घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या कालिदासमधून वैभव मांगलेंची बॅग लंपास

नाशिकच्या कालिदासमधून वैभव मांगलेंची बॅग लंपास

Subscribe

‘अलबत्त्या गलबत्त्या’ नाटकाच्या प्रसंगी कालिदासच्या प्रांगणात उभ्या केलेल्या बसमधून प्रसिद्ध कलाकार वैभव मांगले यांच्यासह कलाकारांच्या बॅगा चोरीला गेल्या.

तब्बल अकरा कोटी रुपये खर्च करून महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. लाखोंचे सीसी टीव्ही बसवण्यात आले. मात्र, कलामंदिरातील सुरक्षा व्यवस्था अजूनही वार्‍यावर आहे. नुकत्याच झालेल्या ‘अलबत्त्या गलबत्त्या’ नाटकाच्या प्रसंगी कालिदासच्या प्रांगणात उभ्या केलेल्या बसमधून प्रसिद्ध कलाकार वैभव मांगले यांच्यासह कलाकारांच्या बॅगा चोरीला गेल्या. त्यात हजारोंची रोख रक्कम, कपडे आणि महत्वाचे साहित्य असून याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातून कलामंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.या आधी अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेता सुमीत राघवन यांनी नाट्यगृहातील अस्वच्छता समोर आणली होती.

प्रसिद्ध कलावंत वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलले अलबत्त्या गलबत्या नाटकाचे दोन खेळ गुरुवारी (दि.९) सकाळी ९.३० आणि दुपारी १ ला कालिदास कलामंदिरात झाले. कलामंदिराच्या मागच्या बाजूने सावलीत गाडी उभी करण्यात आली होती. ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांमध्ये दिसलेल्या चित्रीकरणानुसार दुपारी २.५८ ला चोरटा शिवाजी उद्यानातून उडी मारून बसमध्ये शिरला. अवघ्या दोन मिनिटांतच बसमधील बॅगा घेऊन तो पसार झाला. दोन्ही शो आटोपून कलाकार मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर अचानक बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बस पुन्हा कालिदासमध्ये आणून कलामंदिराच्या व्यवस्थापनाकडे धाव घेतली. मात्र, व्यवस्थापकांनी हात वर केल्याने संबंधितांच्या डोळ्यात पाणी तरारले. नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी मोठ्या मेहनतीने मुंबईहून नाशिकला येणार्‍या या कलावंतांसाठी प्रशासनाने हालचालही न केल्याने एकच संताप व्यक्त होत आहे. महत्वाचे म्हणजे कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण अलीकडेच करण्यात आले आहे. कलामंदिर व परिसरात सी सी कॅमेरेही नुतणीकरणावेळी लावण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेर्‍यांचा दर्जा अतिशय सुमार असल्याने योग्य चित्रीकरणच होत नसल्याची खंत कलावंतांनी व्यक्त केली. या प्रकरणी कलाकारांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

अधिकार्‍यांचा थंडपणा

कालिदास कलामंदिराची जबाबदारी नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहिर, उपअभियंता प्रशांत पगार यांच्यावर आहे. कलाकारांसह काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी याबाबत संबंधितांना मोबाइलवर चोरीची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही अधिकार्‍यांनी तेथे न येण्यात धन्यता मानली. कलामंदिराचे व्यवस्थापक बाळासाहेब गिते यांनीही सहकार्य न केल्याने कलाकारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी

कालिदास कलामंदिरातील सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थापकांसह विभाग प्रमुखांची आहे. मात्र, चोरी झाल्यानंतरही ही मंडळी निर्धास्त आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. चोरी झाली तेव्हा सुरक्षा रक्षक कोठे होते आणि ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात चोरट्याचा चेहरा का दिसू शकला नाही, याचीही चौकशी व्हावी. – शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -