घरमनोरंजनशतदा प्रेम करावे

शतदा प्रेम करावे

Subscribe

दिग्दर्शक मनोज सावंत अवघ्या पंधरा वर्षांचा असताना चित्रपटसृष्टीने त्याला भुरळ घातली. काही केले तरी भविष्यात दिग्दर्शक व्हायचे हे त्याने ठरवले. ठरवले म्हणजे दिग्दर्शक होता येते असे नाही. परंतु त्या क्षेत्रात वावरण्यासाठी जी आवश्यक गुणवत्ता लागते, ती त्याने मिळवली. झी समूहामध्ये मालिकांचे प्रमोशन करण्यासाठी जी कल्पकता आवश्यक असते ती त्याने दाखवली. चौदा वर्षे त्याने कामही केले. पण एका ठरावीक टप्प्याला आपले चित्रपट दिग्दर्शन करायचे राहून गेल्याचे त्याच्या लक्षात आले. पत्नी डॉ. वैशाली सावंत हिला विश्वासात घेऊन नोकरीला रामराम ठोकला आणि येत्या काही वर्षात चित्रपट झालाच पाहिजे हे त्याने ठामपणे ठरवले. ११ जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘लव यू जिंदगी अर्थात शतदा प्रेम करावे’ हा त्याचा पहिलावहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे.

महागुरू अर्थात सचिन पिळगावकर यांचा ‘एका पेक्षा एक’ हा रिऍलिटी शो झी मराठीवर सुरू असताना मनोजबरोबर त्यांची ओळख झाली. आपण चित्रपट निर्मिती करत असल्याचे त्याने सचिनला सांगितले. नवकलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे हा सचिनच्या स्वभावाचा एक भाग आहे. सचिनने होकार दिला आणि निर्माता शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. सचिन बामगुडे यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. चित्रपट निर्मितीविषयी त्यांच्या मनात नेहमीच कुतूहल होते. फारसे आढेवेढे न घेता पहिल्याच भेटीत चित्रपट करण्याची तयारी दाखवली. चित्रपटाचे प्रमोशन, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे यांच्यासाठीसुद्धा मोठी रक्कम मोजावी लागते. सहनिर्माता घेण्यापेक्षा स्वत:हूनच पुढाकार घेऊन हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवलेले आहे. सचिन पिळगावकर हे यात मुख्य भूमिका निभावत आहेत तर कविता लाड, प्रार्थना बेहेरे यांचासुद्धा कलाकार म्हणून सहभाग आहे.

- Advertisement -

माणूस म्हटलं की स्वत:चं जीवन कसं जगावं याविषयी त्याच्या काही संकल्पना असतात. तो त्या पूर्ण करण्याचा, जगण्याचा प्रयत्न करत असतो. चित्रपटातला नायक जो कुटुंब प्रमुख आहे, आयुष्यभर धावपळ केल्यानंतर आता कुठे त्याच्या जीवनात स्थीरता आलेली आहे. बायको, मुलगी यांची विश्वासार्हता मिळवल्यानंतर आपल्याला पुन्हा तारूण्यातील आयुष्य जगता येईल का असे काहीसे विचार त्याच्या मनात येतात. तारूण्य म्हणजे चंगळ संस्कृती. आवडत्या युवतीच्या प्रेमात पडणे, छान आयुष्य जगणे असं काहीसं नायक जगायला लागतो, त्याची कथा म्हणजेच ‘लव यू जिंदगी अर्थात शतदा प्रेम करावे’ असे काहीसे दिग्दर्शकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेलिब्रिटी कलाकारांबरोबर नवकलाकारांनासुद्धा यात प्राधान्य दिलेले आहे.

जिंदगी म्हणजे कायम स्मरणात राहणारी गोष्ट जी तुम्हाला सतत जगायला भाग पाडते, आनंद देते. यात सहभागी झालेले कलाकार जिंदगीविषयी सांगतात – कविता लाड या अभिनेत्रीने माझी जिंदगी ही मराठी रंगभूमी आहे जिच्यावर मी नितांत प्रेम करते. माझी सुरवात ही रंगभूमीपासून झालेली आहे. मला आनंद देण्यासाठी हीच रंगभूमी कारणीभूत ठरलेली आहे. प्रार्थना बेहेरे हिने स्वत:च्याच जगण्याला जिंदगी नाव दिलेले आहे. सतत आनंदी राहणे, क्रियाशील राहणे हा माझ्या स्वभावाचा एक भाग आहे. त्यामुळे आय लव यू म्हणावी अशी ही माझी जिंदगी आहे.

- Advertisement -

 सचिनची सच्ची गोष्ट
कोणत्याही अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून सूत्रे हाती घेतली की हळुहळू दुसर्‍याकडे कलाकार म्हणून काम करण्याचा त्याचा प्रवास थांबतो. पण सचिन पिळगावकरांच्या बाबतीत तसे झालेले नाही. अनेक दिग्दर्शकांकडे त्यांना काम करायला मिळालेले आहे. ‘सोहळा’ आणि ‘लव यू जिंदगी’ हे त्यांचे दोन चित्रपट एकामागोमाग प्रदर्शित होत आहेत. ‘लव यू जिंदगी’ हे शिर्षक सचिन यांनी सुचवले अणि त्याला ‘शतदा प्रेम करावे’ हा टॅग देण्याचे काम सचिनची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी केले. १९६२ साली सचिन हा साडेचार वर्षांचा होता. एका चित्रपटात काम करण्यासाठी त्याला स्टुडिओमध्ये नेले होते. प्रकाशमान दिवे आणि कॅमेर्‍याची घरघर त्याच्या बालमनाला इतकी भावली की तिसर्‍या दिवशी तो त्या वातावरणात एकरूप झाला. जे काही मिळालं ते सचिनसाठी एकप्रकारे लव यू जिंदगी असेच म्हणावे लागेल. निर्मात्याने, दिग्दर्शकाने ज्या धाडसाने हा चित्रपट पूर्ण केला त्याला सचिनने सन्मानाने सलाम ठोकलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -