केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं, ठाण्यात दोन गुन्हे दाखल

मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. केतकी अनेकदा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्या अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत असतात. मात्र आता तिने पुन्हा असंच एक वादग्रस्त कृत्य केलेलं आहे. ज्यामुळे तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये अॅडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने शेअर केली आहे.

केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, केतकी प्रसिद्धीसाठी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे.

ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाृ दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. केतकीविरोधात पुण्यातसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

केतकी चितळे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय नसते. मात्र तिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच वादात सापडते. केतकीला काही वर्षांपासून अपस्मार हा आजार आहे.

 


हेही वाचा :‘पृथ्वीराज’ चित्रपटातील ‘हरिहर’ गाण्याला मराठमोळ्या आदर्श शिंदेचा आवाज