प्रोत्साहन दिल्याबद्दल भारतीयांचे आभार… मायदेशी पोहोचताच ज्युनियर एनटीआरची प्रतिक्रिया

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. 13 मार्चला लॉस एंजेलिस येथे हा सोहळा पार पडला होता. संगीतकार एमएम कीरावानी आणि दिग्दर्शक एस राजामौली यांच्यासह ‘RRR’ चित्रपटाचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील या कार्यक्रमात उपस्थित होता. पुरस्कार जिंकल्यानंतर, ज्युनियर एनटीआर बुधवारी पहाटे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

विमानतळावर पोहोचल्यानंतर ज्युनियर एनटीआर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना पाहणं हा माझ्यासाठी एक सर्वोत्तम क्षण होता. मला RRR चित्रपटाचा खूप अभिमान वाटतो. RRR चित्रपटाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी भारतीयांचे आभार मानू इच्छितो, आम्ही जिंकलेला हा पुरस्कार केवळ प्रेक्षकांच्या आणि चित्रपट उद्योगाच्या प्रेमामुळेच शक्य झाला आहे.”

दरम्यान, ‘नाटू नाटू’ या गाण्याने 95 व्या ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, आणि धिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर, ऑल अॅट वन्स यांसारख्या गाण्यांना मागे टाकत इतिहास रचला आहे. ऑस्कर पुरस्काराआधी या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकला होता.

 


हेही वाचा :

‘नाटू नाटू’ची सुनील गावसकरांना देखील भुरळ; डान्स करत केला आनंद साजरा