प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान त्याचा आगामी सिनेमा ‘लवयापा’मूळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जुनैद खान आणि ख़ुशी कपूर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या सिनेमाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. दरम्यान अभिनेता जुनैद खानने सिनेमा रिलीजबाबत एक मोठे विधान केले आहे. ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. एकीकडे प्रेक्षक सिनेमाच्या थिएटर रिलीजची वाट पाहत आहेत आणि दुसरीकडे याबाबत जुनैदने आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. (Junaid Khan Viral Statement About Film Release)
काय म्हणाला जुनैद खान?
बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान याचा आगामी सिनेमा ‘लवयापा’ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी जुनैदने केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आले आहे. जुनैद सध्या त्याच्या ‘लवयापा’ सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यानिमित्त त्याने एका मुलाखतीत अत्यंत लक्षवेधी असे विधान केले आहे. प्रमोशन दरम्यान जुनैद खान आणि ख़ुशी कपूर मीडियासोबत संवाद साधतेवेळी अभिनेत्याने म्हटले, ‘मला माझा सिनेमा युट्युबवर रिलीज करायचा आहे. पण मला ते शक्य नाहीये’.
सिनेमे युट्युबवर FREE रिलीज करा
एका मुलाखतीत जुनैदला विचारण्यात आले की, ओटीटी आणि थिएटर्समध्ये सुरू असलेल्या वादाबाबत त्याला काय वाटतं? याविषयी बोलताना जुनैदने म्हटले, ‘मला दोन्हीमध्ये असा काही खास फरक दिसत नाही. मला वाटत शेवटी एक सिनेमा हा सिनेमाचं असतो आणि तो आपल्या हृदयाच्या कायम जवळ असतो. माझ्या म्हणण्याच्या अर्थ असा आहे की एखाद्या सिनेमाला किती चांगल्या प्रकारे प्रदर्शित करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. कारण ते मी सिनेमाच्या चांगल्या परिणामांवर सोडतो. शेवटी मी फक्त एक अभिनेता आहे. माझ्यासाठी योग्य परिस्थिती ही आहे की सिनेमा YouTube वर विनामूल्य प्रदर्शित करावा. जेणेकरून प्रत्येकजण हा सिनेमा पाहू शकेल. पण प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही’.
हा निर्णय मार्केट प्रतिनिधींवर सोडलेला बरा
यावेळी जुनैदने असेही म्हटले, ‘जर माझा सिनेमा युट्युबवर फ्रीमध्ये रिलीज झाला तर तो सर्वाधिक लोक पाहू शकतील. हा निर्णय मी सिनेमा मार्केटमध्ये उतरवणाऱ्या प्रतिनिधींवर सोडतो. पण मला विचारलं तर मी हेच म्हणेन असे केल्याने माझा सिनेमा सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचेल. पण हा निर्णय मार्केट प्रतिनिधींवर सोडलेला बरा. कारण माझ्यापेक्षा जास्त त्यांना मार्केटची कल्पना आहे आणि त्यांना हे चांगल माहितेय सिनेमा लोकांपर्यंत कसा पोहचवतात’. जुनैदने पुढे बोलताना म्हटले, ‘ओटीटी आणि थिएटरदरम्यान सुरु असलेल्या वादांविषयी एखाद्या अभिनेत्याला प्रश्न विचारणे चूक आहे. मला असे वाटते याचे योग्य उत्तर निर्माते आणि वितरणकर्ते देऊ शकतील. कारण या सगळ्याने अभिनेत्याला काही फरक पडतो असे मला वाटत नाही’.
‘लवयापा’ कधी रिलीज होणार?
अभिनेता जुनैद खान आणि खुशी कपूरचा ‘लवयापा’ हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी दोघांचेही डेब्यू सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाले होते. खुशी कपूरने ‘द आर्चीज’ आणि जुनैद खानने ‘महाराज’ या सिनेमांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. जुनैदला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, खुशीचा पहिला सिनेमा प्रेक्षकांना फार काही भावला नाही. यानंतर व्हेलेंटाईन वीकमध्ये येणारा ‘लवयापा’ हा सिनेमा नव्या पिढीसाठी आकर्षण ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Kangana Ranaut : मोनालिसाच्या सावळ्या रंगावर भाळली कंगना, म्हणाली