कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध गेम शोचा पंधरावा सीजन आजपासून सुरू होत आहे. यावर्षी केबीसीला एक फॅमिली अवतार देण्यात आला असून, त्याचे शीर्षक ठेवण्यात आलं आहे, कौन बनेगा करोडपती इंडिया का फॅमिली गेम.
तेवीस वर्षे सुरू असलेला कौन बनेगा करोडपती आता कात टाकतोय. पंधराव्या सीजनमध्ये प्रेक्षकांसाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने करोडपतीचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात अद्यावत आणि सुधारित केले आहे. आज या सुप्रसिद्ध मालिकेचा प्रीमियर होणार असून, आठवड्यातून पाच वेळा या मालिकेचे प्रसारण होईल. ज्ञान आणि मनोरंजन यांचा उत्तम समन्वय असलेल्या या गेमचे सूत्रसंचालन हे अमिताभ बच्चन यांनीच केले आहे. यापूर्वी ते उत्साह आणि गंभीरतापूर्वक केबीसी चे सूत्रसंचालन करत होते. आता या बदललेल्या स्वरूपामध्ये खेळणे काहीप्रमाणात कठीण होणार आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत ते आकर्षक करण्यात आल्याची माहिती मिळते.
कौन बनेगा करोडपती सीजन 15 च्या बदललेला अवतारामध्ये, सुपर संदुक या नवीन श्रेणीमध्ये, स्पर्धकाला त्याचा हरवलेला टप्पा पुन्हा गाठता येणार आहे. देश का सवालमध्ये, प्रेक्षकांचा सहभाग आणखीन वाढेल कारण व्हिडिओ कॉल अ फ्रेंड, ऑडियन्स फोन याबरोबरच डबल डीप नावाची नवीन लाईफ लाईन जोडण्यात आली आहे. फास्टेस्ट फिंगर या काढून टाकलेल्या श्रेणीचा पुन्हा येथे समावेश करण्यात आला आहे. यावर्षी केबीसीचा सेट देखील अधिक आकर्षक करण्यात आलेला आहे. हे सगळे नवीन बदल प्रेक्षकांना आवडतील असे दिसते.
अमिताभ बच्चन पंधराव्या सीजनबद्दल सांगतात, ” कौन बनेगा करोडपती हा शो नेहमी ज्ञानदार,धनदार आणि शानदार राहिला आहे. त्यामुळे यावर्षीच्या शोमध्ये विकसित भारत आणि त्याच्या आकांक्षायासह मोठी स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत. हा शो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तसेच प्रेक्षकांबरोबर जोडण्याचा एक मंच राहिला आहे. मग तो प्रेक्षक हॉट सीटवर बसलेला असो किंवा आपल्या घरामध्ये आरामात बसून माझा शो पाहणारा असो. प्रत्येक स्पर्धकाबरोबर बोलून त्यांची विचारसरणी, जीवनशैली, संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न मी करतो. आणि हि माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी बाब आहे. इतकंच नव्हे, ज्या लोकांना जीवनामध्ये काही बदल घडवायचा आहे, त्यांच्यासाठी देखील त्या खेळापर्यंत पोहोचणे फार मोठी गोष्ट असते. खूपच प्रेरणादायी असतात या गोष्टी कारण त्यांना जिवनात बदल आणायचा असतो, महत्वकांक्षा पूर्ण करायची असते”.
मागील वर्षी, बक्षिसाची रक्कम दुप्पट केल्यावर, या वर्षी, केबिसीचे स्वरूपच बदलले आहे. हे सगळे बदल वाढती स्पर्धा, प्रेक्षकांची बदलेली मानसिकता, यामुळे करण्यात आल्याचे कारण सुस्पष्ट दिसत आहे. बघुयात प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत उतरते ते !!!
हेही वाचा- ‘गदर 2’ च्या प्रमोशनमध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल