हास्याचा महारविवार, सलग २२ तास हसवणार महाराष्ट्राची हास्यजत्रा

२२ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सलग २२ तास हास्यरसिकांना विनोदाची मेजवानी,महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अजून एक नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रेक्षकांना हसवणं हे सर्वांत अवघड आहे असं म्हटलं जातं. पण हेच काम महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने अगदी उत्तमपणे केलं. खूप कमी वेळात हा कार्यक्रम प्रेक्षक पसंतीस उतरलाय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येकाच्याच घरात या कार्क्रमानं स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केलीय. पण आता हा कार्यक्रम अजून एक नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अनेकांचा सुट्टीचा रविवार हा उत्तम होणार आहे.

येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सलग २२ तास हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि हास्य रसिकांना पाहायला मिळणार आहे. मनोरंजन क्ष्रेत्रामधला एक नवा विक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने रचला जाणार आहे. या कार्यक्रमाचे ५०० हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत. आणि सध्या हा कार्यक्रम हास्य पंचमी साजरी करतोय, म्हणजेच सध्या हा कार्यक्रम आठवड्यातून ५ दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे आणि अल्पावधीतच ह्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. कोविडच्या कठीण काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं.

मराठी टी. व्ही विश्वात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा पाहिलाच कार्यक्रम असेल जो सलग २२ तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची भूमिका खूप प्रसिद्ध झाली. त्यातले स्किट आणि त्यांचं लेखन हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, समीर चौघुले, ओंकार भोजने, शिवली परब, पृथ्वीक प्रताप या सारख्या अनेक कारकरांच्या भूमिका महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचल्या. हास्यजत्रेचे प्रत्येक कलाकार हे घराघरात पोहोचण्याचं कारण म्हणजे ते साकारणारी पात्र हे प्रत्येकाला आपल्या घराघरातील वाटतं.

या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक मोठया कलाकारांनी हजेरी लावली आहे. आणि ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय त्यावरून हा कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी होईल हे निश्चित.