जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगनाला समन्स

बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शकासह कलाकारांना टार्गेट करुन त्यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. अशाच प्रकारे तिने जावेद अख्तर यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केले होते. या घटनेनंतर जावेद अख्तर यांनी डिसेंबर महिन्यांत कंगनाविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात एक खाजगी याचिका सादर केली होती.

Kangana absent for questioning in Javed Akhtar defamation case
जावेद अख्तर बदनामी प्रकरणात कंगना चौकशीसाठी गैरहजर

बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना राणौतला जुहू पोलिसाकडून समन्स पाठविण्यात आले असून तिला शुक्रवारी 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. वांद्रे पोलिसांनी आता जुहू पोलिसांकडून कंगनाची चौकशी होणार आहे, मात्र ती चौकशीसाठी हजर राहते की पुन्हा वकिलांच्या मदतीने काही दिवसांची मुदतवाढ मागून घेते याकडे आता बॉलीवूडचे लक्ष लागले आहे.

सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येनंतर कंगनाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानाची एक मालिका सुरुच होती. इतकेच नव्हे तर तिने बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शकासह कलाकारांना टार्गेट करुन त्यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. अशाच प्रकारे तिने जावेद अख्तर यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केले होते. या घटनेनंतर जावेद अख्तर यांनी डिसेंबर महिन्यांत कंगनाविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात एक खाजगी याचिका सादर केली होती. त्यात त्यांनी कंगना विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन त्याचा अहवाल 16 जानेवारीला सादर करण्याचे आदेश लोकल कोर्टाने जुहू पोलिसांना दिले होते, मात्र तपास अपूर्ण असल्याने कोर्टाने जुहू पोलिसांना 1 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती, तोपर्यंत त्यांचा तपास अहवाल कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर कंगनाला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांकडे बजाविण्यात आले आहे. तिने शुक्रवारी 22 जानेवारीला जुहू पोलीस ठाण्यात हजर राहावे असे समन्समध्ये नमूद करण्यात आले होते. कंगनाच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्याविरुद्ध अशाच काही प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. वांद्रे, आंबोली आणि जुहू पोलिसांनी तिच्याविरुद्ध तक्रारी आल्यानंतर चौकशी सुरु केली होती. यापूर्वी कंगनासह तिच्या बहिणीला तीन वेळा वांद्रे पोलिसांनी एका प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले होते. मात्र तीन वेळा समन्स पाठवून ती चौकशीसाठी हजर राहिली नाही. त्यानंतर काही दिवसांनी कंगणाची वांद्रे पोलिसांकडून चौकशी झाली होती. आता तिला जुहू पोलिसांनी समन्स पाठविल्याने तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.


हेही वाचा – वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई; संतापलेल्या ‘क्वीन’नं दिली धमकी