“कोलकाता प्रशासन आणि सरकारने केकेची हत्या केली”, नंदिता पुरी यांचा गंभीर आरोप

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची बायको नंदिता पुरी (Nandita Puri) यांनी फेसबुक पोस्ट लिहून कोलकाता प्रशासनावर टीका केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके (Krushnakumar Kunnath) याचं कोलकाता (Kolkata) येथे ३१ मे रोजी रात्री निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लाईव्ह कॉन्सर्ट (Live Concert) दरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला. रात्री 10.30च्या सुमारास त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (Medical Research Institute) नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, आता यावरून पश्चिम बंगाल सरकार (West Bengal) आणि प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. कोलकाता प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्याने केकेचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, यावरून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची बायको नंदिता पुरी (Nandita Puri) यांनी फेसबुक पोस्ट लिहून कोलकाता प्रशासनावर टीका केली आहे.

“पश्चिम बंगालला लाज वाटायला हवी. कोलकाता प्रशासनाने केकेची हत्या केली आणि आता पश्चिम बंगाल सरकार यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतंय. कॉन्सर्टमध्ये कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. अडीच हजार क्षमता असलेल्या नजरूल मंच (Najrul Manch) या ऑडिरोटीयममध्ये ७ हजार लोक उपस्थित होते. एसी काम करत नव्हते. केके घामाघुम झाला होता. ४ वेळा तक्रार करूनही त्याचं कोणीही ऐकलं नाही. ना औषधं होती, ना प्राथमिक उपचाराची सोय होती, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत बॉलिवूडने पश्चिम बंगालमध्ये परफॉर्म न करता बायकॉट (Boycott) केलं पाहिजे,” अशा आशयाची पोस्ट नंदिता यांनी लिहिली आहे.

पुढे त्या म्हणतात की, “माझी ही पोस्ट पश्चिम बंगाल किंवा कोलकताला आणि तेथील नागरिकांना बदनाम करण्यासाठी नाही. तर, मला फक्त सरकार आणि प्रशासन यांचं गैरव्यवस्थापन आणि विशेषत: नजरुल मंचची मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या लोकांवर माझा रोख आहे.”

केकेचा मृत्यू झाल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्टदरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओनुसार ऑडिटेरिअममध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे. तसेच, केके घामाघुम झाला असून तो सतत एसी चालू करण्याची मागणी करत आहे. त्या अस्वस्थतेतही केकेने आपल्या गाण्यांचं उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, मात्र अखेर त्रास सहन न झाल्याने तो खोलीत खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.