सामान्य चेहेऱ्याचा असामान्य कलाकार…इरफान!

irfaan khan in jurassic world

‘एक डॉक्टर की मौत’मध्ये तो पडद्यावर दिसलेला इरफान खान, मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’मध्ये झळकला, त्यावेळी जेमतेम २० वर्षांचा होता. त्याचा सहज सुंदर अभिनय, मोठे आणि बोलके डोळे हे त्याचं वैशिष्टय होतं. छोट्या पडद्यावर ‘चंद्रकांता’ मालिकेत इरफानने धाडसी शूर सरदाराची केलेली भूमिका गाजली होती. स्टार प्लसच्या ‘शू…कोई है..’, ‘रिशते’, अशा मालिकांमध्ये त्याने मिळेल त्या छोट्या मोठ्या भूमिका केल्या. महेश भट्टने इरफानला ‘रोग’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले. पूजा भट त्याचं दिग्दर्शन करत होती. इरफान उत्तम अभिनेता आहे. पण हिंदी सिनेमाचा हिरो होईल का? अशी शंका त्यावेळी सिनेवर्तुळात उपस्थित केली गेली होती. हा चित्रपट पोस्टरपासूनच वादग्रस्त ठरला आणि महेश भट्टवर होणाऱ्या एका गटाच्या टोकदार टीकेचा इरफारनही वाटेकरी झाला. पण इरफानने त्याची कधीही पर्वा केली नाही. इस्लाम धर्माविषयी सडेतोड मत व्यक्त करताना त्याला स्वधर्मातील कट्टरवादी समूहांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले. विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ने इरफानच्या डोळ्यांपासून अभिनयापर्यंत सर्वच पैलूंना न्याय दिला. म्हणूनच हा सिनेमा भारतातील पहिल्या पाच दर्जेदार सिनेमांमध्ये गणला जातो.

मराठी दिग्दर्शक निशिकांत कामतसोबत इरफानने ‘मदारी’ केल्यावर त्याचं कौतुक होणारच होतं. समांतर सिनेमा किंवा कलात्मक चित्रपटात पंकज कपूर, नसिरुद्दीन शहा आणि ओम पुरीनंतर कोण?..असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याला इरफान हे एकमेव उत्तर होते. व्यावसायिक आणि वास्तववादी, कलात्मक, समांतर, विद्रोही, तद्दन गल्लाभरू आशा कुठल्याही मर्यादा इरफान खानच्या अभिनयाला नव्हत्या. एकीकडे ‘लंच बॉक्स’ सारखा भावनिक संवादपट करत असताना निव्वळ व्यावसायिक सिनेमात इरफान सहनायक, खलनायकही रंगवत होता. शाहरुखच्या महत्वाकांक्षी ‘बिल्लू बार्बर’मध्ये इरफानने बिल्लू केस कापणा-याची भूमिका अशी रंगवली की इरफान पडद्यावर असल्यावर मला माझ्या अभिनयाच्या मर्यादा जाणवतात असं शाहरुखने म्हटलं होतं.

‘पान सिंह तोमर’मध्ये भूमिकेच्या दोन शेड्स होत्या. व्यवस्थेने संपवलेला खेळाडू आणि निर्माण झालेला खतरनाक डाकू…हे दोन्ही टोकाचे बदल साकारणारा इरफानच होता. ‘लाईफ ऑफ पाय’मुळे हॉलिवूडमध्येही इरफानचा दबदबा होता. मोठाल्या वेब सीरीजवरही इरफान झळकत होता. खूप सारे नवे प्रोजेक्ट्स समोर असताना इरफनला दुर्मिळ अशा कर्करोगाने ग्रासले. मधल्या काळात अमेरिकेत जाऊन त्याने उपचारही घेतले. त्यावेळी उपचारादरम्यान तो म्हणाला होता… ‘आयुष्य, आपलं काम, आनंद आणि जगणंही किती क्षणभंगुर असू शकतं याचा अनुभव मी घेतोय’! आज हिंदी आणि इंग्रजी रुपेरी पडद्यावरच्या झगमगाटात एक सामान्य माणसाचा चेहरा असलेला असामान्य अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला…