धक्कादायक, प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर कन्नड अभिनेत्रीचा मृत्यू

चेतनाने जी शस्त्रक्रिया केली त्याबद्दल तिने तिच्या पालकांना काही सांगितले नव्हते. त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती. चेतना तिच्या मैत्रिणीसोबत एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी गेली होती.

प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर कन्नड अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतना राज या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीने बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वजन कमी करण्यासाठी केलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

कन्नड चित्रपटातील अभिनेत्री चेतना राजवर ‘फॅट फ्री’ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागला. उपचार सुरु असतानाच वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी चेतना राज हिचे निधन झाले. हल्ली सिने सृष्टीमध्ये काम करणारे कलाकार अधिक सुंदर किंवा देखणे दिसण्यासाठी स्वतःच्या शरीरावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असतात. पण त्याने शरीराचा नैसर्गिकपणा बिघडतो. आणि भविष्यात अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. असाच एक दुर्दैवी प्रकार कन्नड अभिनेत्री चेतना राज हिच्या सोबत घडला आहे. चेतना राज हिने ‘फॅट फ्री’ ही सर्जरी केली. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात केली होती. पण त्या नंतर तिला तिच्या शरीरात काही प्रमाणात बदल जाणवू लागले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिची तब्ब्येत खालावली. फुफ्फुसात पाणी शिरल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामध्ये चेतनाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चेतनाने जी शस्त्रक्रिया केली त्याबद्दल तिने तिच्या पालकांना काही सांगितले नव्हते. त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती. चेतना तिच्या मैत्रिणीसोबत एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी गेली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेला असा आरोप चेतनाच्या आई-वडिलांनी केला आहे. चेतनाचा मृतदेह बंगळुरूमधील एका रुग्णालयात आहे. तिचा मृतदेह रमाय्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात येणार आहे.  दरम्यान या सर्व प्रकरणी रुग्णालय समितीच्याविरोधात  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चेतना राज ही कन्नड मालिका विश्वातली आघाडीची आणि सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी हे यश संपादन केले होते. तिच्या गीता आणि दोरेसानी या तिच्या विशेष लोकप्रिय मालिका होत्या. चित्रपटांसोबतच चेतना अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याचप्रमाणे “हवाईयन” या चित्रपटातही चेतनाने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री या प्लॅस्टीक सर्जरी किंवा फॅट फ्री सर्जरी करतात. प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, शृती हसन या अभिनेत्रींनी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.

चेतना राजचे कुटुंब हे बंगळुरूमधील अबेगेरे या भागात राहते. चेतनाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचे कुटुंब शोकाकुल आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या संबंधी योग्य ठिकाणी आणि योग्य डॉक्टरांकडून त्यासंबंधी योग्य तो सल्ला घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.