घरमनोरंजन'खिसा'ने पटकावला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

‘खिसा’ने पटकावला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

Subscribe

हा लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा आहे.

नुकतेच ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये केंद्रिय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्कार घोषीत केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर ‘खिसा’ या लघुपटाने आपले नाव कोरले, त्यातच आता ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार पटकावला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केले असून, लेखन कैलास वाघमारे यांनी केले आहे. हा लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा आहे. एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी ही कथा यात मांडली आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खिसा या मराठी लघुपटाची गोव्यातील ५१ व्या भारतीय आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड करण्यात आली होती. असे अनेक पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत. इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२०मध्ये या लघुपटला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले होते. कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्ट्स अवॉर्ड्स, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांतही ‘खिसा’ची निवड करण्यात आली आहे. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी हा लघुपट पात्र ठरला आहे. तर डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२०मध्ये ‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले आहे.

”आपल्या सर्वांनाच माहित आहे, की वर्षभरात ‘खिसा’ जगभर गाजतोय. जगभरातील अनेक मोठमोठ्या फिल्मफेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रिमिअरचा बहुमान पटकावल्यानंतर भारतातही ‘खिसा’ने अनेक फिल्म फेस्टिवलवर आपली मोहोर उमटवली आणि आता तर राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यामुळे माझ्यासाठी ही खूपच आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. ‘खिसा’साठी नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार मला मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो संपूर्ण टीमला मिळाला आहे. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते. त्यामुळे सगळ्या ज्युरींसह मी संपूर्ण टीमचेसुद्धा आभार मानतो. एवढा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आता जबाबदारीही तितकीच वाढली आहे. त्यामुळे भविष्यातही अधिक आशयपूर्ण चित्रपट देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असू ,अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘खिसा’चे दिग्दर्शक राज मोरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय गृहसचिवांना भेटून फोन टॅपिंगची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार – फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -