विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी नक्कीच मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर केले.
निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनानुसार मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या घराजवळील मतदान केंद्रात सकाळीच मतदान केले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना अभिनेते अविनाश नारकर म्हणाले की, यावेळी मतदान केंद्रांच्या ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मी अगदी सहजपणे मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेलो आणि तितक्याच सहजतेने मतदान करून बाहेर आलो. त्यामुळे खरोखरच मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान जलद गतीने पार पाडण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांची विभागणी छान पद्धतीने केलेली असल्याने मतदान करणे सुलभ होत आहे. सर्व मतदारांना वेळेत आणि छान पद्धतीने मतदान करता येऊ शकते. त्यामुळे गर्दीसुद्धा कमी आहे.
तसेच, मतदान केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अभिनेते अविनाश नारकर यांनी दिली आहे. यावेळी मतदान करून आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी, मतदानासाठी चांगली व्यवस्था, स्वयंसेवक आणि पोलीस यंत्रणा तैनात असल्याने मतदान चांगल्या पद्धतीने होत असून गर्दी सुद्धा नाही. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात कामाला जाण्यापूर्वी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन केले.
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
Edited By : Nikita Shinde