“सर्किट” चित्रपटातून मधुर भांडारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!!

“चांदनी बार”, “ट्रैफिक सिग्नल”, “फॅशन”, “पेज ३” , “बबली बाउन्सर”, “इंडिया लॉकडाऊन” अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीमध्ये पदार्पण करत आहेत. आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ या चित्रपटाची प्रस्तुती मधुर भांडारकर करत असून, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे. भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत . येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर हा गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक निर्मिती संस्था आणि चॅनल्समध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. “कच्चा लिंबू”, “होम स्वीट होम”, “मस्का”, “भेटली तू पुन्हा”, “पावनखिंड” अशा अनेक चित्रपटांची प्रस्तुती तर “चोरीचा मामला” या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. त्यापुढे जात आता “सर्किट” या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत.

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.अभिनेता रमेश परदेशी याची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ “सर्किट” या चित्रपटात झाल्याचं आपल्याला टीजरमध्ये पाहता येतं. त्यामुळेच चित्रपटाच्या कथेविषयी आणि चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांची आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून शब्बीर नाईक यांनी काम पाहिले असून संकलन दिनेश पुजारी यांचे आहे तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.


हेही वाचा :

‘घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न