बॉलिवूड कलाकारांसोबत ठरली अखेरची होळी, सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आज त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, मृत्यूच्या एक दिवस आधी सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांसोबत उत्साहाने रंगपंचमी साजरी के्ली होती. यावेळचे फोटो देखील त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले होते. सतीश कौशिक यांचे हे फोटो आणि पोस्ट त्यांची अखेरची पोस्ट ठरली आहे.

सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट

7 मार्च रोजी सतीश कौशिक यांनी होळीचा फोटो ट्विटरवर शेअर करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोंमध्ये सतीश खूप आनंदी दिसत आहेत. सतीश जुहू येथील जानकी कुटीर येथे होळी पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत त्यांच्यासोबत जावेद अख्तर, बाबा आझमी, शबाना आझमी, अली फजल आणि रिचा चढ्ढा देखील उपस्थित होते. सतीश यांनी हे फोटो ट्विट करून लिहिलं होतं की, “रंगीत आणि मजेदार होळी. नवविवाहित जोडप्याला (अली फजल आणि रिचा चढ्ढा) भेटलो. सर्वांना होळीच्या शुभेच्छा.” सतीश कौशिक यांच्या या शेवटच्या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सही दु:ख व्यक्त करत आहेत. होळीच्या दिवशी सतीश कौशिक यांनी केलेले ट्विट हे त्यांचे शेवटचे ट्विट असेल याची कुणालाही कल्पना नव्हती.


हेही वाचा :

अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, अनुपम खेर यांनी दिली माहिती