवणारं असं तिचं हे रूप आहे. त्याला अभिनयाची कितपत जोड आहे, हे चित्रपटगृहांत धडक लागल्यावरच कळेल. अर्थात श्रीदेवी देखील दीर्घकाळ अभिनेत्री म्हणून मान्यता पावली नव्हती. पण प्रत्येक सिनेमागणिक तिचा अभिनय सुधारत गेला आणि चालबाजपासून मात्र, अभिनयासाठी तिची दखल घेण्यात येऊ लागली. अगदी पुनरागमनाच्या,सेकंड इनिंगच्या इंग्लिश-विंग्लिश आणि शेवटच्या मॉम या चित्रपटांत ती अभिनयासाठीच लक्षात राहिली. जान्हवी तो अभिनयाचा वारसा चालवणार का, श्रीदेवीचा नटखट आणि अवखळपणा तिच्यात असेल का? असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

जान्हवीचा धडकमधील हीरो आहे ईशान खत्तर. अमोल पालेकरप्रमाणं तोही लक्षात राहण्याजोगा पण थोडा शाय रूप असलेला दिसतो. त्यानं आधी बियाँड द क्लाऊड्स हा एक सिनेमा केला आहे. (हा सिनेमा कधी कुठं आला होता, कुणाला आठवतंय का?) अमोलनं जास्त केले होते. अन् अभिनयासाठीही तो ध्यानात राहात होता. ईशान त्याच्या अभिनयानं धडक देतो की धडकी भरवतो ते पाहायचं. सार्‍यात जान्हवीला एकच खंत आहे, तिचं रुपेरी पडद्यावरील पदार्पण पाहण्यासाठी तिची मॉम नाही याची!


– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -