Kareena Kapoor Khan Social Media Post : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. सैफ अली खानवर 15 जानेवारी मध्यरात्री चाकू हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफ अली खानवर हल्ला केला आहे. सैफला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचारांना सुरुवात केली. यानंतर अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. यादरम्यान, सैफचे चाहते आणि कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते. आता नुकतीच करीना कपूर खानने या घटनेबाबत आपली पहिली प्रतिक्रिया इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.
करिना पोस्ट करत म्हणाली, “हा आमच्या कुटुंबीयांसाठी प्रचंड आव्हानात्मक दिवस होता. गेल्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलंय या सगळ्याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. आमचं कुटुंब या कठीण काळातून जात असताना, मी मीडिया आणि पापाराझींना आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, त्यांनी सतत अनुमान काढणं आणि या घटनेचं कव्हरेज करणं टाळावं.
View this post on Instagram
पुढे असंही म्हणतेय, या काळात तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. मात्र, सतत एखाद्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा सुरक्षेसाठी मोठा धोका होऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. एक कुटुंब म्हणून या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या. या संवेदनशील काळात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते”
दरम्यान, करीना कपूरने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेक बॉलीवूड कलाकारांनी पाठिंबा देत, “या कठीण काळात आम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत” अशा कमेंट केल्या आहेत.