विदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी हॉटसीटवर!

'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आ

आपल्या अस्सल विदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून हेच मास्तर आता हॉटसीटवर बसून ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. येत्या शनिवारच्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी सहभागी होणार असून त्यांच्यासह कर्नल सुरेश पाटील हेही सहभागी होणार आहेत. युट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या आठवड्यातल्या विशेष भागात कराळे गुरुजी कर्नल सुरेश पाटील यांच्या ‘ग्रीन थंब एनव्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ग्रूप – साथी रे’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. करोना काळात शिकवणीचे वर्ग बंद होते, म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या नितेश कराळे यांनी ऑनलाईन पद्धतीनी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन देण्याचं ठरवलं. अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पद्धतीनी मांडण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते.

आपल्या भाषेतून संपादन केलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहतं, असं मत कराळे गुरुजींनी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर व्यक्त केलं. करोनाचं संकट येण्यापूर्वी कराळे 300 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं शिकवायचे. मात्र करोनामुळे शासनानी लॉकडाऊन केलं आणि सुरू असलेले क्लासेस बंद पडले. कराळे गुरुजींनीही ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुगल मीट, झूम अ‍ॅप यांच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. ज्वालामुखी शिकवताना कराळे गुरुजींची बोली अस्सल वऱ्हाडी असल्याने ‘खदखदणारा’ ज्वालामुखी, भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवतानाही त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरं लक्षात राहण्यास चांगलीच मदत होते आहे.

विदर्भातल्या एका मास्तरांनी वऱ्हाडी बोलीतून साध्या-सोप्या संकल्पना शिकवण्याचा विडा उचललेल्या आणि सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना हॉटसीटवर पाहणं हे मनोरंजक ठरणार आहे.


हेही वाचा :प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस