Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन गेल्या वर्षी 'या' नाटकांना झाली रसिकांची गर्दी

गेल्या वर्षी ‘या’ नाटकांना झाली रसिकांची गर्दी

Subscribe

जरी ओटीटी, सिनेमे असले, सिरीयल्स असल्या तरीसुद्धा नाटक हे नाटकच आहे. आम्ही मास्क लावून, एक खुर्ची सोडून का होईना पण बसू ,आम्ही नाटक बघू. - श्वेता पेंडसे

कोविड काळातील लॉकडाऊनमध्ये बाहेरील करमणुकीची सर्व साधने लोकांसाठी बंद झाली होती. सिनेमा तसेच मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. त्यामुळे टेलिव्हिजनवर जुने चित्रपट पाहणे, वाहिन्यांवरील पुनः प्रक्षेपित कार्यक्रम किंवा मालिका पाहणे किंवा जास्तीत जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध कार्यक्रम पाहणे हीच मनोरंजनाची साधने होती. म्हणता म्हणता कोविडची दोन वर्षे उलटली आणि दरम्यान गेल्या वर्षी 2022 मध्ये निर्बंध उठले. आश्चर्य म्हणजे सिनेमांपेक्षा नाटकांना अधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या नाटकांची रेलचेल तर होतीच, परंतू नव्या नाटकांची त्यात भर पडली. अनेक नाटकांना हाऊसफुल्लचे बोर्ड लागले. नुकतेच सरलेले २०२२ हे वर्ष मराठी नाटकांसाठी सुखद ठरले असे बोलले जाऊ लागले. याचा एक नमुना म्हणजे कुठल्याशा वर्तमानपत्रामध्ये नाटकाच्या जाहिरातींनी भरलेले पूर्ण पान छापून आले. ते एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आणि अनेक रंगकर्मीसोबत प्रेक्षकांनादेखील सुखद धक्का बसला !… नुकतेच सरलेले २०२२ हे वर्ष नाटकांसाठी खरेच कसे होते, हे काही रंगकर्मींकडून ‘आपलं महानगर’ ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याच या प्रतिक्रिया …

  • क्षितिज झारापकर, अभिनेता व नाट्यसमीक्षक

करमणूक हा प्रकार तसा वाटला नाही तरी ती मानवाची एक मूलभूत गरज आहे. हे कोविड नंतरच्या काळाने सिद्ध केलं आहे. लॉकडाऊन नंतर ओटीटी ह्या नवीन माध्यमाने थैमान घालून चित्रपट व टेलिव्हिजन ची करमणुकीची प्रचलित साधनं उध्वस्त करून टाकली. मात्र मराठी माणसाच्या करमणुकीचे पारंपारिक माध्यम – म्हणजे नाटक – हे निर्बंध उठल्यापासून पुन्हा बाळसे धरून उभे राहिलेले दिसते. सुरुवात कोविड पूर्वीच्याच यशस्वी नाटकांनी झाली पण प्रेक्षकांचा उत्साह पाहून नवीन नाटकं आली. आज नाटकाचं तिकिट ४०० ते ५०० रुपये असतानाही रसिक असा उदंड प्रतिसाद देत आहेत. ओटीटी समोर चित्रपटांनी मान टाकली पण २०२२ मध्ये मराठी नाटक आपली विजयी पताका दिमाखात मिरवत आहे.

- Advertisement -

सध्या ‘चर्चा तर होणारच’ ह्या नाटकात मी अभिनय करतोय. चर्चा हे नाटक आजच्या समाजाला आरसा दाखवणारं एक अत्यंत मिश्किल नाटक आहे. आज सोशल मीडिया वर ज्या चर्चा रंगतात त्यात मुद्दे गहन असतात. मात्र त्यावरचे कॉमेंट आणि रिअँक्शन ह्या बऱ्याचदा तार्किक आणि विचारपूर्वक असतातच असं नाही. हे विदारक सत्य लोकांपुढे मांडणारं सोशल सटायर म्हणजे चर्चा तर होणारच.

  • गिरीश ओक, अभिनेता

Stream रंगपंढरी - Girish Oak - Part 1 by Rang Pandhari / रंगपंढरी | Listen online for free on SoundCloud

- Advertisement -

मला कोरोनाचा काळ आठवला. तो फारच विचित्र आणि अंधकारमय काळ होता. कोविड सारत असताना सिनेमाचे हॉल आणि नाट्यगृह उघडायची होती. हे कधी सुरू होणार आणि लोक कधी यायला लागणार असे दोन प्रश्न समोर उभे होते. दरम्यान या सगळ्यामध्ये ओटीटी हा नवा प्लॅटफॉर्म मिळाला. मनोरंजना सोबत आणखी काही वेगळ्या गोष्टी ओटीटी च्या माध्यमातून लोकांसमोर आल्या. पण शेवटी ज्याला आपण थिएटर म्हणतो किंवा प्रत्यक्ष रंगमंदिरात जाऊन आपल्याला जे जिवंत पाहायला मिळतं ते समाधान त्यात नव्हतं. मराठी माणसाबद्दल गमतीत असं म्हणतात की, उद्या चंद्रावर त्याने वसाहत केली तर तो प्रथम नाटक बसवायला घेईल. तर हे जे काही नाटक बसवून नाटकाला जाणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. कोविड नंतर आता खूप चांगली चांगली नाटकं रंगभूमीवर आली आहेत आणि पुन्हा लोक उत्साहाने आणि त्याच पूर्वीच्या तयारीने यायला लागले आहेत. नाटकांना लोकं छानछान कपडे घालून, बायका केसात गजरा माळून येतात हे पाहिलं की, बरं वाटतं !

याच काळामध्ये माझं ‘38 कृष्णविला’ म्हणून नाटक आलं. मला व्यक्तिशः रिस्क वाटत होती कारण हे नाटक वेगळ्या प्रकारचं आहे, शब्दप्रधान आहे आणि तरीही ते लोकांनी त्याचं कौतुक केलं. त्याचे आता शंभरपर्यंत प्रयोग झाले आहेत. त्यामागोमाग आता माझं रत्नाकर मतकरीलिखित दुसरं नाटक ‘काळी राणी’ आलं आहे. हे नाटक ’38 कृष्णविला’ पेक्षा पुर्णपणे विरुद्ध टोकाचे नाटक आहे. अतिशय प्रॉमिसिंग यंग टीम माझ्यासोबत आहे. तर खूप छान असं वातावरण आता तयार झालेला आहे. जे टिकवून ठेवणं आमच्याही हातात आहे आणि प्रेक्षकांच्याही हातात आहे. मी आमच्या हातात जास्त म्हणून कारण आम्ही चांगली नाटकं दिली तर प्रेक्षक येतात. मधला वाईट काळ काढला त्यामध्ये प्रेक्षकांची काय अवस्था झाली होती हे आपल्याला माहित आहे. आणि माझी कलाकार म्हणून इतकी विचित्र अवस्था झाली होती की, कधी कधी अक्षरशः रडू यायचं !… आपल्याला नाटक कधी करायला मिळणार पुन्हा असा प्रश्न पडला होता पण आता सगळं सुरळीत झालं आहे. नाटकाला गेलं पाहिजे आणि नाटक टिकवलं पाहिजे.

  • हेमांगी कवी, अभिनेत्री

Now Petrol Will Be Turned On Lemon Hemangi Kavi Post Goes Viral On Social Media | Hemangi Kavi : आता लिंबूवर पेट्रोल फिरवणार आहे, हेमांगी कवीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर नाटकांच्या ज्या जाहिराती पाहायला मिळतात, त्या पाहून मला प्रचंड आनंद होतोय. मला अशी खूप भीती वाटली होती की, कोविड नंतर नाटकांचं काय होणार ?… कारण या काळामध्ये सर्वात शेवटी एंटरटेनमेंट बिझनेस ओपन केला गेला होता. त्यातही सिनेमाच सुरू झाला होता. पण नाटक सुरू झालं नव्हतं. मग आता नाटकाचं काय होणार,?… ही एक वर्षापूर्वीची भीती होती. आज पेपर उघडल्यानंतर जाणवतं की, आज सिनेमांपेक्षाही नाटकं जास्त आलेली आहेत. हे खूपच पॉझिटिव्ह आहे. मला तर असं वाटत होतं की, लोक वेगळ्या माध्यमांकडे वळलेली आहेत त्यामुळे ती नाटकाकडे येणार नाहीत. पण आज डिसेंबर महिन्यामध्ये रंगभूमीवर दहा ते बारा नाटकं आली आहेत. त्यामुळे नाटकाचा प्रेक्षक कुठेही गेलेला नाही याचा एक रंगकर्मी म्हणून मला प्रचंड आनंद होतोय. तुमच्याकडे कितीही वेगवेगळे ऑप्शन्स निर्माण झालेले असतील, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या बजेटमधले तरीसुद्धा नाटकाला येणारा मराठी माणूस अजूनही इथे आहे !

  • मयुरेश पेम, अभिनेता

Mayuresh Pem Contact Info | Find Influencer Numbers, Address, Email in #1 Influencer Marketing Platform

प्रथम तर मला सांगावसं वाटतं की, कोविड नंतर जेव्हा नाटक आणि सिनेमागृह उघडली गेली तेव्हा लोकांनी सर्वात जास्त गर्दी नाटकांना केली. लोकांनी सर्वात जास्त प्रतिसाद नाटकांना दिला. मला खरंतर हे अपेक्षितच नव्हतं कारण दोन वर्षांचा एक मोठा गॅप पडला होता. पण लोकांनी खूप मनापासून प्रतिसाद दिला. बरीच नाटकं हाउसफुल्ल झाली. बरीच नवीन नाटकं आली. नोव्हेंबर आणि डिसेंबर या २०२२ च्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये अंदाजे ३० नाटकं तरी नवीन आली. कोविड नंतर ज्या नाट्यनिर्मात्यांनी आणि नाट्यसंस्थांनी सर्वात प्रथम पुढाकार घेऊन नाटक करण्याचं धाडस केलं त्यांना माझ्याकडून सॅल्यूट आहे. नाटकांना आज हा जो सुकाळ आलेला आहे त्याचं सारं श्रेय त्यांना जातं. त्यांनी जर धाडस केलं असतं तर आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते. यावर्षी सर्व नवीन नाटकांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांचे हजारोंनी प्रयोग व्हावेत अशी सदिच्छा आहे. अर्थात २०२२ मध्ये मी दोन सिनेमांमध्ये व्यस्त असल्यामुळे, माझी नाटकं येऊ शकली नाही. मात्र यावर्षी 2023 मध्ये माझी दोन नाटकं रंगभूमीवर येणार आहेत. एक रंगकर्मी म्हणून मला याचा खूप आनंद आहे !

  • श्वेता पेंडसे, नाट्यलेखिका आणि अभिनेत्री

Shweta Pendse - MarathiCelebs.com

२०२२ हे वर्ष आपण रिकवरीचं वर्ष असं म्हणू शकतो. म्हणजे पैशांची रिकवरी नव्हे, तर कोविडमुळे आपण एका मानसिक स्टेटमध्ये होतो त्यातून आपल्याला रिकव्हर व्हावं लागलं. कोविडचा सर्वात जास्त परिणाम एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर झाला होता. कारण सगळ्या लोकांना तेव्हा असं वाटलं होतं की, सर्वात कमी गरजेचं जर क्षेत्र कुठला असेल तर ते मनोरंजन क्षेत्र आहे. पण दोन वर्ष आपण ज्या कोविडमुळे मानसिक खच्चीकरणतून, तणावातून गेलो तेव्हा लोकांना असं वाटलं की आता थोडीशी करमणुकीची- मनोरंजनाची गरज आहे. या क्षेत्राचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे, यांचं लोकांना रीलायझेशन झालं.

आमचं ’38 कृष्णविला’ हे नाटक कोविड काळात लिहिलं गेलं. ते केव्हा एकदा रंगभूमीवर आणतोय असं आम्हाला वाटत होतं. हे नाटक खूप आमच्यासाठी खूप सोयीचं झालं कारण की है दोन पात्री नाटक होतं . त्याचा सेटअप खूप छोटा होता. आम्ही आमच्या मानधनाबाबतही खूप रिजिड राहिलो नाही. मानधनापेक्षाही रंगभूमी टिकली ही ओढ प्रत्येकामध्ये होती.

नाटक कुठलं,कोणाचं, कोणत्या निर्मात्याचं , कोणत्या बॅनरचं, कोणत्या दिग्दर्शकाचं आहे, यापेक्षाही अरे कुणाचे का असेना नाटक होणं महत्वाचं हे २०२२ने शिकवलं. यात कुठेही स्पर्धा नाही आणि सगळ्यांची ही एकत्रितपणे एकच भावना आहे. ही भावना आणखीन अधोरेखित झाली. नाट्यक्षेत्राकडे बघण्याच्या या दृष्टिकोनाच्या दृष्टीनेसुद्धा हे वर्ष महत्त्वाचं होतं. प्रेक्षकांचा एकूण प्रतिसाद पाहता त्यांनाही आता ही जाणीव झालेली आहे की, त्यांच्यासाठीही नाटक महत्त्वाचं आहे. जरी ओटीटी, सिनेमे असले, सिरीयल्स असल्या तरीसुद्धा नाटक हे नाटकच आहे. आम्ही मास्क लावून, एक खुर्ची सोडून का होईना पण बसू ,आम्ही नाटक बघू. तेव्हा रंगभूमी चिरायू होवो आणि प्रेक्षक तिला असंच जगवत राहो हीच सदिच्छा !

- Advertisment -