घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षाचे होते. गेल्या महिन्याभरापासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो होत्या. सायरा बानो दिलीप कुमारची खास काळजी घेत होत्या. तसेच चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र आज दिलीप कुमार त्यांची प्राण ज्योत मावळली. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

- Advertisement -

दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तीन दशके आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजावली. आजही भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी दिलीप कुमार एक होते. तसेच चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकारांसाठी ते मोठा आदर्श होते. दिलीप कुमारांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक कलाकरांनी बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. करियरमध्ये यशाचे शिखर गाठणाऱ्या या ९८ वर्षीय अभिनेत्याची मात्र आज आजाराशी झुंज अपयशी ठरली. वाढते वय आणि आजारापणामुळे गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. याशिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.

दिलीप कुमार यांचे करियर 

दिलीपकुमार यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले. याचदरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.  १९४४ साली त्यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिलीप कुमार यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. परंतु त्यानंतर अभिनेत्री नूर जहांबरोबरची त्यांची बॉलिवूडमधील सुपर हिट जोडी ठरली. ‘जुगनू’ हा चित्रपट दिलीप कुमार यांचा पहिला सुपर हिट चित्रपट ठरला. यानंतर दिलीप कुमार यांचे एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ऑगस्ट १९६० मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट त्यावेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट होता.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये जन्म झालेले दिलीप कुमार 

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे पहिले नाव युसूफ खान होते. नंतर त्यांना दिलीप कुमार म्हणून पडद्यावर प्रसिद्धी मिळाली. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून दिलीप कुमार यांनी आपले नाव बदलले. त्यानंतर प्रेक्षक देखील त्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखू लागले.

दिलीप कुमार यांनी मिळालेले पुरस्कार 

दिलीप कुमार यांना आत्तापर्यंत आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक पुरस्कार जिंकलेल्या दिग्गजांच्या यादीत दिलीप कुमार यांचे नाव असल्याने याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. दिलीप कुमार यांना १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९४ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. तर १९९८ साली त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ हा पुरस्कारही देण्यात आला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -