‘कंगनाचा जन्मच ‘मणिकर्णिका’साठी झाला होता’…

'मणिकर्णिका' आणि 'ठाकरे' या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होऊ शकते.

Kangana was born to play Rani Laxmi Bai, says Manoj Kumar
देशभरातील चाहत्यांना आता उत्सुकता आहे ती ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट रिलीज होण्याची. गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणांमुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटातील एखाद्या सीनवर घेतलेला आक्षेप असो किंवा चित्रपटातील डायलॉगवरुन रंगलेला वाद असो, मागील काही दिवसांपासून सगळीकडे ‘मणिकर्णिका’चाच बोलबाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी कंगना रनौतची जाहीर प्रशंसा केली आहे. मुंबईमध्ये बुधवारी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी मनोज कुमार यांनीही हजेरी लावली होती. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी अभिनेत्री कंगना रनौतचे भरभरुन कौतुक केले. ‘कंगनाचा जन्म झाशीच्या राणीची भूमिका साकारण्यासाठीच झाला होता’, अशी प्रतिक्रिया मनोज कुमार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना मनोज कुमार म्हणाले, ‘मला असं वाटतं की कंगना रनौत लक्ष्मीबाईंचे पात्र साकारता यावे यासाठीच जन्मली होती. या भूमिकेसाठी कंगनाची निवड योग्य आहे. चित्रपटातील प्रत्येकानेच उत्तम अभिनय केला आहे. मात्र, कंगनाने साकारलेलं राणी लक्ष्मीबाईचं पात्र आणि तिचा अभिनय सर्वोत्तम आहे.’


ठाकरे – मणिकर्णिकाची टक्कर?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बायोपिक असलेला ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट (उद्या) २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यासोबतच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ठाकरे’ हा बायोपिकही उद्याच प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या दोन बड्या चित्रपटांची उद्या बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राणी लक्ष्मीबाई या मूळच्या मराठी घरात जन्मलेल्या योद्धा होत्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर मराठी प्रेक्षक चित्रपट पाहायला जाणार हे नक्की. याशिवाय हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे तसंच कंगना रनौतची यामध्ये मुख्य भूमिका असल्यामुळे हिंदी प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतील यात शंका नाही. तर, दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाकडेही मराठी आणि हिंदी असे दोन्ही भाषिक प्रेक्षक वळणार हे नक्की. त्यामुळे आता दोन्ही चित्रपटांमधील कोणता चित्रपट सरस ठरणार? हे येणारी वेळच सांगेल.


पाहा : मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चा ट्रेलर प्रदर्शित