‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘फुलराणी’

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पहाण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्यापरीने तर्कवितर्क लावत होते. एवढंच नाही तर, सोशल मिडीयावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोधला टॅग करून ‘सुबोध ‘कोण आहे तुझी फुलराणी?’ हे विचारून या उत्सुकतेमध्ये आणखी भर पाडली. नेटकऱऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत ‘फुलराणी कोण’? याचे अंदाज बांधले. प्रत्येकाची उत्सुकता आणि आडाखे रंगले असताना, अखेर ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं…. आपल्या असण्याने आनंद पसरवणारी ‘फुलराणी’ आज रंगमंचावर अवतरली. तिला पाहून चिडवणाऱ्याला ‘फुलवाली नाय फुलराणी’ असं ठणकावून सांगणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर अवतरली आणि सगळयांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. टाळ्यांच्या कडकडाटात ‘फुलराणी’ झालेल्या प्रियदर्शनीने सगळ्यांना जिंकून घेतलं. सोबत चित्रपटातील एक छोटी झलकही उपस्थितांना यावेळी पहायला मिळाली. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

 

 


हेही वाचा :

मी त्या काळातील बिनधास्त अभिनेत्री… झीनत अमानची इंस्टा पोस्ट चर्चेत