आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे आधुनिकतेला काही भलताच वेग मिळाला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला काही सेकंदसुद्धा पुरेशी ठरतात. सध्या सर्वत्र महाकुंभमेळ्यातील फोटो आणि व्हिडीओ ट्रेंड करत आहेत. या कुंभमेळ्यात IIT बाबा ते तेजस्वी साध्वी सामील आहेत. दरम्यान, या कुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकण्यासाठी आलेली मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर फार चर्चेत आली आहे. अशातच आता मोनालिसाला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळणार असल्याचे समजत आहे. याविषयी जाणून घेऊया. (Mahakumbh 2025 viral girl Monalisa got Bollywood film)
मोनालिसा करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष माळांची विक्री करण्यासाठी सामील झालेली मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्यांमूळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली. तिचे काही व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. निरागस सौंदर्य आणि बोलक्या डोळ्यांमुळे मोनालिसा सोशल मीडियावर टॉप ट्रेंड ठरली. यातच आता मोनालिसाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या काळात ती बॉलिवूड सिनेविश्वात एंट्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. एका बड्या निर्मात्याने त्याच्या बिग बजेट सिनेमासाठी तिची निवड केल्याचे समजत आहे.
कुंभमेळ्यात फुटपाथवर रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा आता थेट बिग बजेट सिनेमातून आपल्या भेटीसाठी येणार आहे. सिनेनिर्माते सनोज मिश्रा यांनी आपल्या आगामी सिनेमा ‘द डायरी ऑफ मणिपुर’साठी मोनालिसाची निवड केली आहे. मुख्य बाब अशी की, या सिनेमातून ती मध्यवर्ती भूमिकेत एका निवृत्त आर्मी ऑफिसरच्या मुलीचे पात्र साकारणार आहे. माहितीनुसार, मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाने या सिनेमाच्या ऑफरसाठी होकार दिला आहे. त्यामुळे लवकरच आता सिनेमाच्या पुढील कामाला सुरुवात होईल.
लवकरच शूटिंगला सुरुवात होणार
मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाचे चित्रीकरण एप्रिल ते जूनच्या मधल्या काळात सुरु केले जाईल. पूर्वोत्तर भारतातील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल. 6 ते 7 महिन्याच्या शेड्यूमध्ये हे चित्रीकरण पूर्ण केले जाईल आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत हा सिनेमा रिलीज होईल, असे सांगितले जात आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होण्यापूर्वी मोनालिसाला मुंबईत 3 महीने एक्टिंगची ट्रेनिंग दिली जाईल. सध्या मोनालिसा आणि तिचे वडील महाकुंभमेळ्यातून आपल्या घरी मध्य प्रदेशात महेश्वरला परतले आहेत. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि त्यांची टीम मोनालिसाच्या भेटीला एमपीत जाणार आहेत.
मोनालिसाचा आनंद गगनात मावेना
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाचा इंटरव्ह्यू पाहिला होता. ज्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी ते थेट महाकुंभमध्ये पोहोचले. मात्र, त्यांची काही भेट होऊ शकली नाही. परंतु, तिच्या कुटुंबातील काही लोक कुंभमेळ्यात थांबले होते. ज्यांच्या भेटीमुळे दिग्दर्शकांचा मोनालिसा आणि तिच्या वडिलांसोबत मोबाईलवर संपर्क झाला. यावेळी त्यांनी मोनालिसाला सिनेमाची ऑफर दिली. ही बातमी ऐकताच मोनालिसा आणि तिचे कुटुंबीय आनंदी झाले. या सिनेमामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि परिस्थती सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही पहा –
Akshay Kumar : खिलाडीची मोठी डील, कोट्यवधींना विकलं मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट