कांतारा या सिनेमाने 2022 मध्ये अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले. सिनेमातील दृश्ये, कलाकारांचा अभिनय, लक्षवेधी संगीत आणि कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलं. यानंतर गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक सिनेमाच्या आगामी भागाची वाट पाहत आहेत. दरम्यान, या सिनेमाचा आता प्रिक्वेल येणार आहे. कांतारा सिनेमाच्या कथानकाचा पूर्वार्ध या सिनेमातून पहायला मिळणार आहे. ज्याचं नाव ‘कांतारा: चॅप्टर 1’ असे ठेवण्यात आले आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू असून एका वॉर सीनसाठी तब्बल 500 फायटर्स वापरण्यात आल्याचे समजत आहे. (kantara chapter 1 shot 500 fighters used for war scene)
भव्य सेटची उभारणी
मिळालेल्या माहितीनुसार, कांतारा सिनेमाला मिळालेले यश पाहता आगामी सिनेमा बनवणे मेकर्ससाठी एकप्रकारे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारून मेकर्सने एक अत्यंत प्रभावी आणि भव्य असा सेट उभारला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांवर छाप सोडून जावा म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न मेकर्सकडून केले जात आहेत. यावेळी निर्माते आणि दिग्दर्शक पूर्ण ताकदीने उतरले आहेत. सध्या कांताराच्या प्रिक्वेलचे शूटिंग सुरु आहे आणि यातील प्रत्येक सीनसाठी मेकर्सने भव्य सेट्सची उभारणी केली आहे. दरम्यान, एखादा कौटुंबिक सीन असो किंवा एखादा वॉर सीन असो तो प्रेक्षकांना खराखुरा वाटेल यासाठी संपूर्ण टीम प्रयत्नशील आहे.
ऐतिहासिक युद्ध आणि 500 पेक्षा जास्त फायटर्स
‘कांतारा: चॅप्टर 1’ या सिनेमात एका ऐतिहासिक युद्धाचा प्रेक्षकांना अनुभव मिळणार आहे. दरम्यान, हा वॉर सीन प्रेक्षकांना कसा खिळवून ठेवेल यावर मेकर्स मेहनत घेत आहेत. खास बाब म्हणजे, या सीनसाठी जितका भव्य सेट उभारला तितकेच प्रभावशाली फायटर्स बोलावण्यात आले होते. 20- 50 नव्हे तर तब्बल 500 फायटर्ससोबत हा सीन शूट करण्यात आला. एक भव्य शूटिंग सेट आणि 500 सराईत फायटर्ससोबत हा सीन कसा उत्तम करता येईल याकरता अॅक्शन कोरिओग्राफरने घेतलेली मेहनत सिनेमातून दिसून येईल. माहितीनुसार, हा युद्धाचा सीन प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
कधी प्रदर्शित होणार?
‘कांतारा: चॅप्टर 1’ या सिनेमातही मुख्य भूमिकेत अभिनेता ऋषभ शेट्टी झळकणार आहे. यावेळी आपल्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी त्याने कालारीपयट्टूमधील सर्वांत जुन्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. मोठ्या काळापासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. अखेर या सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे. मेकर्सने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात 2 ऑक्टोबर रोजी ‘कांतारा: चॅप्टर 1’ हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही पहा –
Kangana Ranaut : द माउंटन स्टोरी- एक प्रेमकथा, व्हॅलेंटाईन्सपासून सुरू होणार कंगनाचा नवा प्रवास