हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट आज (२० जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून एका गोड कुटुंबाची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मराठी कलाविश्वात अनेक दिग्गज कलाकारांनी हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात मराठमोळ्या माधुरी दीक्षितने ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट पाहिला. यानंतर व्यक्त होताना तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यातून तिने चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पाहुयात ती काय म्हणाली आहे. (Madhuri Dixit praised the team of Fussclass Dabhade)
मराठमोळ्या माधुरी दीक्षितने बॉलीवूड सिनेविश्वात ९० चं दशक तुफान गाजवलं. आजही तिची अदाकारी पाहून लाखो दिलांची धडकन वेग पकडते. कदाचित म्हणूनच तिला ‘धकधक गर्ल’ असे म्हटले जाते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगट तिच्या चाहत्यांमध्ये सामील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर माधुरीने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट चर्चेचा भाग ठरते. नुकतीच माधुरीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यामातून एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीतून तिने ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. ही पोस्ट तिने सिद्धार्थ चांदेकरला टॅग केली आहे.
माधुरी दीक्षितची पोस्ट
या पोस्टमध्ये माधुरीने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिलंय, ‘सिद्धार्थ चांदेकर व टीम तुम्हा सर्वांचं या नव्या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन!! ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल खूप खूप आभार. हा सुंदर अनुभव घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन ‘फसक्लास दाभाडे’ नक्की पाहा आणि ‘फसक्लास’ अनुभव घ्या!’
माधुरी दीक्षितने या पोस्टच्या माध्यमातून केवळ चित्रपटाच्या टीमने कौतुक केले नाही तर, प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्यासाठी आवाहनदेखील केले आहे. सिद्धार्थ चांदेकरने ही स्टोरी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिशेअर केली आहे. त्यासोबत, ‘खूप खूप धन्यवाद MD’ असे लिहिले आहे.
दर्जेदार कलाकारांची तगडी फौज
‘फसक्लास दाभाडे’ या मराठी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटात दर्जेदार मराठी कलाकारांची फौज पहायला मिळतेय. ज्यात उषा नाडकर्णी, निवेदिता सराफ, क्षिती जोग, मिताली मयेकर, राजसी भावे यांसह सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे आणि राजन भिसे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला दाभाडे कुटुंबीय त्यांची गोष्ट घेऊन आले आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ प्रेक्षकांच्या मनावर फसक्लास कामगिरी करणार का? हे पाहण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.
हेही पहा –
Jaat Movie : सनी देओलच्या जाट सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Edited By – Vishakha Mahadik