‘कुणी गोविंद घ्या…?’ हे नात्यातल्या संवादाची गोष्ट सांगणारे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स या संस्थांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत असे तरुण कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. उदयराज तांगडी हे नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत.
‘संवाद’ ही नात्यांमधली छोटीशी पण महत्वाची गोष्ट असते; पण आपण नेमकी तीच टाळतो. योग्यवेळी संवाद न साधल्याने परिणाम होतात ते सांगणारे हे नाटक आहे. या नाटकात नात्यातली एक दुर्लक्षित गोष्ट विनोदी पद्धतीने मांडली आहे, असे मत नाटकाच्या निर्मात्या मोनाली तांगडे यांनी नाटकाविषयी बोलताना वक्त केले.
नात्यात पारदर्शकता नसेल तर काय काय घडू शकते याचे प्रतिबिंब या नाटकात दिसून येईल. सध्याच्या फेसबूक, व्हॉट्सअपच्या काळात जीवनातला संवाद हा कुठेतरी मरत चालला आहे. त्यामुळे एकमेकांबद्दल नको ते गैरसमज वाढत चालले आहेत. त्यातून एकमेकांना गृहीत धरण्याचे प्रमाणही वाढत आहे, अशी भूमिका लेखक व दिग्दर्शक दीपेश सावंत यांनी या नाटकाबाबत बोलताना मांडली.
या नाटकात मी विवेक ही भूमिका करतोय. तो पेशाने वकील आहे आणि या यातल्या मुख्य पात्रांचा तो मित्र आहे. त्यातला समतोल तो सांभाळत आहे. त्या दोघांची घटस्फोटाची केस तो हाताळत आहे. त्या दोघांमधला तो दुवा आहे. जे नाटक घडतेय, ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन जाण्याचे काम तो करतोय. विनोदी पण हजरजबाबीपणा असलेली ही भूमिका आहे. नाटक विनोदी अंगाने जात असले. तरी ते मार्मिक आहे, अशा भावना अभिनेता प्रसाद रावराणे याने वक्त केल्या.
या नाटकात मी संध्या हे पात्र साकारत आहे. संध्या हे पात्र फिल्मी आहे. तिला सिरियल्सचे वेड आहे. पण ते तसे का आहे, ते नाटक बघितल्यावर कळेल. या नाटकात तिच्या या पात्राला विविध छटा आहेत असे सांगत, हे सर्व अनुभवण्यासाठी आमच्या नाटकाला नक्की या, असे आवाहन या नाटकात स्त्री-पात्र साकारणाऱ्या विभूती सावंत हिने या निमित्ताने बोलताना केले.
हेही वाचा :